News Flash

जैन-दर्शन: प्राचीन, पौर्वात्य पण प्रागतिक

जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुद्धा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत, ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे

| September 13, 2013 01:03 am

जैन-दर्शन: प्राचीन, पौर्वात्य पण प्रागतिक

जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुद्धा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत, ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे. वैदिक (यज्ञवादी), श्रमण (मुक्तीवादी) आणि द्वैती (भक्तीवादी) हे तीन मोठे संप्रदाय, त्यांचे उपपंथ व स्थानिक लोकधर्म या साऱ्यांचा; समन्वयी ‘गोपाळकाला’ म्हणजे हिंदूधर्म होय. हिंदूंमधील परिवर्तनशीलतेचा एक दार्शनिक मूलस्रोत, सर्वात प्राचीन अशा जैन दर्शनात, थक्क करून सोडण्याइतका प्रखर आढळतो.
दर्शन म्हणजे एका जीवनदृष्टीनुसार जगताचे, जिवाचे व (असल्यास) जगदीशाचे ‘स्व’रूप कसे? त्यानुसार जिवाचे सार्थक कशात आहे? याबद्दलचे एक सुसंगतपणे सिद्ध केलेले मत (बौद्ध-मत, सांख्य-मत इत्यादी) होय. संघटित-धर्म आणि धर्मीयांच्या जमाती या गोष्टी मानवास घातक ठरत असल्या, तरी काही वेळा एखाद्या धर्माशी निगडित असे शुद्ध तत्त्वचिंतन, धर्मापासून स्वतंत्र आणि उद्बोधक असू शकते. विधायक धर्मचिकित्सेसाठी प्रथम, रूढ आचारविचार बाजूला ठेवून, संबंधित दर्शनाने, मानवासाठी स्वत:ला घडविण्याबाबत काय पोटेन्शियल देऊ केलेले आहे, हे अगोदर समजावून घेतले पाहिजे व समजावून दिले पाहिजे.
म्हणूनच, सध्याचा जैन-समाज, त्यातील पंथ व आचारविचार, या गोष्टींचा समाजशास्त्रीय अभ्यास या लेखात मांडलेला नाही. साधू/साध्वींचे (श्रमण) वैराग्य हे आत्मक्लेशापर्यंत आणि गृहस्थांचे (श्रावक) लक्ष्य मुख्यत: लौकिक यश, हा दुभंग या धर्मात का शिरला? हेही उलगडलेले नाही. तसेच, जैन हा अल्पसंख्य समुदाय मानावा, या राजकीय मागणीविषयी कोणतीही चर्चा केलेली नाही, तर जैन-दर्शन हे ‘शुद्ध तत्त्वज्ञान’ म्हणून लक्षात घेतले आहे. त्याची सध्याच्या काळातील ‘संभाषिताशी’ (डिसकोर्स) अनुरूप मांडणी केली आहे व पारंपरिक संज्ञा, संदर्भापुरत्या दिलेल्या आहेत.
सामान्यत: बहुतेक दार्शनिकांची भूमिका, ‘अंतिम सत्य’ हे एकच एक असले पाहिजे आणि तसे असेल तर, आपापले दर्शन सोडून इतरांनी सांगितलेली ‘अंतिम सत्ये’चूक असली पाहिजेत, अशीच असत आलेली आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या मदानात, इतरांचे खंडन करून त्यांना बाद करणे व आपणच अंतिम विजेते ठरणे, या दृष्टीने युक्तिवाद केले जातात. जैनांची अिहसा ही या मदानापासूनच सुरू होते. अंतिम सत्य हेच मुळात एकच एक नसून ती अनेक असू शकतात, असे जैन मानतात व या मूलगामी वेगळेपणाला ‘अनेकांतवाद’ असे संबोधले जाते. इतर दर्शनांना वज्र्य ठरवून आपले शुद्ध राखणे असे जैनांनी केले नाही. उलट त्यांनी, इतर दर्शनांतील ग्राह्य़ भाग, एक आंशिक दृष्टी (नय) म्हणून समाविष्ट करून घेऊन, आपले दर्शन समृद्ध केले. तसेच इतरांना, तुम्हीही एकांगीपणा सोडा व समृद्ध व्हा, असे आवाहन केले. हे धोरण फारच विधायक आहे. इतरांचे अनुयायी हे ‘पाखंडी व म्हणूनच मारण्यास योग्य’ ही सर्व आंतरधर्मीय युद्धांमागील धारणा जैनांनी मुदलातच फिजूल ठरविली आहे.
