अलीकडच्या काळात सेलिब्रिटींनी लिहिलेल्या वा त्यांच्याविषयीच्या पुस्तकांची चर्चा चवीचवीने रंगवली जाऊ लागली आहे. त्यासाठी प्रकाशनाआधीपासूनच  शिस्तबद्ध पद्धतीने हालचाली सुरू होतात. वेगवेगळ्या क्लृप्त्या आणि फंडे चालवले जातात. हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जे जे काही केलं जातं, तसंच आणि त्या प्रकारे सेलिब्रिटींचा पुस्तकांचाही इव्हेंट केला जाऊ लागला आहे. अर्थात त्यामुळे पुस्तकाची चर्चा होते आणि थोडाफार खपही. त्यामुळे लोकसुंदरी रामन यांच्या चरित्राची गणनाही याच पद्धतीच्या पुस्तकात व्हायला हवी होती. कोण या लोकसुंदरी, या प्रश्नाचे उत्तर आहे की, त्या नोबेलविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रामण यांच्या पत्नी. या पुस्तकात ‘रामण इफेक्ट’मागील माणूस, पती, मुलगा, भाऊ आणि मित्र हे पैलू उलगडायला मदत होते. त्यामुळे या चरित्रातून रामण एका श्रेष्ठ शास्त्रज्ञाबरोबर एक माणूस म्हणूनही समजावून घ्यायला मदत होते. हे चरित्र लिहिले आहे ते रामण यांच्या पणतीने-उमा परमेश्वरनने. तीने रामण यांचेही चरित्र तीनेक वर्षांपूर्वी लिहिले आहे. ‘लेडी लोकसुंदरी रामण-रिफलेक्शन्स ऑफ हर अर्ली लाइफ अँड टाइम्स’ असे या चरित्राचे नाव आहे. आणि ते सर्वत्र उपलब्ध आहे. पण त्याचे प्रकाशन होऊन काही महिने उलटले तरी त्याची काही चर्चा कुणी करायला तयार नाही. एक कारण असे असावे की, हे पुस्तक मणिपाल विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. त्यांच्याकडे काही व्यावसायिक दृष्टीकोन असायचे कारण नाही. पण अशा बातम्यांच्या शोधात असणाऱ्यांनीही या खळबळजनक पुस्तकाकडे दुर्लक्ष करावे? की नोबेलविजेते शास्त्रज्ञ वा त्यांच्या पत्नी सेलिब्रिटींच्या यादीत बसत नाहीत?
गुलज़ार बोलतात त्याची कविता होते
भारतीय मध्यमवर्गाचा ताळेबंद मांडणाऱ्या पवन वर्मा यांनी अलीकडे अनुवादकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे आणि उर्दू-हिंदीतील लोकप्रिय गीतकार-कवी गुलज़ार यांची पुस्तके इंग्रजीत अनुवादित करण्यास सुरुवात केली आहे. गुलज़ार यांच्या ‘सिलेक्टेड पोएम्स’, ‘निग्लेक्टेड पोएम्स’ या दोन कवितासंग्रहानंतर ‘ग्रीन पोएम्स’ हा त्यांनी अनुवादित केलेला तिसरा संग्रह. दरम्यान ‘हाफ अ रुपी’ या नावाने गुलज़ार यांच्या निवडक कथांचाही अनुवाद केला आहे. वर्मा यांनी याआधी कैफ़ी आज़्‍ामी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचाही इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यामुळे कवितांचा अनुवाद करायला ते सरावलेले आहेत, असं समजायला हरकत नाही. या संग्रहात गुलज़ार यांच्या निसर्गाविषयीच्या ५९ कविता आहेत. नदी, तळी, ओढे, पर्वत, बर्फ, पाऊस, ढग, आकाश, जमीन, हवा, झाडे यांच्याविषयीच्या या कविता निसर्गाविषयीची हळुवार आणि चैतन्यशील भावना उजागर करतात. माती, जमीन, पाणी याविषयी गुलज़ार यांचं आतडय़ाचं नातं आहे. निसर्गाला ते आपल्या अवतीभवतीची सर्वात चैतन्यशील आणि रसरशीत दुनिया मानतात. त्यामुळे त्याविषयी लिहिताना गुलज़ार आपली अक्षरे मोरपंखाच्या बोरूने लिहितात. या कविता म्हणजे जणू काही निसर्गातील विविध घटकांची स्वगतं आहेत, फक्त ती गुलज़ार यांच्या शब्दांतून उतरली आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं सांगताना ती काव्यमय भाषेचा आणि लीनतेचा आधार घेतात. अतिशय प्रेमानं आपल्याशी हिजगूज करतात. त्यामुळे ही निसर्गसूक्तं आवाहनांनी भरलेली आहेत. त्यांच्या हाकांनी आपलं लक्ष वेधून घेतात.
