‘जे आल्फ्रेड प्रुफॉकचे प्रेमगीत’ ही इलियटची कविता जून १९१५ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली.. तेव्हापासून आजतागायत, ती कविता आणि इलियट हा कवी ‘आधुनिक’च मानले जातात. पण या आधुनिकतेच्या पलीकडेही काही पदर असतील.. ते इलियटच्या काव्य/समीक्षा प्रवासाकडे पाहून उलगडणारी नोंद.
इंग्रजीतला आधुनिक कवी टी. एस. इलियटची पहिली कविता प्रसिद्ध झाल्याला आता १०० वष्रे झाली. ‘लव्ह साँग ऑफ जे. आल्फ्रेड प्रुफॉक’ (‘जे. आल्फ्रेड प्रुफॉकचे प्रेमगीत’) ही त्याची कविता १९१४च्या सप्टेंबरमध्ये त्याने लंडनमध्ये एझरा पाऊंडच्या हवाली केली. पाऊंडसारख्या कवी-संपादकाने या कवितेचे सामथ्र्य ओळखले आणि ती ‘पोएट्री’ मासिकात जून-१९१५च्या अंकात प्रसिद्ध करवून घेतली. त्या अगोदर ती दोनदा त्याच मासिकातून हॅरियट मन्रो हिने परत पाठवली होती. त्यावरून त्याचे तिच्याशी भांडण झाले होते. इंग्रजी काव्यातील आधुनिकतावादाचा जनक मानला जाणारा एझरा पाऊंड हा इलियटचा मित्र. पुढे त्यानेच इलियटचे ‘द वेस्टलँड’ हे दीर्घकाव्य संपादित केले. हा पाऊंड म्हणत असे की, ‘इलियटने स्वत:हून आधुनिकता आत्मसात केली होती.’ म्हणजे काय? यासाठी इलियटची कविताच पुन्हा पाहावी लागेल!
प्रुफॉकच्या प्रेमगीताच्या पहिल्या ओळी अशा आहेत-
‘चल येतेस का माझ्याबरोबर
क्षितिजावर सायंकाळ पसरली असताना
एखाद्या ऑपरेशन टेबलवरच्या भूल दिलेल्या रुग्णाप्रमाणे..’
या ओळींनी वाचकांना कोडय़ात टाकले. ‘काचेवर पाठ घासणारे धुके’ किंवा ‘पिवळ्या धुराला आहे वेळ भरपूर’ अशा प्रतिमा त्या काळच्या सांकेतिक कवितेला छेद देणाऱ्या होत्या. आज अशा प्रतिमांचे काही वाटत नाही. किंबहुना त्या आता सरधोपट वाटतात. पण या साऱ्याची सुरुवात इंग्रजीत तरी इलियटने केली. ‘मॉडर्न मास्टर्स’ या मालिकेमध्ये स्टीफन स्पेंडर या कवीने इलियटचे चरित्र लिहिले आहे. त्याच्या सुरुवातीच्या प्रकरणात तो म्हणतो की, आधुनिक मानवाचे चतन्यविहीन रूप दाखवणारी कविता इलियटने लिहिली. काळाची पुनरावृत्ती, अभिजात संगीताप्रमाणे एका थीमचा विस्तार, दिसणारे वास्तव आणि आभास, मानवी हतबलता, सर्जनाचा आनंद, मध्यमवर्गीय जगण्याकडे उपरोधाने पाहणे हे सारे त्याच्या कवितेत आढळते. संगीताच्या प्रभावामुळे अनेक कवितांच्या शीर्षकांत तो त्यातील परिभाषा वापरतो (उदा. प्रिल्यूड, ऱ्हॅप्सडी). त्या काळात विकसित होत असलेल्या चित्रपट-कलेतील, एक दृश्य धूसर होऊन दुसरे येणे किंवा ‘कॅमेऱ्याच्या नजरेने पाहणे’ हे तंत्रही त्याच्या कवितेत येते.