विरोधांची नांदणूक, मर्यादित ज्ञान-दावे  
जीवनात सातत्य आणि नावीन्य हे दोन्ही आढळते. त्यापकी कोणते तरी एक नाकारणे जैनांना अनुचित वाटते. उदाहरणार्थ- वेदांती नित्यवादी असल्याने, जे अढळ राहते ते सत्य आणि जे बदलते ते भासमान मानतात. याउलट बौद्ध हे क्षणवादी आहेत. ते ‘‘दर क्षणी सारेच नष्ट होते. पण पुढच्या क्षणीच्या उत्पत्तीत आधीच्याशी साम्य असते, म्हणून सातत्य भासते’’ असे मानतात. दोघेही एकमेकांना अर्थातच चुकीचे मानतात. जैन मात्र हा विरोध आंशिक दृष्टी (नय) म्हणून सामावून घेतात. ते म्हणतात, ‘‘जर साऱ्याच गोष्टींकडे ‘आत्ता जे जसे वाटते आहे तसेच’ म्हणून पाहिले (ऋजुसूत्रनय) की अनित्यतासद्धा खरी असते. याउलट साऱ्याच गोष्टींना सर्वाधिक सामान्य कोटीत बसवून पाहिले (संग्रहनय) की नित्यतादेखील खरीच असते!’’
ज्ञानाला मर्यादा आहेत, त्यामुळे विधाने जपून केली पाहिजेत अशीही जैनांची भूमिका आहे. ‘‘हो म्हणजे होच.’’ ‘‘नाही म्हणजे नाहीच’’ अशी विनाअट (अनकन्डिशनल) विधाने करण्यापेक्षा, एका परीने ‘‘हो’’, दुसऱ्या परीने ‘‘नाही’’ आणि तिसऱ्या परीने ‘‘सांगता येत नाही’’ अशी अटींनिशी (कन्डिशनल) विधाने केली पाहिजेत, या जैनांच्या आवाहनाला ‘स्यादवाद’ असे नाव आहे. यावर ‘‘यांचे काहीच निश्चित नसते’’ अशी टीका होते. पण खरे तर ‘कोणत्या परीने’ याचा नेमका निर्देश करून, मग विधान करणे हे जास्त अचूक असते.
उदाहरणार्थ- इंद्रधनुष्य हे प्रतिमा म्हणून असते, पण वस्तू म्हणून नसते (फक्त तुषार व उन्ह असते). एखादे शस्त्र जर फक्त दिवाणखान्यात टांगण्यापुरतेच असेल तर ते एक शोभेची वस्तू बनते. उलट एखादी वजनदार शोभेची वस्तू फेकून मारली तर ती शस्त्र बनते . ‘‘तो खाखरला’’. पण ते खोकला आल्याने की खवचटपणे? सांगता येणार नाही! पण हेच ‘त्याला’ सांगता येईलही! आहेही आणि नाहीही या रचनेमुळे विरोधी तत्त्वे आपापल्या परीने एकत्र नांदू शकतात.
उन्नतीची प्रक्रिया शक्य होणे  
या भूमिकेचा जैन दर्शनाला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे, चित् (जाणीव) आणि जड (निसर्ग) हे दोन्ही खरे आणि परस्परप्रवेशी (इंटरपेन्रिटेटिंग) मानणे हा आहे. जैन हे  जाणीववान एन्टिटीला ‘जीव’ म्हणतात. निसर्गाला ‘अजीव’ म्हणतात. जीव जितका प्राथमिक किंवा खालच्या पातळीवरचा, तितक्या प्रमाणात त्याच्या जाणिवेत घुसखोरी करून, निसर्गाने त्याचा कब्जा घेतलेला असतो. निसर्गाच्या घुसखोरीला व प्रभाव पाडण्याला जैन ‘आस्रव’ म्हणतात. जाणिवेने आपली स्वायत्तता गमावलेली असणे आणि ती कन्डिशन्ड असणे याला ते ‘बंध’ म्हणतात. पण तरीही जाणिवेला काहीसे स्वायत्त अस्तित्व उरतेच. त्यामुळे ती, निसर्गाने कब्जा घेण्याला, कन्डिशिनगला, जो विरोध वा प्रतिबंध करते, त्याला जैन ‘संवर’ असे म्हणतात. जाणीव जेव्हा, ही घुसखोरी नुसती थांबवत नाही, तर अगोदर झालेले कन्डिशिनग निरसून टाकते, त्या क्रियेला जैन ‘निर्जरा’ असे म्हणतात. जेव्हा जाणीव, तिची स्वायत्तता पूर्णपणे कमावते, त्या स्थितीला जैन ‘अपवर्ग’ असे म्हणतात. अशा तऱ्हेने जैनांनी, चित् व जड यातील द्वंद्वात्मक संयोगाचे, सात टप्पे मानले आहेत. जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि अपवर्ग हे ते सात टप्पे होत. ही द्वंद्वात्मक प्रक्रिया समजावून घेण्याबाबत शुद्ध-चिद्वादी व शुद्ध-जडवादी हे दोघेही अक्षम होऊन बसतात. जैन ही प्रक्रिया पुढे जाण्याला ‘धर्म’ तर थबकून राहण्याला ‘अधर्म’ म्हणतात.
