21 February 2019

News Flash

अखेरचे १३३ दिवस ..ते आजतागायत!

गांधीजींच्या हत्येबद्दल बरेच लिहिले गेल्यानंतरसुद्धा मकरंद परांजपे यांच्या, जानेवारी २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात निराळेपणा आहे.. हे पुस्तक वाचल्यानंतर, केवळ निराळेपणाचे वर्णन न करता

| March 28, 2015 12:38 pm

गांधीजींच्या हत्येबद्दल बरेच लिहिले गेल्यानंतरसुद्धा मकरंद परांजपे यांच्या, जानेवारी २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात निराळेपणा आहे.. हे पुस्तक वाचल्यानंतर, केवळ निराळेपणाचे वर्णन न करता पुस्तकाच्या हेतूपाशी जाऊ पाहणारा लेख..
    
काळाच्या गरजेनुरूप आलेले परंतु केवळ तत्कालीनदृष्टय़ा महत्त्वाचे नसलेले पुस्तक म्हणून मकरंद आर. परांजपे यांच्या ‘द डेथ अ‍ॅण्ड आफ्टरलाइफ ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाची नोंद घ्यावीच लागेल. केवळ गांधीजींचे जीवनच समजून घेण्याचा नव्हे तर त्यांच्या मृत्यूतूनही भारत या राष्ट्रनिर्माणाची संकल्पना समजून देण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकातून यशस्वीपणे केला आहे.
उपोद्घात आणि उत्तरोद्घातासह एकंदर पंचवीस निबंधांचा संग्रह असलेले हे पुस्तक दोन भागांत विभागलेले आहे. पहिल्या भागात मुख्यत: विविध दृष्टिकोनांतून आणि पातळ्यांवरून केलेली गांधीहत्येची चिकित्सा असून दुसऱ्या भागात गांधींच्या आयुष्यातील शेवटच्या १३३ दिवसांतील दिल्लीतील वास्तव्यातील घटना, वक्तव्ये आणि प्रार्थनासभांतील भाषणांतील उद्धरणांचा समावेश आहे.
‘महात्म्याचे हौतात्म्य हा महाप्रचंड आणि प्रतापी असा लव्ह-जिहाद होता- विद्वेष आणि रक्तपात थांबविण्यासाठी त्याने मृत्यू पत्करला. आपण एकमेकांचा जीव घेणे थांबवावे म्हणून त्याने आपल्याला जीवन दिले,’ असे म्हणून उपोद्घातात लेखक लिहितो की, गांधीजींच्या खुनाची चिकित्सा केल्याशिवाय तत्कालीन भारत वा हिन्दुइझम समजून घेता येणार नाही. गांधींचे उदात्तीकरण करून, स्तोम माजवून वा त्यांची स्मारके उभारून त्यांच्या हत्येने बसलेला धक्का वा क्षुब्धता नाकारता येणार नाही. जर आपल्याला राष्ट्राच्या जन्माच्या वेळी झालेल्या फाळणी आणि गांधीहत्या या दोन खोल जखमा भरून काढायच्या असतील तर गांधीजींच्या खुनामुळे निर्माण झालेली क्षुब्धता नाकारण्या-  किंवा विसरण्याऐवजी त्या घटनेत असलेले बदल घडवून आणण्याचे प्रचंड सामथ्र्य समजून घेतले पाहिजे.
