‘व्हायब्रंट गुजरात’ हे मोदी यांच्या विक्रयकलेला आलेले यश म्हणावे लागेल. खरा बदल होईल तो मोदी यांना अपेक्षित असलेल्या सुधारणा प्रत्यक्ष दिसू लागल्यावर. त्या रेटणे हे त्यांच्याच हातात आहे..
संकल्पालाच सिद्धी मानण्याचा भलताच प्रघात अलीकडे रुजू होताना दिसतो. म्हणजे घोषणेलाच खरे मानणे. व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने हे दिसून येते. या गुंतवणूक मेळाव्यात काही लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झाली. तिचे झालेले स्वागत पाहता ही इतकी सारी गुंतवणूक प्रत्यक्षात आली की काय, असे वाटावे. हे असे गुंतवणूक मेळावे हल्ली सर्वच राज्ये भरवतात. परंतु त्या कल्पनेची मालकी गुजरातकडे, त्यातही नि:संशय नरेंद्र मोदी यांच्याकडे जाते. २००३ साली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी पहिल्यांदा या गुंतवणूक कुंभमेळ्यांची कल्पना मांडली. त्यास कारण होते ते आदल्याच वर्षी झालेल्या िहसक दंगलींचे. २००२ सालातील या दंगलींनी गुजरातचा कराल चेहरा जगापुढे आला आणि सगळी राजकीय व्यवस्थाच हादरली. अशा वातावरणात उद्योजकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने मोदी यांनी या गुंतवणूक मेळाव्यांचा घाट घातला. धार्मिक दंगली झाल्या असल्या तरी तुमची गुंतवणूक शाबूत आहे, हा विश्वास उद्योजकांना देणे हा त्यामागील विचार. आव्हानांचे रूपांतर संधीत करण्याचे मोदी यांचे कौशल्य यातून दिसून येते. म्हणजे मुदलात जो कार्यक्रम लज्जारक्षणाच्या हेतूने जन्माला आला त्याचे परिवर्तन हे मिरवण्याच्या कार्यक्रमात झाले. हे मोदी यांच्या विक्रयकलेला आलेले यश म्हणावे लागेल. आता त्यावर काही टीकाही होते. परंतु अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे असले मेळावे भरवण्यापासून कोणी रोखले नव्हते. पण ही कल्पना त्यांना सुचली नाही आणि मोदी यांनी ती भलतीच यशस्वी करून दाखवली. मुख्यमंत्री असताना त्यांना जे जमले त्याचा ते पंतप्रधानपदी गेल्यावर गुणाकार होणार हे उघड होते. तसेच झाले आणि इतके दिवस गुजरातपुरता मर्यादित असलेला हा कुंभमेळा देशपातळीवरील कार्यक्रम बनला. त्या कार्यक्रमाचा जनक हा देशाच्या सर्वोच्च पदी बसलेला असल्यामुळे निमंत्रितांची संख्या आणि त्यांची पदे, हीदेखील डोळे दिपवणारी असल्यास नवल नाही. तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यापासून ते जागतिक बँकेच्या अध्यक्षापर्यंत अनेकांनी या गुंतवणूक मेळ्यात पायधूळ झाडली.
अंबानी आणि अदानी हे अर्थातच या मेळाव्याचे आकर्षण होते. मुकेश अंबानी यांनी यंदाच्या मेळाव्यात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. अदानी यांनीही २५ हजार कोटी रुपये खर्चून सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करीत असल्याचे जाहीर केले. कुमार मंगलम बिर्ला यांची बोली २० हजार कोटी रुपयांची होती. सर्व मिळून जवळपास दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घोषणा गुजरातसाठी या मेळाव्यात झाली असा अंदाज आहे. हा सातवा गुंतवणूक मेळावा. कमी-जास्त प्रमाणात दर मेळाव्यात अशाच गुंतवणुकीच्या घोषणा झाल्या आहेत. त्यांची एकंदर बेरीज केल्यास गुजरातच्या अर्थव्यवस्थेची स्पर्धा थेट जर्मनी वा अन्य श्रीमंत युरोपीय देशांशीच व्हायला हवी. तसे झालेले नाही. उलट गुजरात सरकारचा महसूल हा चिंतेचा विषय असून त्या राज्याने घेतलेली कर्जे कमाल मर्यादेपर्यंत जाऊन ठेपली आहेत. हा एका अर्थाने विरोधाभास झाला. एका बाजूला देशातले यच्चयावत उद्योगपती हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करतात आणि त्याच वेळी गुजरात सरकारचा महसूल मात्र घटताच राहतो. हे असे होते याचे कारण प्रत्यक्ष घोषणांपकी फारच कमी घोषणा गुजरातच्या मातीत उतरल्या. थेट मुख्यमंत्रीच- आणि आता तर पंतप्रधान- बोलावतात, त्यांच्या निमंत्रणाला नाही म्हणता येत नाही त्यामुळे उद्योगपती जमतात, उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करतात आणि भारावल्यासारखे दाखवत प्रचंड गुंतवणुकीची घोषणा करतात. प्रत्यक्षात यातील किती गुंतवणूक जमिनीत उतरते हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. किंबहुना तो पडूच नये अशीच सारी वातावरणनिर्मिती असून प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीच्या माऱ्यात गुदमरून वास्तवाचे भान विसरणे आता साऱ्यांनाच आवडू लागले असल्याचे दिसते.