चार्ल्स बॉद्लेअर, आर्थर रिम्बॉ, मालार्म, ल फॉर्ग या फ्रेंच कवींनी यासारखी कविता लिहिली होती. बॉद्लेअरने गटारे, चिखल, रक्तमांस, मानवी विकार यांमधील ‘सौंदर्य’ पहिल्यांदा कवितेत आणले.  विसाव्या वर्षी इलियटने हे सारे वाचले. अर्थात, त्याआधी जुनी ग्रीक, लॅटिनपासून जर्मन आणि फ्रेंच अशा अनेक भाषांचा त्याचा अभ्यास होता. होमरपासून दान्तेपर्यंतची महाकाव्ये त्याने अभ्यासली होती. त्या अर्थाने तो पंडित कवी होता. अनेकदा त्याला फ्रेंच भाषेत ओळी सुचत. हे सारे (आधुनिकपूर्व) संस्कार त्याच्या नंतरच्या कवितांमधूनही दिसतातच.
‘प्रुफॉक’ कवितेचा नेमका अर्थ लावणे जगातील समीक्षकांना गेल्या १०० वर्षांत कठीण वाटते आहे. पण दुर्बल व्यक्तिमत्त्वाचा हा नायक लंगिक इच्छेबाबत स्वत:शी किंवा इतर कोणाशी तरी बोलत आहे, इतके वाचताना पटते. ‘मी माझे आयुष्य कॉफीच्या चमच्यांनी मोजले आहे,’ असे तो एका ठिकाणी सांगतो. मानवी भंगुरता आणि पराभूत मनोवृत्ती त्याने पहिल्यांदा नीट चित्रित केली, असे म्हणता येईल.
१९२२ मध्ये वेस्टलँड ही कविता प्रसिद्ध झाली. तिच्याबरोबरच नोट्स ऑन वेस्टलँड हा कवितेतल्या संदर्भाबद्दलचा टिपासंग्रह छापण्यात आला. फ्रेझरच्या ‘गोल्डन बो’ या वास्तुविद्या आणि इतर संस्कृतीनिदर्शक ग्रंथांचा आपण वापर केला, असे सुरुवातीला इलियटने लिहिले आहे. ग्रीक काव्ये, शेक्सपिअरची नाटके, बॉद्लेयरचे फ्लूअर्स द्यू मॉल, दान्तेचे महाकाव्य, पारंपरिक गीते, बौद्ध धर्मग्रंथ असे विपुल संदर्भ त्याने कवितेत वापरले आहेत. तरीही टिपा वाचून कविता कळतेच असे नाही. ४३३ ओळींची ‘वेस्टलँड’ कविता पाच भागांत आहे.
‘एप्रिल आहे फारच क्रूर महिना
जो प्रसवतो मृत जमिनीतून लिलीच्या फुलांना
अन् मिसळतो वासनेला स्मरणात ढवळत
मंद मुळांना वसंतवर्षांवात’
अर्थातच या ओळींमधली दुबरेधता वाचकाची कसोटी पाहणारी आहे. वेस्टलँडनंतरच्या त्याच्या चार कविता ‘फोर क्वार्टेट्स’ या नावाने १९४३ मध्ये प्रसिद्ध झाल्या. इलियटला स्वत:ला या कविता अधिक पसंत होत्या. त्यातील ‘बर्ट नॉर्टन’ या कवितेत तत्त्वचिंतकाचे मन दिसते. ‘अपिअरन्स अँड रिअ‍ॅलिटी’ लिहिणारा आधुनिक तत्त्वचिंतक बर्कले याच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास तो तीन-चार वष्रे करत होता. त्याच्यावर बर्कलेचा प्रभाव असावा, असा निष्कर्ष काढता येतो.
‘काळ आत्ताचा नि काळ गेलेला
असतील दोन्ही कदाचित येऊ घातलेल्या काळात,
अन् येऊ घातलेला अंतर्गत येऊन गेलेल्या काळात.
सर्व काळ असेल अनद्यपणे वर्तमानरूप
तर त्याला मुक्ती कुठली मिळायची?
