तेव्हा बुद्धी ही मनाचीच गुलाम आहे. त्यामुळे मन वळलं तर बुद्धी वळेल! आणि मन इतकं चतुर आहे की, त्याला पकडायला जावं तर ते स्वत:चा थांगपत्ताच लागू देत नाही. स्वामी स्वरूपानंदही सांगतात ना? ‘‘अहो मन म्हणजे काय पदार्थ। याविषयीं अद्यापि नाहीं एकमत। उदंड चर्चा करिती पंडित। परि तयाचा अंत न लागे।।’’ (स्वरूप पत्र मंजूषा, पत्र २४). या मनाचा अंतपार लागत नाही, तरी प्रत्येक कृती मग ते करणं असो, न करणं असो, पाहणं असो – न पाहणं असो, बोलणं असो – न बोलणं असो, ऐकणं असो – न – ऐकणं असो.. ही प्रत्येक कृती मनाच्या कलानुसार, आवडीनुसार वा नावडीनुसारच होते! स्वामी सांगतात, ‘‘मनें जो जो विषय कल्पिला। तो तो तयापुढे उभा ठाकला।’’ मनात एखादा विषय आला, कल्पना स्फुरली की ती गोष्ट लगेच डोळ्यापुढे उभी राहते. दूर देशी गेलेल्या मुलाची आठवण झाली की लगेच तो, त्याचं बालपण मनापुढे उभं राहतं! अमुक एक पदार्थ खावासा वाटला की लगेच तो मनापुढे उभा राहतो! इतकं मनानं जीवन व्यापलं आहे. पुढे स्वामी म्हणतात, ‘‘मन नसतां इंद्रिय विषयाला। ठाव उरला मग कोठे।।’’ आपण मागेच पाहिलं, इंद्रियं नुसती उपकरणं आहेत. डोळे पाहतात का? नाही! मनाच्या इच्छेनुसार, मनाला जे पाहायची इच्छा आहे ते डोळ्यांद्वारे पाहिलं जातं. मनाला ऐकायला आवडतं ते कानांद्वारे ऐकलं जातं. नावडीचं ऐकावं लागलं तर कान दुखावत नाहीत, मन दुखावतं! सर्व इंद्रियांची हीच स्थिती आहे. जोवर मन त्यांच्यात कालवलं जात नाही, मनाचा इंद्रियांशी संयोग नसतो तेव्हा इंद्रियं आणि त्यांचे विषय यांचं काही देणं-घेणं नसतं! रस्त्यानं जाताना आवडीच्या खाद्यपदार्थाची गाडी लागली, पण मन त्या वेळी वेगळ्याच विचारात होतं, अर्थात मनाचा रसनेंद्रियाशी संयोग नव्हता, त्यामुळे ती गाडी ‘दिसत’ नाही की तो पदार्थ खाण्याची इच्छा मनात उत्पन्न होत नाही! तेव्हा सायुज्यता साधायची तर मन आधी खरेपणानं समर्पित व्हावं लागतं आणि आपली अडचण अशी की आपण स्थूल इंद्रियांचं शरीर पुढे करतो, मन नाही! त्यामुळे शरीरानं सेवा होते, मनानं नाही. शरीरानं पूजा होते, मनानं नाही. शरीर जपाला बसतं, मन नाही. म्हणून तर पूजा, जप, पारायण, प्राणायाम, उपासना या शारीरिक क्रिया होतात. त्या शरीरपूर्वक होतात, मन:पूूर्वक होत नाहीत! तेव्हा इंद्रियांना नाही, मनाला वळवावं लागतं. इंद्रियांवर नव्हे, मनावर ताबा यावा लागतो. जिभेवर ताबा म्हणजे अनावश्यक व अनाठायी न खाणं आणि न बोलणं. पण जीभ तर साधन आहे. अनावश्यक, अनाठायी खाण्याची आणि बोलण्याची खुमखुमी मनाला असते, जिभेला नव्हे! तेव्हा मनावर ताबा आला, तर जिभेवर वेगळा ताबा आणावा लागत नाही. मन ताब्यात आलं की सर्व इंद्रियं ताब्यात आहेतच. मन संयमित झालं की इंद्रियं संयमित आहेतच. आता गेल्या व आजच्या भागात, मनच बुद्धीपेक्षा कसं प्रभावी आहे, ही चर्चा आपण केली. इथे अशी शंका येईल की, गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवंतांनी इंद्रियांपेक्षा मन आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, असं म्हटलं आहे. मग बुद्धी मनाच्या ताब्यात कशी असेल? ते आता पाहू.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र