‘हू किल्ड गांधी?’ या प्रकरणामध्ये लेखकाने गांधींना कोणी मारले, या प्रश्नापेक्षा गांधींनी कशासाठी मृत्यू पत्करला हे समजून घेणे आवश्यक का आहे, हे सांगितले आहे. कपूर कमिशनने काढलेल्या निष्कर्षांची चर्चा करताना सरदार पटेल, मोरारजी देसाई, दिल्लीचे सरकार, मुंबई सरकार यांनाच लेखक गांधीजींच्या खुनासाठी जबाबदार धरत नाही तर ज्यांच्यासाठी गांधींनी आयुष्यभर कार्य केले त्या दलित, मुस्लीम, महिला आणि विभाजनवादी मुसलमानांनी गांधींना ज्या िहदूंचे नेते म्हटले होते, त्या िहदूंना म्हणजेच जवळजवळ सर्व देशालाच जबाबदार धरले आहे. या काळात या सर्वानीच गांधींकडे पाठ फिरवली होती.
‘..आणि मग मी दबके, निस्तेज आणि काळ्या धुराच्या स्फोटांचे चार आवाज ऐकले. हे काय आहे? मी बॉबला चमकून, भयभीत होऊन विचारले. ‘मला माहीत नाही,’ तो म्हणाला. क्षणार्धात तो फिका पडल्याचे मला आठवते. ‘महात्मा नसला पाहिजे!’ मी म्हणालो आणि नंतर मी जाणले होते.’’ अमेरिकन पत्रकार व्हिन्संट शीनचे गांधीहत्येचे वर्णन मुळातूनच वाचायला हवे. याच प्रकरणात गांधींपासून जवळच उभ्या असलेल्या आणि नथुरामने ढकलून बाजूला करताना पडल्यावर उठत असलेल्या मनुने केलेले, ‘नथुरामला प्रतिनमस्कार करण्यासाठी दोन्ही हात वर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, नथुरामच्या गोळ्या छातीवर झेलत ‘हे राम!’ म्हणत खाली कोसळणाऱ्या’’ गांधींचे वर्णनही वाचायला हवे.
‘द मेमोरिअलायझेशन’ या प्रकरणात दिल्ली हे शहर जसे राजांचे आहे तसेच त्यांच्या थडग्यांचेही आहे असे म्हणून दिल्लीतील अनेक स्मारकांची आठवण लेखक करून देतो. यातील राजांची बहुतेक स्मारके दुर्लक्षित असल्याचे लेखक नमूद करतो. परंतु दोन व्यक्तींची अनेक स्मारके दिल्लीभर आहेत : एक गुरू तेग बहादूर आणि दुसरे महात्मा गांधी. गुरू तेग बहादूर राजे आणि आध्यात्मिक गुरूही होते. गांधीजीही नेते आणि धर्म जाणणारे होते, हे लेखक आवर्जून नमूद करतो.
आपल्या विद्यार्थासमवेत लेखकाने एकाच दिवशी दिल्लीतील गांधीजींच्या स्मारकांना भेट दिली. राजघाटावर गांधी समाधीचे दर्शन घेतल्यावर तेथील हिरवळीवर बसून देशाच्या विविध प्रांतांतून आलेल्या आपल्या विद्यार्थ्यांशी हास्य-विनोद करताना आणि त्यांच्या भाषेतील गाणी ऐकताना, त्या ठिकाणी सहलीसाठी आलेल्या सरकारी शाळेतील मुलांना राजघाटाच्या हिरवळीवर नाचता-गाताना आणि एकमेकांशी भांडण करीत घसरगुंडी खेळताना पाहून लेखक लिहितो,‘‘त्याच क्षणी मी स्वतंत्र देश असणे म्हणजे काय असते ते समजलो. अगदी सर्वसामान्य माणसे आणि त्यांची मुलेही तेथे विखुरलेल्या राष्ट्रपित्याच्या अस्थींवर नाचू-बागडू शकतात. स्वतंत्र असणे म्हणजे आपल्याला जे आवडीचे असेल ते करता येणे नव्हे, तर आपण खरोखरच आपल्या देशाचे मालक असणे.’ हेच स्वातंत्र्य गांधींनी भारतीयांना दिले.
‘त्यांनी स्वत:ला पाकिस्तानचे पिता म्हणून सिद्ध केले. केवळ या एकाच कारणाने भारतमातेचा एक कर्तव्यतत्पर पुत्र म्हणून माझे कर्तव्य निभावण्याच्या उद्देशाने, माझ्या मातृभूमीची फाळणी करण्यात मोठी भूमिका निभावणाऱ्या तथाकथित राष्ट्रपित्याला संपविण्याचा निर्णय मी घेतला.’