विवेकाचा आवाज क्षीणच राहील अशी हवा निर्माण करणे हे मोदी यांचे वैशिष्टय़. त्याबाबत अन्य सर्वपक्षीय राजकारणी एकत्र झाले तरी त्यांचे सामूहिक कौशल्य मोदी यांच्या वैयक्तिक कसबाच्या पासंगास पुरणार नाही. ही अशी हवा तयार करण्याचा म्हणून एक फायदा असतो, त्यामुळे सरकारवर काही तरी करून दाखवण्याचे दडपण येते असे समर्थन मोदी यांनी या संदर्भात केले. मोदी कोणत्याही गोष्टीची फार हवा करतात अशी टीका त्यांच्यावर होते. त्या टीकेचा उल्लेख करीत मोदी यांनी हे समर्थन केले. त्यांचे हे विधान अर्धसत्य म्हणावे लागेल. यासाठी की एखाद्याची हवा झाली की अनुकूल वातावरणनिर्मिती होते, हे मान्य. परंतु त्या वातावरणनिमिर्तीला साजेशी कामगिरी न होणे हे भ्रमनिरास करणारे असते. तसे झाल्यास पुन्हा विश्वास संपादन करणे हे पहिल्यापेक्षा कठीण जाते, हेही लक्षात घेतलेले बरे. एखादा यशस्वी ठरला आणि तरी त्याची हवा झाली नाही तर त्याच्या यशाचा अपेक्षित परिणाम होत नाही. परंतु याउलट एखादा यशस्वी ठरेल, आमूलाग्र बदल करेल अशी हवा निर्माण व्हावी आणि प्रत्यक्षात त्याच्या हातून फारसे काहीच न घडता भरवशाच्या म्हशीच्या पोटी टोणगा निपजणे हे अतिवाईट. अमर्याद यशाची आशा दाखवून फारच काही थोडे साध्य करून दाखवण्यापेक्षा माफक यशाची हमी मिळणे आणि ते यश प्रत्यक्षात येणे हे अधिक चांगले आणि समाजासाठी उपयुक्त असते. मोदी यांच्या राजवटीत परदेशात भारताविषयी चांगले मत होऊ लागले आहे, असेही मानले जाते. या संदर्भात आवर्जून लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हे जे आपल्याविषयी बाहेर चांगले मत झाले असल्याचे मानले जाते ते प्रामुख्याने अनिवासी भारतीयांत. मोदी यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांत घेतलेले झळाळते मेळावे आणि परदेशस्थ भारतीयांवर केलेला सोयीसुविधांचा वर्षांव यामुळे त्यांना मोदी यांच्याविषयी ममत्व वाटणे साहजिकच आहे. परंतु म्हणून जगात सगळीकडेच भारताबाबत मतपरिवर्तन झाले आहे, असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल. ते तसे असते तर भारतात गुंतवणुकीचा ओघ मोठय़ा प्रमाणावर वाढला असता. तसा तो वाढणे सोडाच, अद्याप तो सुरूदेखील झालेला नाही. तेव्हा आपल्याविषयी चांगले मत झाले आहे असे आपणच म्हणण्यात अर्थ नाही आणि आपल्याच समारंभात बोलावलेले पाहुणेही तसे म्हणत असतील तर त्यात तथ्य नाही, याचे भान असलेले बरे.
पुढील काही वर्षांत भारत हा व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी सर्वात आदर्श देश असेल, सर्वाना तो हवाहवासा वाटेल, असे विधान मोदी यांनी या गुंतवणूक मेळाव्यात केले. म्हणजे सध्या हे वातावरण नाही, याचीच ही अप्रत्यक्ष कबुली म्हणावी लागेल. तेव्हा खरा बदल होईल तो मोदी यांना अपेक्षित असलेल्या सुधारणा प्रत्यक्ष दिसू लागल्यावर. त्या रेटणे हे त्यांच्याच हातात आहे. त्या त्यांनी लवकरात लवकर रेटाव्यात. या सुधारणांची प्रतीक्षा अपेक्षेपेक्षा फारच लांबली तर त्या घडवून आणण्याच्या मोदी यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तसे झाल्यास ते खुद्द मोदी, त्यांचा पक्ष आणि त्याहूनही मुख्य म्हणजे देशाला परवडणारे नाही. तोपर्यंत जनताजनार्दनाने या गुंतवणुकीच्या पतंगबाजीचा आनंद घ्यावा. नाही तरी गुजरातेतील गुंतवणूक मेळा आणि पतंगोत्सव हे एकाच वेळी साजरे होतात.