आत्मा हाच भोक्ता आणि कर्तादेखील
जैन वेदप्रामाण्य मानत नाहीत व ईश्वरही मानत नाहीत, पण आत्मा मानतात. प्रत्येक जिवाचा आत्मा हा विलग (सेपरेट) तर आहेच, पण तो अनन्य (युनिक) ही आहे. त्याचे अनन्यत्व हे प्राथमिक अवस्थेपासून ते ‘परमावस्थे’त सुद्धा टिकते.  
काही दर्शने विशुद्ध आत्मा मानतात. मग त्यांना एक विचित्र भूमिका घ्यावी लागते. आपल्याला भासतो ते ‘आपण’, म्हणजे ‘खरे आपण’ नाही! पण आपल्याला प्रत्ययाला न येणारा विशुद्ध आत्मा म्हणजे ‘खरे आपण’! मात्र जैनात ‘खरे आपण’ व ‘खोटे आपण’ असली काही भानगड नाही. ‘खरे आपण’च, विकारी आणि विकारक, फरक पडणारे व फरक पाडणारेसुद्धा म्हणजेच भोक्ताही आणि कर्ताही आहोत. (‘अप्पा कट्टा विकट्टाय’ असे सूत्र आहे.) म्हणजेच व्यवहारत: आपण जसे असतो तसाच जैन-आत्मा आहे!  आपण जितके बद्ध म्हणजे कन्डिशन्ड असू, तितक्या प्रमाणात, आपल्या भोगामुळे येणारी आपली प्रतिक्रिया, ही यांत्रिक असेल. स्टिम्युलसनुसार साचेबंद रिस्पॉन्स, बस्स! पण स्टिम्युलसपासून रिस्पॉन्स निर्माण होणे हे जर जाणिवेच्या द्वारे झाले तर, जाणिवेतील निर्णयाने वेगळा रिस्पॉन्स येण्याची शक्यता खुली होते. रिस्पॉन्स ही नुसती क्रिया न उरता ‘कृती’ बनते.  जाणिवेची स्वायत्तता कमावणे म्हणजे बंध निवारण होय. बौद्धांचे ध्येय दु:खनिवारण हे आहे, तर जैनांचे ध्येय, बंधनिवारण हे आहे. पण ही ‘जगापासून’ची मुक्ती नव्हे. जगातच उत्कर्ष साधायचा आहे.
ज्ञान, सुख, कर्तृत्व आणि अनन्यता
परमावस्था या गोष्टीला जैन ‘मोक्ष’ नव्हे, तर ‘अनोखी’ म्हणून ‘अपवर्ग’ म्हणतात. आत्मा परमावस्थेला पोहोचला तरी तो ‘ब्रह्मा’त लोप पावत नाही. ‘ईश्वरा’ची कृपा प्राप्त करून घेत नाही, वा या ‘लोका’च्या पल्याडही जात नाही. तो या लोकाच्या परिसीमेपाशी पोहोचतो. परमावस्थेचे वर्णन जैनांनी ‘अनंतज्ञान, अनंतसुख आणि अनंतवीर्य (कर्तृत्व)’ असे केले आहे. परिसीमा सांगताना जरी ‘अनंत’ हा शब्द आला असला, तरी या प्रवासातल्या उत्कर्षांचा ‘सांत’ अर्थ स्पष्टपणे सूचित होतो. बंध घटवत न्यायचा आहे. ज्ञान, सुख आणि कर्तृत्व वाढवत न्यायचे आहे आणि तेही आपापल्या खासियतीनुसार! प्रागतिक म्हणजे याहून काय हवे?  या लेखाचा संदर्भ म्हणूनच फक्त नव्हे, तर भारतीय संस्कृतीचा ‘प्रामाणिक आदर’ करणाऱ्या प्रत्येकाने प्रा. श्रीनिवास दीक्षित यांचे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ फडके प्रकाशन, कोल्हापूर, हे पुस्तक वाचलेच पाहिजे. दर्शनांची ओळख करून घेण्याचा याहून सोपा मार्ग मला तरी माहीत नाही.
लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2013 1:03 am

Web Title: overview of jainism old oriental but progressive
Next Stories
1 सबल(?) गटात मोडणे हाच गुन्हा?
2 पश्चिमद्वेष! आयतोबांच्या उलटय़ा बोंबा
3 समता? की नव्या अर्थाने सर्वोदय?