भारतीय जनता पक्षाच्या पणजीतील बैठकीत हारतुरे, फुलांचा वर्षांव झाला, पण बैठक संपण्याआधीच ही फुले कोमेजूनही गेली. सकाळी व्यासपीठावर उजळलेले चेहरे संध्याकाळी काळवंडले. आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी पाहिजे असलेला नेमका चेहरा मिळाला आणि ज्या चेहऱ्याच्या बळावर पक्ष बांधला, निवडणुकांमधील जयपराजय पचविले तो चेहरा गमावला अशा दुहेरी घटनांमुळे पक्ष पुन्हा एकदा संभ्रमावस्थेत गेला. महाराष्ट्रातील भाजपमध्येही मोदी यांच्या निवडीनंतर उत्साह उमलू लागलेला असतानाच, अडवाणींच्या राजीनाम्यानंतर पुन्हा उदास वारे वाहू लागले होते. पण ही उदासीनता घालवण्यासाठी नेमकी हीच वेळ निवडून महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या बहुप्रतीक्षित अध्यक्षाची निवड जाहीर करून टाकली आणि मोदी-अडवाणी प्रकरणातून उफाळलेल्या संभ्रमामुळे थंडावलेल्या पक्ष संघटनेस हालचालीसाठी टॉनिक दिले. मुंबईच्या शहराध्यक्षपदी अॅडव्होकेट आशीष शेलार यांची नियुक्ती होणार, हे गेल्या काही महिन्यांपासून जवळपास ठरलेलेच होते. अडवाणींच्या राजीनाम्याच्या सावटातच त्यावर शिक्कामोर्तब करून, ‘शो मस्ट गो ऑन’ असा संदेश कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. ही उदासीनता नसती, तर शेलार यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत आणि जल्लोष करून आनंद साजरा केला असता. पण पक्षात अभूतपूर्व शांतता पसरलेली असताना मुंबईत शेलार यांची आणि पुण्यात अनिल शिरोळे यांची निवड करून लहानमोठय़ा नाराजीची बीजेदेखील उरणार नाहीत याची दक्षता फडणवीस यांनी घेतली. पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील जे नाराजीनाटय़ पणजी बैठकीपाठोपाठ चव्हाटय़ावर आले, तशा नाराजीनाटय़ाचे अनेक लहानमोठे अंक महाराष्ट्र भाजपमध्ये सातत्याने सुरू आहेत. पक्षबांधणीची आणि वाढविण्याची जबाबदारी असलेल्या ज्येष्ठांमध्येच नाराजी धुमसत असताना त्याही परिस्थितीत कार्यकर्ता जोडून ठेवणे आणि त्याला कार्यक्रम देणे ही आणखी एक कसरत असते. अशा वेळी, पदांवरील नियुक्त्या ही आणखीनच नाजूक बाब होऊन बसते. मुंबई आणि पुण्याच्या शहराध्यक्ष निवडीला असाच नाजूक कंगोरा होता. तो नेमकेपणाने हाताळला गेला नसता, तर पणजी नाटय़ापाठोपाठ महाराष्ट्रातही पणजी आणि दिल्लीतील नाराजीनाटय़ाची छोटेखानी पुनरावृत्ती आणि नेत्यांच्या मनधरणीचे प्रयोग सुरू करावे लागले असते. मुंबई-पुण्यात शेलार आणि शिरोळे यांच्या नियुक्त्या करून नाराजी आणि मनधरणीचे प्रयोग टाळण्याचा ‘फडणवीशी मुत्सद्दीपणा’ प्रदेशाध्यक्षांनी दाखविला आहे. नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या काळात त्यांचे कडवे समर्थक आणि गोपीनाथ मुंडे यांचे विरोधक असलेले आमदार विनोद तावडे यांचे आशीष शेलार हे खंदे शिलेदार मानले जातात, तर शिरोळे हे गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जातात. दिल्लीतील नाराजीनाटय़ सुरू असतानाच हा समतोल साधत फडणवीस यांनी गडकरी-तावडे आणि गोपीनाथ मुंडे अशा दोन्ही गटांना संतुष्ट केले आणि दिल्लीतील घडामोडींमुळे हातपाय गाळून न बसता कामाला लागावे, असा संदेशही दिला. दोन दिवसांतील अनपेक्षित घडामोडींमुळे पक्षासमोर उभ्या राहिलेल्या नव्या आव्हानांचा सामना करणे हे या नव्या अध्यक्ष द्वयीसमोरील नवे आव्हान असेल.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2013 रोजी प्रकाशित
शो मस्ट गो ऑन..
भारतीय जनता पक्षाच्या पणजीतील बैठकीत हारतुरे, फुलांचा वर्षांव झाला, पण बैठक संपण्याआधीच ही फुले कोमेजूनही गेली. सकाळी व्यासपीठावर उजळलेले चेहरे संध्याकाळी काळवंडले. आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी पाहिजे असलेला नेमका चेहरा मिळाला आणि ज्या चेहऱ्याच्या बळावर पक्ष बांधला, निवडणुकांमधील जयपराजय पचविले तो चेहरा गमावला अशा दुहेरी घटनांमुळे पक्ष पुन्हा एकदा संभ्रमावस्थेत गेला.

First published on: 12-06-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show must go on