‘लिलावदार : ख्रिस्टीज, लिलाव क्रमांक : दोन हजार सातशे एक्क्याण्णव, नग (लॉट) क्रमांक : आठ ए’- अशी नोंद असलेल्या चित्राने तब्बल १४ कोटी २४ लाख डॉलरची बोली (किमान आठ अब्ज ९९ कोटी ४३ लाख रु.) मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये मिळवली.  लिलावांतल्या किमतींचा याआधीचा जागतिक विक्रम मे २०१२ मध्ये झाला, तो ११ कोटी ९९ लाख डॉलरचा होता.नवा विक्रम ब्रिटिश चित्रकार फ्रान्सिस बेकन याच्या चित्राचा आहे. बेकनने त्याचा एकेकाळचा मित्र व नंतर स्पर्धक बनलेला दिग्गज चित्रकार ल्युसिअन फ्रॉइड याचे चित्र रंगविले, ते चित्र तीन भागांत आहे. पावणेसात फूट उंची, तर तिन्ही भाग मिळून पावणेपंधरा फूट रुंदी इतका प्रचंड त्याचा आकार आहे. याउलट मे २०१२ विक्रम नोंदवणारे चित्र एडवर्ड मुंक याने रंगविलेले, साडेचार फुटांपेक्षा लहान आकाराचे होते.  चित्राचा अर्थ सांगणारे खूप आहेत आणि असतील, पण या आकडय़ांमधून आपण काय अर्थ काढायचा? निव्वळ आकडेमोडीने नफ्याची गणिते मांडल्यास, मुंकच्या ‘किंकाळी’ या चित्राला प्रतिचौरस सेंटिमीटर हिशेबाने मिळालेली किंमत फ्रान्सिस बेकनच्या ‘थ्री स्टडीज ऑफ ल्युसिअन फ्रॉइड’ या चित्रापेक्षा कितीतरी जास्त भरेल. चित्रकलेच्या भारतीय बाजारात हे असलेच प्रतिचौरस इंच वा सेंटिमीटरचे हिशेब चालतात. चित्रखरेदी करणे म्हणजे इतिहासाच्या किंवा काळाच्या एका तुकडय़ावर मालकी सांगणे, असे भारतात कुणाला वाटत नाही. पाश्चात्त्य देशांत आणि आता जपान, चीन, कोरिया आदी देशांत वाढत गेलेल्या संग्रहालय-संस्कृतीमुळे चित्रलिलावांना बहर आला, तसा आपल्याकडे आला नाही, कारण दिल्लीची दोन छोटी संग्रहालयेवगळता आपली बाकी सारी संग्रहालये सरकारीच. त्यामुळे, फ्रान्सिस बेकनच्या चित्राने लिलावात बाजी मारण्याचे महत्त्व काय, हे चटकन लक्षात येणारही नाही आणि आपण आकडेमोडच करीत बसू. आकडे पाहातानाच हे चित्र १९६९ सालचे- म्हणजे ५० वर्षांहूनही कमी जुने असल्याचे लक्षात आले, तर चित्रकलेच्या क्षेत्रात यामुळे कोणता आनंद झाला असेल, याची थोडी कल्पना येईल. नवा आणि ताजा इतिहास चित्रकलेत घडू लागला, तो १९६० च्या दशकात. विरूपीकरणासारख्या कल्पना पिकासोच्या क्युबिझमपेक्षा निराळय़ा आहेत, बेकनच्या विरूपीकरणाची संगती जाक डेरिडासारख्यांच्या तत्त्वचिंतकांच्या सिद्धान्तांशी लावता येते आणि चित्रकलेतल्या आजच्या नव्या प्रवाहांशी या चित्राचे थेट नाते आहे, हे समजा माहीतच नसले तरी एवढे नक्कीच लक्षात येईल की, ही ‘जुनेपणा’ला मिळालेली किंमत नव्हे. जुनेपणा आणि इतिहास यांची फारकत दृश्यकलेत तरी गेल्या ५० वर्षांपासूनच होऊ लागली आणि हा नवा असला तरी इतिहासच, असे चित्रांबद्दल मनन-वाचन करणारा समाजही मानू लागला. खरेदीदारांचा नूर- मूड हे बाजारातल्या वधघटीचे कारण असते हे खरे; परंतु अशा मौल्यवान चित्रलिलावांत पैसा ओतताना जो विचार केला जातो, त्यामागे कुणातरी सल्लागाराचा का होईना, अभ्यास असतो. यामुळेच, १९०० किंवा १९५० पर्यंतच्या चित्रांऐवजी आता १९६५ नंतरच्या चित्रांचा लिलावधंदा वधारला, हा संकेत ‘नव्या इतिहासा’शी संबंधित सर्वानाच सुखावणारा आहे.