यदाकदाचित घडलं असतं ते आहे संदिग्ध
केवळ एक शाश्वत शक्यता
केवळ संभाव्यतेच्या जगात.’
इलियट अर्धा इंग्रज आणि अर्धा अमेरिकन होता. २६ सप्टेंबर १८८८ रोजी अमेरिकेत सेंट लुइस इथे त्याचा जन्म झाला. शालेय शिक्षणही अमेरिकेतच झाले. हार्वर्ड, पॅरिस आणि ऑक्सफर्ड येथे त्याचे महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. काही काळ त्याने शिक्षक म्हणून काम केले. समीक्षक हर्बर्ट रीडला लिहिलेल्या पत्रात तो स्वत:चे वर्णन ‘अमेरिकनांच्यापेक्षा अधिक ब्रिटिश आणि त्याहीपेक्षा अधिक फ्रेंच, म्हणजे खरा कुठलाच नाही..’ असे करतो. ‘हे विश्वची माझे घर’ मानणारा पण कुठेच मुळे नसलेला हा कवी होता.. यालाच आज ‘ग्लोबल- नोमॅड’ म्हणतात.
१९१५ ते १९२५ या काळात इलियट लौकिकदृष्टय़ा स्थिर नव्हता. लग्न मोडले होते, बँकेतील नोकरी सांभाळून ‘द इगोइस्ट’ आणि ‘द क्रायटेरियन’ या नियतकालिकांचे संपादन तो करी. १९२५ पासून ‘फेबर अँड फेबर’ या प्रकाशन संस्थेत त्याने संपादक म्हणून नोकरी केली आणि त्याची सेक्रेटरी असलेल्या व्हॅलरीशी लग्न केले. त्याची गद्य समीक्षा विशेषत: परंपरेवरचा त्याचा लेख काव्यसमीक्षेला दिशा देणारा ठरला. १९४८ मध्ये त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. त्याने काही काव्यनाटय़ेही लिहिली. त्याचे सारे काव्यलेखन दोन-अडीचशे पानांत मावू शकते, इतके आहे. पण मानवी सर्जनशीलतेचा तो सर्वोच्च आविष्कार मानला जातो.  १९२७ मध्ये इलियटने कॅथोलिक म्हणून बाप्तिस्मा घेतला. ‘अ‍ॅश वेन्सडे’सारख्या कवितेत त्याचा प्रभाव दिसतो. तो स्वत:चे वर्णन ‘क्लासिसिस्ट इन लिटरेचर, रॉयलिस्ट इन पॉलिटिक्स अँड अँग्लो कॅथोलिक (सिक्!) इन रिलिजन’ असे करीत असे. पण यापेक्षा, ‘संतत्व आणि आधुनिकतेच्या ताणातून त्याचे व्यक्तिमत्त्व दुभंगून गेले होते’ हे त्याचे स्टीफन स्पेंडरने केलेले विश्लेषण अधिक खरे मानावे लागेल. कोट-टाय शिवायचा त्याचा फोटो पाहायलाही मिळत नाही, इतके त्याचे व्यक्तिमत्त्व ‘सॉफिस्टिकेटेड’! पण तो मित्रांना पत्रांतून अत्यंत चावट कविता लिहीत असे. अशा त्याच्या कविता त्याच्या हयातीत प्रसिद्ध झाल्या नाहीत.