नथुरामच्या न्यायालयातील हा जबाबच त्याचे कृत्य म्हणजे पितृहत्या आहे ही गोष्ट सिद्ध करण्यास पुरेसा आहे, असे नमूद करून भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांच्या आधारे गांधीहत्येची चिकित्सा पुढील काही प्रकरणांमध्ये करताना ज्या गीतेच्या आधारे नथुराम आपल्या कृत्याचे समर्थन करतो तो आधार कसा फोल आहे हे लेखकाने गीतेच्या आधारानेच सांगितले आहे. गीतेचा कर्मयोग निष्काम कर्मयोग आहे. त्याचबरोबर गीता कुणाला दुसऱ्याचे प्रमाद निश्चित करून त्याला शिक्षा देण्याचा अधिकार देत नाही व फळाची अपेक्षा न धरता स्वत:चे कर्तव्य निभावण्यास सांगते. अत्यंत काळजीपूर्वक योजलेला, निर्दयपणे अमलात आणलेला आणि िहदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी केलेला राजकीय विरोधकाचा खून ही गोष्ट फळाच्या अपेक्षेने केलेली नाही असे कसे म्हणता येईल? हा लेखकाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर पितृहत्येचे समर्थन कोणतेच भारतीय तत्त्वज्ञान करीत नाही हे लेखक सप्रमाण दाखवून देतो.
फ्राइडच्या कामशास्त्रातील ओडिपस कॉम्प्लेक्समध्ये गांधीहत्येची चिकित्सा करून गांधीहत्या भारतीय परंपरेच्या विरोधी असल्याचे लेखक सांगतो.
‘द महात्माज एंडगेम’ या प्रकरणात लेखक लिहितो की, आपल्या मृत्यूची चाहूल गांधीजींना लागली होती असेच नव्हे तर नथुरामच्या हातून आपला मृत्यू घडवून आणण्याच्या योजनेची जणू पटकथाच गांधीजींनी नथुरामबरोबर लिहिली होती. आपल्या हत्येच्या दोन दिवस आधी त्यांनी मनुला सांगितले होते की,‘जर मी एखाद्या रोगाने मेलो वा छोटय़ाशा पुटकुळीने मेलो, तर तू साऱ्या जगाला मी खोटा महात्मा असल्याचे ओरडून सांगशील.. आणि जर गेल्या आठवडय़ात झाला तसा एखादा स्फोट झाला, वा जर माझ्यावर कोणी गोळी झाडली आणि ती गोळी मी माझ्या उघडय़ा छातीवर दु:खाचा उसासा न काढता, ओठावर रामनाम घेत झेलली, फक्त तरच तू मी खरा महात्मा होतो असे म्हणू शकतेस.’
गांधीजींनी उच्चारलेले शेवटचे शब्द ‘हे राम!’ नव्हते हा गांधींच्या टीकाकारांचा दावा अन्य पुराव्याने खोडून काढून लेखक लिहितो, ‘आपण सनातनी िहदू असू वा सेक्युलॅरिस्ट, गांधी आपल्याला त्यांच्या जीवन आणि मृत्यूचे ध्यान करायला लावून, ते ज्यासाठी जगले आणि ज्यासाठी जाणीवपूर्वक मेले, त्या गोष्टी नष्ट करायची नथुरामची योजना सिद्धीस जाऊ देत नाहीत.’
‘माय लाइफ इज मेसेज’ हे गांधीजींचे प्रसिद्ध वचन आहे. परंतु लेखकाने ‘माय डेथ इज माय मेसेज’ असे समर्पक नाव दुसऱ्या भागाला दिले आहे.
