पुणे-मुंबई जलदगती महामार्गावर दिसणाऱ्या भव्य अक्षरांतली ‘सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम’ ही अक्षरे डोळ्यांना चुकवता येत नाहीत. घरांच्या बांधकामापासून ते आयटी उद्योगापर्यंत आणि मोटार रेसपासून ते क्रिकेटपर्यंत अनेक उद्योगांमध्ये हातपाय पसरलेल्या या उद्योगाला भांडवलाचा पुरवठा कसा आणि कोठून होतो, याबद्दलचे गूढ दिवसेंदिवस वाढत असतानाच आयपीएल सामन्यांमध्ये या उद्योगाने विकत घेतलेल्या ‘पुणे वॉरियर्स’ या संघाची हकालपट्टी करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केला आहे. सहारा उद्योग समूहाने ट्वेन्टी-२० सामन्यात आपले अस्तित्व दाखवण्यासाठी जो संघ तयार केला, त्याने आजवर कधीच चमकदार कामगिरी केली नाही. केवळ क्रिकेटमध्येही आपण कुठे तरी असले पाहिजे, या हट्टाखातर या उद्योगाने पुण्याचा संघ तयार केला. सहाराचा आणि पुण्याचा तसा ‘अर्थाअर्थी’ही फारसा संबंध नाही. तरीही गहुंजे येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्टेडियमला या समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय सहारा यांचे नाव देण्यात आले. असे नाव त्यांच्या कार्यक्षेत्रातील एखाद्या स्टेडियमला दिले गेले असते, तर या सहारा यांना शांती लाभली असती. परंतु दूरगावीच्या कोणत्या तरी ठिकाणच्या आपल्या नावासाठी या समूहाने फारसे काही मनापासून केलेले नाही. गहुंजे येथील हे स्टेडियम अद्याप पूर्णावस्थेत नसल्याचे सांगण्यात येते. या स्टेडियमपर्यंत पोहोचणे हे एक दिव्य कर्म असते. जलदगती महामार्गाला लागून असलेल्या या ठिकाणी महामार्गावरूनच वाट करून द्यावी, अशी फाजील मागणी पूर्वी करण्यात आली होती. ती मान्य झाली असती, तर या महामार्गावरील अपघातांनी राष्ट्रीय उच्चांक केला असता. तरीही ज्या मार्गाने या स्टेडियमपर्यंत जाता येते, तो मार्ग म्हणजे वाहनचालकांची परीक्षा असते. चिंचोळ्या रस्त्यांवरून तेथे पोहोचण्यासाठी मनाला सतत सावरावे लागते आणि तरीही वाहन ठेवण्यासाठी जागा शोधण्यात आणि तेथे सुरक्षितपणे ते ठेवण्यात येणाऱ्या अनंत अडचणींमुळे सामना सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट रसिकांचे मनोधैर्य खचलेले असते. अशा सामन्यांच्या वेळी तेथे पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने स्वत:चे वाहन घेऊनच जाणे भाग पडते. एका जागी काही हजार माणसांना बसण्याची उत्तम व्यवस्था करता येते, तर त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था का करता येत नाही, असा प्रश्न प्रत्येक क्रिकेटप्रेमी मनातल्या मनात विचारत सामना पाहतो. सुब्रतो रॉय यांना त्या हजारोंच्या अडचणींशी फारसे घेणे देणे नसावे, असे परिस्थितीत बदल होत नसल्याने दिसते. क्रिकेट हा खेळ नसून ती एक करमणूक आहे      आणि करमणुकीच्या नावाखाली करता येणारा मोठा उद्योग आहे, हे लक्षात येताच, ज्यांनी ज्यांनी त्यात उडी घेतली, त्यात खरे तर या सुब्रतो रॉय  यांनी आघाडी घ्यायला हवी होती. परंतु ते उशिराने पोहोचले आणि ज्या संघाच्या भाळी केवळ पराभव एवढीच अक्षरे लिहिली आहेत, अशा संघात घुसले. त्याने ना संघाला फायदा झाला, ना सुब्रतो रॉय यांना. सामने कमी झाल्याने तोटा झाला, अशी कारणे देऊन त्यांनी बँक हमी देण्यास नकार दिला आणि म्हणूनच त्यांची हकालपट्टी झाली. त्यामागे राजकारण आहे, असे सहारा सांगत असले, तरीही खरे कारण धंदा चालत नाही हे आहे. सहारा उद्योगाला  क्रिकेटमध्ये खरेच किती रस आहे, हेही त्यामुळे सिद्ध झाले.