News Flash

असे मंत्री, अशा तऱ्हा!

आपण सत्ताधारी आहोत, याचे भान भाजपमधील इतरांना कधी यायचे ते येईल, मात्र नरेंद्र मोदी यांना ते नेमकेपणाने आले आहे. किमान शब्दांत कमाल अपमान करण्याच्या मोदींच्या

| November 10, 2014 06:28 am

आपण सत्ताधारी आहोत, याचे भान भाजपमधील इतरांना कधी यायचे ते येईल, मात्र नरेंद्र मोदी यांना ते नेमकेपणाने आले आहे. किमान शब्दांत कमाल अपमान करण्याच्या मोदींच्या कौशल्याचे अनेक दाखले मिळू लागले आहेत.
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आजच्याइतका उत्सवी कधीही नव्हता. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोण-कोण भेटायला आले, इथपासून ते त्यांनी कुणासमवेत चहा प्यायला, इथपर्यंतची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. काटकसरीच्या नावाखाली छोटेखानी मंत्रिमंडळ स्थापन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रविवारी २१जणांची भर पडली. आता मोदींचे छोटेखानी मंत्रिमंडळ जम्बो झाले आहे. त्यापैकी किती जणांना थेट अधिकार असतील, किती विभागांचे सचिव (मंत्र्यांना डावलून) थेट पंतप्रधानांना दैनंदिन माहिती देतील, हेच पाहणे रंजक ठरेल. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष बहुमताच्या जोरावर सत्तेत आला. सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये अजून हा पक्ष यायचा आहे. पंतप्रधान मोदी त्या मानसिकतेत आहेत; पण इतरांचे काय, हा प्रश्न ठरतोच.
हल्ली मंत्रिमंडळात प्रवेश मिळवणे नर्सरीत प्रवेश मिळवण्याइतकेच कठीण आहे. त्यासाठी किती जणांकडे जाऊन, आपणच कसे मंत्रिपदासाठी लायक आहोत, हे सांगण्याची स्पर्धाच सुरू असते. खासदारकी म्हणजे मतदारसंघासह पंचक्रोशीत मानाचा तुरा. अशा तुर्रेबाज नेत्यांनादेखील मंत्रिपद मिळवण्यासाठी व मिळालेले टिकवण्यासाठी सध्या मोठी धडपड करावी लागत आहे. दिल्लीत मराठवाडय़ाचे तारणहार असल्याच्या आविर्भावात वावरणारे एक खासदार राज्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन मंत्रिमंडळाची चर्चा सुरू असताना हे खासदार भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी दररोज चकरा मारीत असत. आपणच कसे महाराष्ट्रातील बहुसंख्य समाजातील व मराठवाडय़ातील लायक नेते आहोत, हे सांगताना या खासदार महाशयांचा आवाज अत्यंत केविलवाणा होत असे. मुंडे यांच्यासाठी या खासदारांना मंत्रिपद मिळवून देणे जणू प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला. अखेरीस माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी आग्रही असलेल्या हंसराज अहिर यांचा पत्ता कापून मराठवाडय़ातील या खासदारांच्या पदरात राज्यमंत्रिपदाचे दान पडले. मंत्री झाल्यावर हेच राज्यातील भाजपजनांच्या पाहुणचारासाठी उत्सुक होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कोअर टीमचे सदस्य व भाजपच्या मराठी खासदारांसाठी राज्यमंत्र्यांनी दिल्लीत मेजवानी आयोजित केली होती. उत्तर भारतात ‘बीकानो’ नावाने खाद्यपदार्थाचे मॉल्स असतात. या बीकानोवाल्याने मंत्रिमहोदयांनी आयोजित केलेल्या मेजवानीची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. पाहुण्यांची पुरेपूर काळजी घेतली. भोजनानंतर मंत्र्यांकडून प्रेमाची आठवण म्हणून पेढय़ांचा पुडाही दिला. आता बीकानोला मंत्र्यांविषयी कोण आदर! असणारच, कारण खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेची काळजी घेणाऱ्या या मंत्रिमहोदयांची काळजी बीकानोला घ्यावीच लागणार! बीकानोच्या पेढय़ांची चव ७, रेस कोर्सवर पोहोचली. तेव्हापासून अशा मेजवान्यांना चाप बसला आहे म्हणे. मोदी आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन असेही करीत आहेत. भाजपच्या या राज्यमंत्र्यांचे आपण समजू शकतो. ते ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावरचे मंत्री; पण केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचे ‘अवजड’ जागेचे दुखणे वेगळेच आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची ‘अनंत’ स्तुति‘गीते’ गाणाऱ्या भाजपच्या सहकारी पक्षाचे हे मंत्री. स्वभावाने अजातशत्रू. म्हणून मोदी यांनी या केंद्रीय मंत्र्याची फारशी दगदग-धावपळ होणार नाही, याची काळजी घेतली. म्हणजे या मंत्र्यांकडून संबंधित खात्याची माहिती पंतप्रधान घेत नाहीत. विभागाच्या सचिवांशी मोदी थेट संपर्क साधतात. या मंत्र्यांच्या दालनात प्रवेश केल्यावर एकही फाइल प्रलंबित नसल्याची जाणीव होते. कारण टेबल एकदम चकाचक असते.
भाजपचा हा सर्वात जुना सहकारी पक्ष. या पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांची ही अवस्था. राजकारणात ‘गॉडफादर’ लागत असतो. तो असल्याशिवाय काहीही मिळत नाही. त्यात भाजप म्हटला म्हणजे नागपूरकरांचा आशीर्वाद हवाच. केंद्रीय मंत्रिपदासाठी हंसराज अहिर इच्छुक होते तेव्हाचा एक किस्सा. लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी परिवारातल्या बडय़ा नेत्यांची (संघ प्रचारकाची) भेट घेतली. खान्देशात झालेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात अहिरांनी संघाच्या या नेत्याकडे केंद्रीय मंत्रिपदासाठी विनवणी केली. तेव्हा तर सरकारचाच शपथविधी व्हायचा होता. त्यांना ‘आता मी मोदींना बाजूला व्हा म्हणतो व तुमच्याच हाती देश द्यायला लावतो’, असे सुनावण्यात आले. त्यानंतर अहिरांनी मंत्रिपदाची आशा सोडली होती. कालच्या विस्तारात त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले. अर्थात अहिर यांची मंत्रिपदाची दावेदारी योग्यच होती.  कोळसा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अहिर यांना पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलावण्यात आले. मार्गदर्शक मंडळाचा शोध तोपर्यंत लागला नव्हता. त्यामुळे संसदीय मंडळाच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. बैठकीत अडवाणी यांनी उपस्थित सर्वाना, अहिर जे सांगतील ते नीट समजून घ्या, अशी विनंती केली होती. वऱ्हाडी प्रभावाच्या हिंदीत अहिर यांनी कोळसा खाण गैरव्यवहाराची बित्तंबातमी या बैठकीत दिली. त्या माहितीच्या आधारावर जनाधार नसलेल्या परंतु इंग्रजी बोलू शकणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांनी तेव्हापासून ते अगदी कालपरवाच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वृत्तवाहिन्यांवरील जागा व्यापली होती. आज असे नेते केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळण्याचे वृत्त यावे म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या एका मुस्लीम नेत्याने खास बिहारच्या पत्रकारांना म्हणे मेजवानीच दिली. त्याची महती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचल्यावर प्रसारमाध्यमांकडे पोहोचवल्या जाणाऱ्या संभाव्य यादीतूनही या नेत्याचे नाव वगळले गेले. रिपब्लिकन पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य रामदास आठवले हेदेखील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यावर दिल्लीत ठाण मांडून होते. मंत्रिपद देण्याची विनंती करण्यासाठी आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती; परंतु त्यांना शेवटपर्यंत वेळ देण्यात आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका गोष्टीसाठी नक्कीच कौतुक करता येईल, ते म्हणजे