शास्त्रीय व प्रामाणिक योगाभ्यासाची निर्यात हे भारतीय आरोग्य उद्योगाला सोन्याचे दिवस दाखवील. ‘आयुष’ या संकल्पनेचा अत्यंत परिपूर्ण वापर करणे हे या उद्योगात धनसंपदा आणेल; पण हे सर्व करतानाच भारतातील कुपोषित बालकांना सकस आणि पोटभर अन्न कसे मिळेल हेही बघणे आवश्यक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थातील विषारी द्रव्ये आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस या दोन्ही गोष्टींची चर्चा गेल्या आठवडय़ात भारतामुळे जगभरात झाली. या दोन्ही गोष्टींचा संबंध हा माणसाच्या आरोग्याशी आहे. आज वैद्यकीय शास्त्रातील वाढत्या शोधांमुळे जगात सर्वसाधारण आयुर्मर्यादा ८०च्या आसपास पोहोचल्याचे जाणवते. आज वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे वैद्यकीय तज्ज्ञ माणसाला मरू देत नाहीत. आजचे वैद्यकीय शास्त्र हे आरोग्याची हमी देत नाही, तर रोगाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे रोग झाल्यावरच त्यावर उपाय करते, पण मरेपर्यंत प्रतिष्ठित आरोग्यपूर्ण आयुष्याची हमी आजही हे वैद्यकशास्त्र देऊ शकत नाही. वाढत्या वयाबरोबरच आजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण, खाण्या-झोपण्याच्या बदललेल्या सवयी या सर्वच गोष्टींमुळे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी काय करायला लागेल, हा प्रश्न आज तरुणाईपासूनच पडू लागला आहे. स्थूलतेमुळे मधुमेहापासून रक्तदाब, निद्रानाश इत्यादी रोग, अतिबारीकपणामुळे होणारे रोग, अतिव्यस्ततेमुळे होणारे आजार हे आज सर्व जगालाच भेडसावत आहेत; पण जीवनाची गती तर कमी करता येत नाही. यामुळेच जगात एक उद्योग प्रचंड वाढीला लागला आहे आणि तो म्हणजे आरोग्याचा उद्योग.
एक ट्रिलियन डॉलर म्हणजे साधारण ६०० लाख कोटी रुपयांचा जगातील पुढचा व्यवसाय कोणता, असे कोणी विचारले, तर आरोग्य व्यवसाय हेच म्हणावे लागेल. हा व्यवसाय जागतिक आहे.  म्हणजेच आरोग्यविषयक उत्पादने व सेवा यांची मागणी सतत वाढते आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ामध्ये औद्योगिक यशातून सामान्य माणूसही श्रीमंत झाला. पन्नाशीतील आजच्या पिढीला या यशाच्या उन्मादानंतर आरोग्याच्या काळजीने ग्रासले. या पिढीतील लोक कमावलेला पैसा जास्तीत जास्त कुठे खर्च करत असतील तर तो आरोग्यावर आणि हे जर खरे आहे, तर आरोग्य उद्योगाचे भविष्य खूपच उज्ज्वल आहे. हा केवळ माझा समज नाही, तर या उद्योगाची आकडेवारीच हे सांगत आहे. देशाचे आर्थिक आरोग्य व प्रगती हवी असेल, तर त्यातील नागरिकसुद्धा तणावमुक्त व आरोग्य असलेले असणे आवश्यक आहे. आज जगातील आरोग्य उद्योग हा १८०० लाख कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे, जागतिक औषध उद्योगाच्या तीनपट! यामध्ये आरोग्यपूर्ण व सकस अन्न ३०० लाख कोटी रुपये, व्यायामशाळा २०० लाख कोटी रुपये, सौंदर्य व वय लपवणारी उत्पादने ६०० लाख कोटी रुपये, प्रतिबंधात्मक व वैयक्तिक आरोग्य सेवा २०० लाख कोटी रुपये, वैकल्पिक औषधे ६ लाख कोटी रुपये आणि बाकी जीवनशैलीविषयक आरोग्य सेवा. जागतिक पातळीवर हे प्रचंड आकडे पाहिले म्हणजे आरोग्य उद्योगात किती धनसंपदा आहे ते आपल्या लक्षात येईल. एका अंदाजाप्रमाणे आरोग्य पर्यटन हा व्यवसाय ३०० लाख कोटी रुपयांच्या घरात गेला असून तो दरवर्षी १२.५ टक्क्य़ांनी वाढतो आहे. ‘स्पा’ नावाच्या गोष्टीचे जगात वेड वाढते आहे. आज हा व्यवसाय ३.५ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतात केरळसारख्या राज्यांनी या व्यवसायात चांगली आघाडी घेतली आहे.