या भागात िहदू आणि शीखधर्मीयांना िहसेपासून दूर राहण्यासाठी केलेली आवाहने आहेत. गांधीजींचे पाच दिवसांचे उपोषणही याच भागात येते. मुसलमानांच्या हत्या करू नका अशी ही आवाहने आहेत, पण प्रत्यक्षात िहदू आणि शीख धर्म वाचविण्याची आवाहने गांधी करीत आहेत. ते म्हणतात, ‘मी तुम्हाला िहदू आणि शीख धर्म वाचवायला सांगत आहे.’
दिल्लीत शांतता निर्माण करून त्यांना हीच गोष्ट पंजाबात करायची होती. ‘दिल्लीतले मुसलमान शांततेत राहतील तर त्याचे बक्षीस मी पंजाबात मागेन.’ अशी आर्जवे करताना गांधी पाकिस्तानचे हेतूही जाणून असल्याचे आणि त्यांचे शांतीचे आवाहन दुबळेपणा नसल्याचे लेखक ‘आता त्यांनी पाकिस्तान मिळवले म्हणून त्यांना भारतही हवा आहे काय? तो त्यांना कधीच मिळणार नाही.’ हे गांधींचे वचन उद्धृत करून दाखवून देतो.
‘गांधी अ‍ॅट अ‍ॅन आरएसएस रॅली’ या प्रकरणात गांधी आणि गुरुजींचे संभाषण, अस्पृश्यता निवारण हा िहदू धर्म वाचविण्याचा उपाय इत्यादी संदर्भ आले आहेत. या प्रकरणाचा शेवट ‘म्युझिक ऑफस्पििनग व्हील’ या सुधींद्र कुलकर्णीनी ‘‘जसा संघ गांधींना कमी अस्पृश्य मानू लागला तसा तो भारतीय जनतेत मान्यता पावू लागला’’ या निरीक्षणाने केला आहे.
‘द आर्ट ऑफ डाइंग’ हे अत्यंत हृदयस्पर्शी प्रकरण आहे. गांधीजींना मुस्लीमधार्जिणे म्हणणाऱ्यांनी त्यांचे ९ जानेवारी १९४८ च्या प्रार्थना सभेतील ‘आपण मृत्यूला घाबरता कामा नये. जर कुणी इस्लामचा स्वीकार करा वा मरण, असे सांगितले तर आपण मरणाची निवड करायला हवी’ हे वक्तव्य वाचायला हवे.
एका पत्राला उत्तर देताना गांधी लिहितात, ‘अिहसक माणसाचा मृत्यू नेहमीच योग्य परिणाम घडवून आणतो.’ आणि तेच परिणाम सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
‘भारताची फाळणी केली म्हणून नव्हे, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले म्हणून नव्हे, तर लाहोरचा सूड हा महात्मा दिल्लीत घेऊ देत नव्हता म्हणून गांधी मेला,’ हा स्पष्ट संदेश हे पुस्तक देते.
गांधींबद्दलचा आदर लेखक लपवीत नाही आणि नथुरामबद्दल अनादरही दाखवीत नाही. ज्यांना गांधीहत्या घृणास्पद कृत्य वाटते, ती घृणा नेमकी कशाची करावी हे समजून घेण्यासाठी आणि जे गांधीहत्या हे एक परमपवित्र कृत्य समजतात, त्यांना ही कृती कशी िहदू संस्कृतीविरोधी आहे, गीताविरोधी आहे आणि परमपवित्र नसून पितृहत्येचे पातक आहे, हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

*द डेथ अँड आफ्टरलाइफ ऑफ महात्मा गांधी
लेखक : मकरंद आर. परांजपे
प्रकाशक: रँडम हाऊस पब्लिशर्स इंडिया लिमिटेड
पृष्ठे:  ३३०, किंमत : ५९९ रु.

First Published on March 28, 2015 12:38 pm

Web Title: the death and afterlife of mahatma gandhi
टॅग Mahatma Gandhi