त्यांच्या किमान शब्दांत कमाल अपमान करण्याच्या कौशल्याचे. ज्यांनी ज्यांनी मोदींचे हे कौशल्य अनुभवले आहे, त्यांच्या तोंडूनच हा अनुभव ऐकावा. मंत्र्यांची ही तऱ्हा, तर खासदारांविषयी काही बोलायलाच नको. महाराष्ट्राचे अजून एक राज्यसभा सदस्य ‘पँथर’ आहेत. हा ‘निळा पँथर’ सत्तरच्या दशकात आजच्याइतका अगतिक-असहाय नव्हता. त्यांचा भीमबाणा मोडेन पण वाकणार नाही, असा होता. आता तशी स्थिती नाही. असो. दि. १८ मे रोजी भाजपच्या नवनिर्वाचित मराठी खासदारांची दिल्लीत बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्र सदनात या खासदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाची त्या वेळी जोरदार चर्चा होती. आपल्यावर सातत्याने अत्याचार झाला असल्याने मंत्रिपद मिळेल, या आशेवर निळा पँथरही सदनात ठाण मांडून होता. एकीकडे भाजपचे मराठी खासदार महाराष्ट्र सदनाच्या झगमगाटी भोजनगृहात (कॅन्टीन) विजयी आनंद साजरा करीत होते, तर राज्यसभा मिळाल्यावर आता मंत्रिपदही द्या, असे आर्जव करणारा हा निळा पँथर सदनातच आपल्या दालनात बसून होता. या पँथरला बोलावण्याचे साधे सौजन्यही भाजपच्या एकाही खासदाराने वा नेत्याने दाखवले नव्हते. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गिरीश महाजन हे महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते त्या वेळी सदनात उपस्थित होते. मंत्रिपदासाठी त्या वेळी पँथरने मोदींची भेट घेतली होती. तेव्हा ‘तुम्हाला मंत्रिपद मी देणार आहे, प्रसारमाध्यमे नाहीत, त्यामुळे प्रसारमाध्यमांमधून मंत्रिपदाची मागणी करू नका,’ अशा किमान शब्दांत कमाल संदेश देऊन मोदींनी पँथरला माघारी पाठवले. आंबेडकरी चळवळ कुठल्या टप्प्यावर आली आहे, असे कुणाही संवेदनशील व्यक्तीला या प्रसंगातून वाटले असेल. त्यामुळे आपला अपमान म्हणजे आंबेडकरी जनतेचा अपमान व आपला सन्मान म्हणजे आंबेडकरी जनतेचा सन्मान, अशांना.. अरे, कुठे नेऊन ठेवलाय आंबेडकरी विचार माझा.. हा सवाल संतप्तपणे आजची भीमविचारांची पिढी विचारणारच!  
संसदीय राजकारण हा तसा गंभीरपणे करण्याचा विषय आहे. काँग्रेसने आतापर्यंत गंभीर राजकारण केले. त्याच साच्यात भाजप मुरतोय. आपण सत्ताधारी आहोत, याची जाणीव हळूहळू विकसित होईल. भाजपलादेखील आपण कधी बहुमताच्या जोरावर सत्तेत येऊ, याची आशा नव्हती. यासंबंधी एक गमतीदार परंतु काहीशी गंभीर आठवण भाजपचे जुनेजाणते सांगतात. भाजपप्रणीत रालोआ सरकार स्थापन होण्याची वेळ आली तोपर्यंत राष्ट्रपतींना सत्तास्थापनेसाठी सादर करावे लागणारे पत्र एकाही भाजप नेत्याने पाहिलेदेखील नव्हते, अगदी अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील! सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींकडे जाण्याची वेळ येईस्तोवर ते पत्र कुणाकडे आहे, याचीही माहिती बडय़ा नेत्यांना नव्हती. एका नेत्याला मात्र काळाची पावले ओळखू येत असत. त्या नेत्याने पत्राची जबाबदारी कुणीही न सोपवता निभावली. राष्ट्रपतींकडे जाताना सत्तास्थापनेसाठी आवश्यक समर्थन पत्र या नेत्याने आपल्या ज्येष्ठांना दाखवले. हा नेता म्हणजे प्रमोद महाजन! संसदीय राजकारणाची जाण अशा प्रसंगांमधून प्रगल्भ होत असते. अशी प्रगल्भता भाजपच्या मंत्र्यांमध्ये येईलच. त्यासाठी मोदी व मंत्र्यांमध्ये सहज समन्वय निर्माण व्हावा लागेल. तो व्हावा, अन्यथा मंत्री व मंत्र्यांच्या तऱ्हा, याची चर्चा यापुढेही होत राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2014 6:28 am

Web Title: ministers in center
Next Stories
1 गांधीनिष्ठांची मांदियाळी!
2 निवडणुकीनंतरची झाडाझडती!
3 जुने शत्रू- नवे मित्र
Just Now!
X