अभंगाचा अर्थ जाणून घेण्याची कर्मेद्रला घाई झाली होती. ज्ञानेंद्रनं त्याला पुढचा मंत्र वाचायला सांगितला तेव्हा त्यानं काहीशा अनुत्सुकतेनंच तो वाचला.
कर्मेद्र – पुढचा मंत्र असा की, ‘समाने वृक्षे पुरुषो निमग्नोऽनीशया शोचति मुह्यमान:। जुष्टं यदा पश्यति अन्यमीशम् अस्य महिमानमिति वीतशोक:।।’
ज्ञानेंद्र – म्हणजे एकाच झाडावरच्या या दोन पक्ष्यांच्या दोन तऱ्हा पहा! दु:ख भोगणारा पक्षी जेव्हा पलीकडच्या फांदीवरील शांतचित्त पक्ष्याला पाहतो ना, तेव्हा त्याच्या साक्षित्वाचा, अलिप्ततेचा महिमा जाणवून शोकरहित होण्याचा उपायच जणू त्याला उकलतो.. त्या उपायालाच तो लागतो.. तसा ऐलतटावर, संसारात पिचलेल्या माझं लक्ष पैलतीरी जातंच कुठे? ते गेलं तर जाणवेल, अरे कोण आहे मी? हे सारं का भोगतो आहे? मी कोण? कोऽहं? कोऽहं? हा प्रश्न ऐलतटावरून पैलतटावर लक्ष गेल्याशिवाय येणारच नाही.. तो पैलतटावरूनच येणार!
कर्मेद्र – पण हा प्रश्न कावळा का विचारत आहे?
ज्ञानेंद्र – अरे हा प्रश्न कुठे उत्पन्न होतो?
कर्मेद्र – मनात!
हृदयेंद्र – मनात कसं काय? मन नाही प्रश्न उत्पन्न करत. मन त्याच्या आवेगांनुसार वागू पाहते. प्रश्न बुद्धी उत्पन्न करते! कोऽहं हा प्रश्न देहबुद्धीने बरबटलेल्या मनात येऊच शकत नाही. तो सद्बुद्धीलाच पडतो. त्या जागृत, तल्लख बुद्धीलाच काकबुद्धीच म्हणतात ना? ही सद्बुद्धीच पैलतटावरून कोऽहंचा पुकारा करीत असली पाहिजे.
ज्ञानेंद्र – हृदयेंद्र, पण मन आणि बुद्धीची सीमारेषा सांगता येईल का? सारं काही अंत:करणच तर आहे ना? ते अहंभावानं स्फुरत असतं, त्या स्फुरणाला अहं म्हणतात, ते मनन करत तेव्हा त्याला मन म्हणतात, ते योग्य-अयोग्यचा निवाडा करतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात आणि या प्रक्रियेसकट सर्व आठवणींची साठवण होते त्याला चित्त म्हणतात. पण सारं काही अंत:करणच नसतं का? त्या अंत:करणातच हा प्रश्न उमटतो. हा कोऽहंचा प्रश्न म्हणजे एकप्रकारे अहंच्या खरेपणाबद्दलचाच प्रश्न असतो. बुद्धी तो मनात उत्पन्न करते आणि मनाला जागं करण्याची प्रक्रिया सुरू होते.
हृदयेंद्र – जेव्हा हा प्रश्न पडतो तेव्हा जीव ‘सोऽहं’ या उत्तरापर्यंत आणि भावस्थितीपर्यंत पोहोचणार, या जाणिवेनं माउली त्याला ‘शकुन’ म्हणतात!
चौघांची मनं या उदात्त विचारानं कशी भरून गेली होती. आंतरिक तृप्ती व्यक्त करायला शब्दांची गरजही नव्हती.. आत्मभान ओसरलं आणि देहभान आलं तेव्हा जाणवलं.. पोटातही कावळेच ओरडत आहेत! फराळ पोटात गेल्यानं पोट भरलं, मन तृप्त झालं आणि बुद्धीही जणू ताजीतवानी झाली!
योगेंद्र – काय गंमत आहे ना? पोटातले कावळे ओरडतात ते कळतं, पण पैलतीरावरच्या काऊचं कोऽहं काही ऐकू येत नाही!
कर्मेद्र – पण कावळ्याचा जेवढा विचार करावा ना, तेवढा हा पक्षी वेगळा वाटतो. किती गोष्टींशी कावळा जोडला गेला आहे!
हृदयेंद्र – आपल्या पोटात जसे कावळे ओरडतात तशी भूक प्रत्येक प्राणिमात्राला आहे,  ही जाणीव व्हावी म्हणून तर ‘काकबळी’ आला!
ज्ञानेंद्र – पाहुणा येणार आहे, हे कावळ्याच्या ओरडण्यानं कळतं..
हृदयेंद्र – आणि या जगात पाहुण्यासारखा आलेला जीव पुढच्या गतीला गेला, हे सुद्धा कावळा पिंडाला शिवला म्हणजेच कळतं!
योगेंद्र -खरंच रे, आपणही पाहुणेच आहोत या जगात.
हृदयेंद्र – आपलं खरं घर जे परमपूर्णस्वरूप तिथून या जगात आपण आलो आहोत. पाहुणे म्हणून आलो आणि यजमानाच्या तोऱ्यात जगू इच्छितो. जणू कायमचं इथेच राहाणार आहोत.. मग तो परमात्माही ‘अतिथी’ बनून सद्गुरूच्या रूपात येतो. त्यांचा हेतू, त्यांची योजना मात्र पक्की असते. मला परत स्वस्थानी परत घेऊन जायचं. ते येतात. मला हाका मारतात. खुणावतात. बोलावतात. पण प्रपंचाच्या खोल गर्तेत पडलेल्या मला ती हाक ऐकूच येत नाही. मग अचानक एक दिवस उगवतो. पैलतटावरची हाक सद्बुद्धीला ऐकू येते. तिच्यातून त्या हाकेचा प्रतिध्वनी उमटतो.. कोऽहं..कोऽहं!
ज्ञानेंद्र – काय मनात विचार चमकला पाहा! पैल तो गे काऊमधलं पैल नेमकं काय असावं, याचा विचार करता करता एकदम केन उपनिषदातले मंत्र आठवले.. कर्मेद्र – आता याची उपनिषदं आलीच पुन्हा..
हृदयेंद्र – ऐक रे, त्यातून कितीतरी अर्थ उकलतो.. सांग ज्ञानेंद्र..
चैतन्य प्रेम