सतत वाढत्या मागणीमुळे या उद्योगात नवागतांचीही रांग लागली आहे. गेल्या काही वर्षांत सकस ज्यू अन्नपदार्थाची ज्याला कोशर म्हणतात, अशी ३००च्या वर नवीन उत्पादने आली आहेत. वजन कमी करण्यासाठी २००च्या वर नवीन उत्पादने बाजारात आली आहेत, तर जीवनसत्त्व व खनिजे असलेली १५०च्या वर नवीन उत्पादने आली आहेत. कोक किंवा पेप्सीसारख्या जागतिक कंपन्यांनी एवढी वर्षे विकलेली उत्पादने अनारोग्यक असल्याचा साक्षात्कार झाल्यावर आता बिनासाखरेची ‘आरोग्यदायी’ उत्पादने बाजारात आणायला सुरुवात केली आहे. या कंपन्यांच्या अंदाजाप्रमाणे येत्या २-३ वर्षांत त्यांच्या मूळ पेयांना मागे टाकत ही नवीन पेये बाजारपेठ काबीज करतील. कारण एकच.. आरोग्यविषयक लोकांची वाढलेली काळजी! आज कोणत्याही विपणन संकल्पनेत उत्पादन आरोग्यविषयक कसे जागृत आहे हे निक्षून सांगितले जाते. अगदी घरातील, कार्यालयातील खुच्र्याच्या जाहिरातीत त्या कार्याभ्यासाच्या दृष्टीने कशा परिपूर्ण आहेत हे ग्राहकाला ठळकपणे सांगितले जाते. आरोग्यविषयक उद्योगाचे साधारण दोन भाग पडतात. एक आरोग्यविषयक उपचार करणारे, आरोग्यविषयक प्रशिक्षक, खासगी व्यायामशाळा इत्यादी. पण हे सगळे आपला व्यवसाय खूप मोठा करू शकत नाहीत. दुसऱ्या भागात आरोग्यविषयक उत्पादने येतात. उद्योगाचा हा भाग आज जगात प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतो आहे. आज तंत्रज्ञान, भ्रमणध्वनी, संगणक यांचे साहाय्य घेऊन आरोग्यविषयक सेवा व उत्पादने विकण्याचा धडाका सुरू झाला आहे. माझ्या एका मित्राबरोबर मी जेवण घेतले. जेवण संपल्याबरोबर त्याने आपला आधुनिक भ्रमणध्वनी काढला आणि दोन मिनिटे त्यावर बोलत हसत राहिला. त्या मित्राचा एक गट आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि जिभेवर लगाम ठेवण्यासाठी या गटातील सर्व स्त्री-पुरुष जेवण झाल्यावर आज मी काय काय खाल्ले ते जाहीर करतात. आपले अन्न मोजून सांगितले, की इतरांनी काय-काय कुठे-कुठे खाल्ले हे समजते! जिभेवर नियंत्रण ठेवण्याची ही आधुनिक पद्धत मला फार मजेशीर वाटली, पण त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्याकरिता नवीन तंत्रज्ञानाची घेतलेली मदत पाहून यापुढील दशकात आरोग्य उद्योगात काय क्रांतिकारक बदल होणार आहेत हे समजले. परवा आमच्या घरी काही मित्र व त्यांच्या बायका आल्या होत्या. एका मित्राची बायको बसून गप्पा मारण्याऐवजी सारखी फिरत होती. नंतर कळले की, तिच्या कंबरेला एक लहानसे यंत्र होते. टाकलेले प्रत्येक पाऊल मोजणारे ते यंत्र. दररोज १०,००० पावले चालली पाहिजेत असा नेम तिने केला होता.  हे यंत्र बनवणारे, ते विकणारे हे सर्व आरोग्य उद्योगाचाच आधुनिक अवतार आहेत. आरोग्य व्यवसाय कोणत्या दिशेने व गतीने पुढे जातो आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न!