‘फोर क्वार्टेट्स’सारखा चार कवितांचा समूह १९४० ते ४४ मध्ये, म्हणजे महायुद्ध भडकू लागले असताना प्रसिद्ध झाला. इलियटच्या स्वत:च्या या आवडत्या कविता होत्या. पण युद्धोत्तर काळात, ख्रिश्चन धर्मातील थॉमस बेकेटसारख्या संताला समोर ठेवून त्याने ‘मर्डर इन कॅथीड्रल’सारखे नाटक लिहिले. त्याचे काव्य आणि समीक्षा यांनी आधुनिक कवितेला दिशा दिली; पण नंतरचा काळ हा डावी प्रागतिक विचारसरणी मानणाऱ्या डब्ल्यू. एच. ऑडेनसारख्या कवींचा होता ज्यात चतन्यतत्त्वापेक्षा, आंतरिक संघर्ष चितारण्याला आणि कलात्म उत्स्फूर्ततेपेक्षा तंत्रशुद्धतेच्या ‘जबाबदारी’ला महत्त्व आले. (या ऑडेनच्या घरची २० भागांची ‘कम्प्लीट ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ वापरून खिळखिळी झाली होती, इतके शब्द तो शोधायचा, असा उल्लेख सापडतो.) नंतर तर कन्फेशनल, व्यक्तिगत व्यथा सांगणारी कविता हा एक प्रबळ प्रवाह ठरला, ज्यात रोबर्ट लॉवेल, सिल्व्हिया प्लाथ असे कवी लोकप्रिय ठरले. कवींच्या ‘बीट जनरेशन’ने तर कवितेतील पावित्र्यच भंगविले. (न्यूयॉर्क स्कूलमध्ये कविता शिकवताना प्रसिद्ध बीट-कवी इयान गिन्सबर्गने विद्यार्थ्यांकडून एक एक शब्द घेऊन कविता करून दाखवली होती.)
काळ बदलला, तरी इलियटचे महत्त्व कमी झाले नाही, उलट ‘टाइम’सारख्या साप्ताहिकाने शतकातील श्रेष्ठ लेखक, कलावंत, तंत्रज्ञ यांबद्दलच्या विशेषांकात पिकासो, जेम्स जॉयस यांच्या जोडीने इलियटला निवडलेले दिसते. १९६५ साली त्याचा मृत्यू झाला. आपले चरित्र कोणी लिहायचे नाही असे त्याने लिहून ठेवले, तरीही त्याच्यावरच्या समीक्षेचा बुरखा पांघरलेल्या चरित्रात्मक पुस्तकांची संख्या मोठी आहे. एका पत्रात त्याने ‘‘प्रुफॉक’मधील ‘तू’ हा पुरुष असू शकेल’-  असे म्हटल्याने तो समिलगी असावा असे मानून जेम्स मिलर या लेखकाने एक संपूर्ण चरित्र त्या दृष्टीतून लिहिले आहे.
‘इलियट्स न्यू लाइफ’ हेही चरित्रच. हे पुस्तक इलियटच्या १९१२ पासून जिच्याशी मत्री, पत्रव्यवहार होता आणि प्रेम होते त्या एमिल हेलशी असलेल्या नात्याचा वेध घेत िलडेल जोर्डनने लिहिले आहे. एमिलशी असलेला इलियटचा बराच पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला असला तरी तो २०१८ साली खुला होईल.  प्रकाशक म्हणून त्याने अनेक नव्या कवींना उत्तेजन दिले. त्यांच्या कवितांचे संपादन केले. त्याने मोजकेच पण दिशा देणारे समीक्षालेखन केले, ज्यावरून त्याचे आवडते कवी आणि प्रभाव लक्षात येतो. हॅम्लेट नाटक, लेन्स्लॉट अँड्रय़ूजसारखा १६व्या शतकातला धर्मोपदेशक कवी,  इटालियन कवी दान्ते, बोद्लेअर, सॅम्युएल जॉन्सन असे वैविध्य दिसते. समीक्षक म्हणून अवघ्या काळाची समज इथे दिसते.
मग आज १०० वर्षांनीही प्रश्न पडतो : इलियटची कविता आधुनिक ठरलीच, पण इलियट आधुनिक होता का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिमांच्या ओघातून काव्यनिर्मिती इंग्रजीला नवीन होती.. हे इलियटने ज्या कवितेत प्रथम केले, त्या ‘जे आल्फ्रेड प्रुफॉकचे प्रेमगीत’ या कवितेचे चित्रमय पुस्तकदेखील पुढे निघाले.. त्यातील हे एक पान!

शशिकांत सावंत – shashibooks@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The love song of j alfred prufrock
First published on: 20-06-2015 at 01:15 IST