मुंबईच्या चित्रनगरीत मराठी चित्रवाणी मालिकांना  ‘एका वर्षांपेक्षा जास्त सूट मिळणार नाही!’ ही बातमी (लोकसत्ता, ५ फेब्रु.) वाचली. सध्या चालू असलेल्या मालिकांमध्ये ‘उंच माझा झोका’ ही एकमेव गुणवत्तापूर्ण मालिका असून तिच्या सादरीकरणातून प्रेक्षकांचे प्रबोधनही चांगल्या प्रकारे होत आहे. गुणवत्ता नि उपयुक्तता विचारात घेता ही मालिका नक्कीच सवलतीस पात्र आहे. असे असताना नि मुख्यमंत्री आपल्या अधिकारात सवलत द्यायला तयार असताना सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी आडमुठेपणा का करावा ते समजत नाही. त्यांच्या विरोधाला जातीयतेचा नि पक्षीय राजकारणाचा वास येतो.
– शरद कोर्डे, ठाणे.

‘फतवा’ म्हणजे काय?
काश्मिरात तेथील प्रमुख धर्मगुरू (ग्रॅण्ड मुफ्ती) बसरुद्दीन यांनी मुलींचा वाद्यवृंद करण्यासंबंधी नुकत्याच काढलेल्या फतव्यासंबंधात ‘इस्लामची इभ्रत’ हा अग्रलेख (४ फेब्रु.) वाचला व मुळात इस्लामनुसार ‘फतवा’ म्हणजे काय, हे थोडे स्पष्ट करणे आवश्यक वाटले म्हणून हे पत्र लिहीत आहे.
इस्लामनुसार, म्हणजेच कुराण व हदीसमधील शिकवणीनुसार किंवा आदेशानुसार, वागणे आपल्यावर बंधनकारक आहे असे सर्वच मुसलमान मानतात. कुराण हा सुमारे ४०० पृष्ठांचा एक ग्रंथ असला तरी हदीसचे वाङ्मय प्रचंड आहे. फक्त मान्यताप्राप्त सहा हदीस-संग्रह घेतले तरी त्याचे मासिक आकाराचे २६ खंड व सुमारे १५,००० पृष्ठे होतात. यामुळे एखादी गोष्ट इस्लामनुसार आहे की नाही हे या सर्व वाङ्मयातून शोधून काढणे हे सामान्य मुसलमानाच्या आवाक्याबाहेरचे असते. यासाठीच त्यांना धर्मपंडित (किंवा धर्मगुरू) लागतो. असा धर्मपंडित त्या त्या भागात लोकमान्यता प्राप्त झालेला असतो. तो धर्मपंडित म्हणजे पोप व चर्चसारखी एखादी केंद्रीभूत संस्था नसते. तिचा आधार फक्त लोकमान्यता हाच असतो. एखादी गोष्ट धर्ममान्य आहे का नाही यासंबंधी कोणीतरी त्याला प्रश्न विचारीत असतो. त्याचे उत्तर म्हणून तो फतवा (धर्मनिर्णय) देत असतो. तो त्याचा आदेश नसतो तर धर्माचा आदेश (धर्मादेश) काय आहे याचा निर्णय असतो. त्यासाठी तो कुराण वा हदीसमधील वचनांचे आधार देत असतो. तो निर्णय मानायचा की नाही हे मुसलमानांच्या मनावर असते. एकाच प्रश्नावर अनेक धर्मपंडित वेगवेगळे निर्णय देऊ शकतात. त्यातला कोणता मानायचा हे मुसलमानांनी ठरवायचे असते. स्वतच्या मनाने निर्णय न घेता धर्मपंडितांच्या निर्णयानुसार वागले पाहिजे, असा प्रेषितांचा आदेश आहे. (हदीस : सहिह बुखारी :  ७३०७, १५) धर्मपंडितांत मतभेद होऊ नयेत, असेही प्रेषितांनी सांगून ठेवले आहे. आपलाच निर्णय लोकांनी मानला पाहिजे यासाठी त्या धर्मपंडिताकडे कोणते पोलिसी वा सनिकी सामथ्र्य नसते. बसरुद्दीन यांनी दिलेला ‘फतवा’  अशा प्रकारचा मानला पाहिजे. त्यांनी नेमका शास्त्राधार कोणता दिलेला आहे हे माझ्या पाहण्यात नाही. पण त्यास शास्त्राधार दिलेला असणार हे उघड आहे.
आता प्रश्न असा की, प्रत्येक मुसलमानाने हा निर्णय स्वत:पुरता न ठेवता इतरांवर का लादायचा? यासाठी शास्त्राधार दिला जातो की इस्लामनुसार मुसलमानाने स्वत: चांगल्या गोष्टी करणे व वाईट गोष्टी टाळणे बंधनकारक आहेच; परंतु त्याचबरोबर दुसऱ्याला चांगल्या गोष्टी करण्यास व वाईट गोष्टी टाळण्यास भाग पाडणे हेही त्याच्यावर बंधनकारक आहे. कुराणात आदेश आहे की, ‘तुम्ही लोकांना सत्कर्म करण्यास लावले पाहिजे व दुष्कर्म करण्यास प्रतिबंध केला पाहिजे.’ ( ३ : ११०, ४ : ३१ : १७) हदीसनुसार प्रेषितांनी आदेश दिला आहे की, ‘तुम्ही लोकांनी इतरांना चांगली कम्रे करण्यासाठी व वाईट कम्रे टाळण्यासाठी भाग पाडले पाहिजे.’ (इब्न मजह : ४०१४)
 आता चांगली वा वाईट कृत्ये कोणती, हे कसे ठरवायचे? कुराणात अनेक ठिकाणी म्हटले आहे की, ‘कुराण हे चांगल्या व वाईट गोष्टींची कसोटी म्हणून अवतरलेले आहे.’ (२५: १, २: ५३) ‘अल्लाने जे अवतरित केले आहे त्यानुसारच निर्णय घ्या.’ (५: ४८) तेव्हा चांगल्या व वाईट गोष्टी कुराण व हदीसनुसार ठरविल्या पाहिजेत. त्याचा निर्णय धर्मपंडित देणार. त्यानुसार तो अमलात आणण्याचे दायित्व इस्लामने प्रत्येक मुसलमानावर टोकलेले आहे. त्यामुळे धर्मपंडिताचा तो निर्णय केवळ स्वत:पुरता न राहता दुसऱ्याच्या प्रतीच्या कर्तव्याचा भाग बनतोय तेव्हा धर्मगुरूला ‘निर्बुद्ध’ किंवा ‘अतिरेकी’ संबोधून हा प्रश्न समजणार नाही. एकूण प्रश्न समजण्यासाठी फतवा म्हणजे काय व तो अमलात येण्याची प्रक्रिया कोणती हे वरीलप्रमाणे समजून घ्यावे लागते.
– शेषराव मोरे, नांदेड</strong>