भारतही आरोग्य उद्योगात मागे नाही. वैकल्पिक औषधे व आयुर्वेदिक उत्पादने निर्यातीत आज भारत दुसऱ्या स्थानावर आहे. २०१४ साली भारतातील हा उद्योग १६,२०० कोटी रुपयांचा होता. भारतात आरोग्यविषयक बाजारपेठ आज ४९,००० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. यामध्ये ४०% भाग हा आरोग्य सेवांचा आहे. भारतात आरोग्य सेवेची जननी म्हणता येईल असे आयुर्वेदशास्त्र अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामानाने चीनने त्यांच्या पुरता चिनी औषधप्रणालीचा फार चांगला प्रचार केला आहे. आज भारत सरकारने ‘आयुष’ मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याद्वारे भारतीय आयुर्वेद, निसर्गोपचार, योग, होमिओपथी, युनानी अशा वैकल्पिक आरोग्य उद्योग उत्पादनांचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. भारतात ६,२०० औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. यापासून बनणाऱ्या आरोग्य उत्पादनात मुख्यत: लघु व मध्यम उद्योग काम करतात. अंदाजे ९००० कारखाने १२,००० कोटी रुपयांची आरोग्य उत्पादने तयार करतात, पण या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या जागतिक आकडेवारीत हे आकडे अगदीच लहान दिसतात. आयुर्वेदात सांगितलेले पूरक व पोषक अन्नपदार्थ, पूर्णार्क इत्यादीविषयी संशोधन होणे जरुरी आहे. ‘आयुष’ने याविषयी पुढाकार घेऊन जागतिक दर्जाची उत्पादन क्षमता भारतात कशी तयार होईल हे पाहाणे अत्यंत निकडीचे आहे. याचबरोबर पाश्चिमात्य बाजारपेठेत या उत्पादकांच्या विक्रीला कायदेशीर परवानगी कशी मिळेल हेही बघणे आवश्यक आहे. कदाचित भारतीय उत्पादनापेक्षा कमी दर्जाची उत्पादने बाजारपेठा काबीज करतात. केवळ विपणनाच्या साहाय्याने भारतातील ९००० उत्पादकांना एकत्र आणून त्यांच्याकडून जागतिक दर्जाचा माल तयार करून घेऊन त्याचे शास्त्रीय पद्धतीने व त्या त्या बाजारपेठांच्या नियमांप्रमाणे वेष्टन व वितरणाची व्यवस्था केली गेली, तर भारतातील हा उद्योग १० लाख कोटी रुपयांच्याही वर जाऊ शकतो. भारतीय बाजारपेठेतही वाढत्या औषधांच्या किमतीपेक्षा स्वस्त अशी ही औषधप्रणाली योग्य तऱ्हेने हाताळली, तर भारतीयांचे आरोग्यही उत्तम ठेवू शकेल. अर्थात आरोग्य आणि रोगनिवारण या दोन भिन्न बाजारपेठा आहेत व आयुषने हे भान ठेवणे जरुरी आहे.
जागतिक योग दिवस हा या आरोग्य उद्योगाचाच एक भाग होणे आवश्यक आहे. शून्यासारखेच योग ही जगाला भारताने दिलेली अमूल्य भेट आहे. २१ जून हा योग दिन पाळला गेला ही आरोग्य व्यवसायाकरिता शुभवार्ताच आहे. माझ्या दृष्टीने हा दिवस साजरा करण्याला एक अधिक परिमाण आहे. जागतिक स्तरावर नेत्यांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याचे महत्त्व मान्य केल्याचा हा पुरावा आहे. योगाभ्यास हा आरोग्य उद्योगाचाच एक भाग आहे. आरोग्यपूर्ण जीवनात आज मुख्य अडसर मानसिक तणाव आहे. यम, नियम, प्राणायाम, ध्यानधारणा, समाधी अशा अनेक तत्त्वांतून मानसिक व शारीरिक आरोग्य कसे लाभते याचा अभ्यास म्हणजे योगाभ्यास. आज जगाला आरोग्यासाठी त्याची अत्यंत जरुरी आहे आणि जगात ग्राहकाकडून त्याला प्रचंड मागणीपण आहे. आज बंगळुरू, उत्तरांचल वगैरे भागांत योगाभ्यासावर आधारित अशा आरोग्यविषयक सेवांची ख्याती जगभर पसरली आहे. मला वाटते शास्त्रीय व प्रामाणिक योगाभ्यासाची निर्यात हे भारतीय आरोग्य उद्योगाला पुरातन सोन्याचे दिवस दाखवील. म्हणजेच आयुष या संकल्पनेचा अत्यंत परिपूर्ण वापर करणे हे आरोग्य उद्योगात धनसंपदा आणेल; पण हे सर्व करतानाच भारतातील कुपोषित बालकांना सकस आणि  पोटभर अन्न कसे मिळेल हेही बघणे आवश्यक ठरेल. एका अभ्यासानुसार भारतातील ६५% मृत्यू हे दीर्घकालीन आजारांनी होतील. हे टाळण्यासाठी आरोग्य उद्योगांनी कंबर कसली पाहिजे; अन्यथा एका अंदाजाप्रमाणे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा दीर्घकालीन रोगांमुळे २००५ ते २०१५ या दहा वर्षांत राष्ट्रीय उत्पादनाचे ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
* लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक    संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय        सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल
दीपक घैसास – deepak.ghaisas@gencoval.com

More Stories onयोगाYoga
मराठीतील सर्व अर्थ विकासाचे उद्योग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga trends in healthcare industry in india
First published on: 26-06-2015 at 03:54 IST