गुलज़ार ज्याला स्पर्श करतील त्याची कविता होते. त्या कवितेला लय, नाद, स्वाद, रुची, गंध, सारं काही असतं. म्हणून ती समोरच्याला वेढून टाकते. या कविता वाचकाला नवी ‘नजर’ देतात, निसर्गाकडे पाहण्याची. त्याला अनुभवण्याची. त्याच्या जवळ जाण्याची. आणि त्याला आपल्यात सामावून घेण्याचीसुद्धा.
वर्मा यांनी इंग्रजी अनुवादाबरोबर त्यांचे हिंदी लिप्यंतर दिले आहे. त्यामुळे अनुवाद ताडून पाहण्याचीही आयतीच सोय झाली आहे.
ग्रीन पोएम्स : गुलज़ार, अनुवाद – पवन के. वर्मा,
 पेंग्विन बुक्स, गुरगाव,
 पाने : १३१, किंमत : २५० रुपये.

गज्वी पोचले इंग्रजीत!
प्रेमानंद गज्वी हे मराठीतील सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे नाटककार आहेत. त्यांच्या ‘घोटभर पाणी’, ‘किरवंत’ आणि ‘गांधी-आंबेडकर’ या तिन्ही नाटकांनी- अगदी बिनचूक शब्दांत सांगायचे तर पहिल्या एकांकिकेने आणि नंतरच्या दोन नाटकांनी- मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ही तिन्ही नाटके रूपांतराच्या निमित्ताने इंग्रजीमध्ये दाखल झाली आहेत. त्या रंगभूमीवर ती प्रयोगक्षम ठरतात की नाही हे येत्या काळात कळेलच. ‘घोटभर पाणी’चे मराठीमध्ये तीन हजार प्रयोग झाले. या एकांकिकेत अस्पृश्यतेच्या शापामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्याची वेदना मांडली आहे. त्यानिमित्ताने गज्वी यांनी भारतीय संस्कृतीतील दांभिकतेचे वाभाडे काढले आहेत. ‘किरवंत’ या नाटकाची प्रशंसा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. या नाटकात ब्राह्मण ‘किरवंत’ला (अंत्यविधीची क्रियाकर्मे करणारी व्यक्ती) कशा प्रकारची वागणूक देतो, याचे भेदक आणि वास्तव चित्रण केले आहे. ‘जो ब्राह्मण समाज स्वत:च्याच समाजाला न्याय देऊ  शकत नाही, तो इतर समाजाला काय न्याय देणार आणि सन्मानाने वागवणार,’ असा जळजळीत प्रश्न या नाटकातून गज्वी यांनी उपस्थित केला आहे. ‘गांधी-आंबेडकर’ हे नाटक म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संघर्षांची मांडणी करते. १९३१ सालच्या पहिल्या गांधी-आंबेडकर भेटीने हे नाटक सुरू होते आणि गांधी हत्येनंतर आंबेडकरांच्या स्वगताने संपते. गांधी-आंबेडकर यांचे संबंध सुरुवातीपासून तणावाचेच राहिले. त्याविषयी त्यांच्या हयातीपासून बोलले जातेच आहे. हे नाटकही त्याचाच एक भाग म्हणून अवतरले.
‘घोटभर पाणी’चा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी तर ‘किरवंत’ आणि ‘गांधी-आंबेडकर’ यांचा अनुवाद म. द. हातकणंगलेकर यांनी केला आहे. पहिल्या दोन्ही नाटकांत महाराष्ट्रीय समाजातील भेदक वास्तव तर तिसऱ्या नाटकांत हिंदू आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन भारतीय समाजपुरुषांमधील संघर्ष रेखाटला आहे. मराठीमध्ये ही तिन्ही नाटके नावाजली गेली, वाखाणलीही गेली. महत्त्वाचीही मानली गेली. कारण महाराष्ट्रात त्यांना मोठा इतिहास आहे. तसे इंग्रजीत होईलच असे नाही.
द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स : प्रेमानंद गज्वी,
अनुवाद- शांता गोखले, म. द. हातकणंगलेकर,
नवयान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली,
पाने : १५५, किंमत : २५० रुपये.