अभिव्यक्तीचे पाय खेचण्याचे काम
नव्याने उभ्या राहणाऱ्या काश्मिरी तरुणांना एका धार्मिक अहंकारापोटी माघार घ्यावी लागते, यावरून धार्मिक मक्तेदारी अजून किती काळापर्यंत राहील, असा प्रश्न पडतो. कोणत्याही धर्माचा संगीताला विरोध नाही. जरी पाश्चात्त्य संगीत अनेकांनी स्वीकारलेले नसले तरी काश्मिरी मुलींचा बॅण्ड हा अश्लील वा उडाणटप्पू आहे, असे किमान या मुलींनी जे धैर्य दाखवले, त्यावरून तरी वाटत नाही.
काश्मीरच्या मुलींचा बॅण्ड हे ऐकताच आश्चर्य वाटते, कारण गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये शांतता नाही आणि त्यातही काश्मीरमधील तरुणी हा नेहमी अपवादाची बाब होती व आहे. संपूर्ण भारत करमणुकीच्या माध्यमातून व्यक्त होत असतो, आपापल्या परीने आनंद मिळवत असतो. पण जेव्हा या मुलींच्या तसेच यांसारख्या तरुणांच्या कलाकृतीला बंधने घालणारा धर्माचा पडदा मधे येतो तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्राच्या प्रश्न उपस्थित होता. आज भारतात तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. महासत्तेच्या वाटेवर असून सुद्धा ‘धर्म’ नावाची संकल्पना ही भारतातील अनेकांच्या अभिव्यक्तीचे पाय खेचताना नेहमी दिसते.
– मोहिनी धुमाळ, ठाणे.
(‘इस्लामची इभ्रत’ या अग्रलेखाच्या आशयाशी (६ फेब्रु.) सहमत होऊन अन्य मतप्रदर्शन करणाऱ्या प्रतिक्रिया हृषीकेश वाकडकर (नाशिक), केदार अरुण केळकर (दहिसर), वसंत ठाकूर (नाटे), गोविंद यार्दी (नाशिक), भूषण राऊत यांनीही पाठविल्या आहेत).

तेव्हा शिवसेनेचे पुढारी कुठे व्यग्र होते?
शिवसेनाप्रमुख तथा हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या उद्यानरूपातील स्मारकास बृहन्मुंबई महापालिकेची अखेर मंजुरी मिळून स्मारकाच्या नियोजित स्थळाचे, शिवाजी पार्कमध्ये, भूमिपूजन योग्य वातावरणात पार पडले हे चांगले झाले. परंतु त्या प्रसंगी काही प्रमुख शिवसेना नेत्यांची गरहजेरी माझ्या मनाला खटकली. दोन महिन्यांपूर्वी ‘एकही वीट हलवू देणार नाही,’ अशी गर्जना करणारी पुढारी मंडळी त्या प्रसंगी कुठे व्यग्र होती?
– मुरली पाठक, विलेपार्ले

कुरघोडीचे प्रदर्शन
सन २०१४ च्या निवडणुकीचे वेध आता सर्वच पक्षांना लागले आहेत.. आपलाच पक्ष सत्तेत येणार व आमचाच पंतप्रधान  होणार याची स्वप्ने सर्वच पक्षांना पडू लागणे साहजिकच आहे; परंतु जो पक्ष गेली कित्येक वर्षे गुडघ्याला बािशग बांधून तयार आहे, त्या पक्षातील  केंद्रीय व अन्य नेते कुरघोडीचे ओंगळवाणे प्रदर्शन का करीत आहेत ? ..तेही, अजून कशाचा कशाला पत्ता नसताना! अशा वेळी ‘बाजारात तुरी..’ सारख्या म्हणींची सत्यता पटते!
– सुरेश डुम्बरे, मुंबई</strong>

बदललेल्या मानसिकतेच्या मागे जाऊ नका..
‘इस्लामची इभ्रत’ हा (६ फेब्रु.) विहिंप, बजरंग दलाच्या सुरात सूर मिसळणारा अग्रलेख होता.. हिंदू पंडितांनी एखादे वक्तव्य केल्यावरच गहजब माजतो व इस्लामी मौलवींबद्दल मात्र सर्वानीच मौन बाळगलेले दिसते असे आपण म्हणता;  पण धर्मनिरपेक्षतेची बाजू घेणाऱ्या प्रत्येक बुद्धिवंताने याचा निषेधच केला आहे. अगदी प्रत्येक वाहिनीवर. (याउलट, तोगडियांनी हैदराबाद येथील भाषणात यापूर्वी झालेल्या मुस्लिम नरसंहारांचे समर्थन केले त्याविरोधात काही सन्माननीय अपवाद वगळता एक अक्षरही कोणी बोललेले नाही, या भाषणाची लिंक https:// http://www.youtube.com/watch?v=gN4keFMJpkQ)
‘पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त मुसलमान राहतात आणि ते पाकिस्तानपेक्षा भारतातच अधिक सुरक्षित आहेत अशा शब्दांत यापकी कोणी पाकिस्तानला ठणकावल्याचे दिसणार नाही,’ असे आपण म्हणता; पण मराठीत वृत्तपत्रीय  लेखन करणाऱ्या अनेकांनी हेच मत वारंवार प्रदíशत केले आहे.
लोकांची बदललेली मानसिकता काही दिवसांपासून ठळकपणे दिसून येत आहे. मुस्लिम समाजाबद्दल कायमच संशयाचे वातावरण तयार करणाऱ्यांना ‘लोकसत्ता’ने खाद्य पुरवावे, याचे वाईट वाटते.
– समीर शेख