माणसानं आपल्या ‘ज्ञाना’चा उपयोग प्रपंचसुखासाठी केला आहे, पण त्याचा परिणाम असा झाला आहे की तो या प्रपंचात खोलवर रुतला आहे. पशुपक्षी घरटय़ाबद्दल आसक्त नसतात. माणूस घरात आसक्त आहे. घरटय़ाच्या दृश्यरूपाबद्दल पशुपक्षी सजग नसतात. माणूस मात्र घराच्या दर्जावर, दृश्यरुपावर आपला सामाजिक दर्जा अवलंबून आहे, असं मानतो. त्यामुळे घर सजविण्याचा, सुखसोयीच्या अद्ययावत साधनांनी ते भरण्याचा त्याचा उद्योग सतत सुरूच असतो. थंडी-उन्हापासून संरक्षण आणि लज्जारक्षण एवढाच हेतू पोशाखामागे असताना माणूस तेवढय़ावर थांबत नाही. तो हजारो रुपयांची भपकेबाज वस्त्रप्रावरणं तयार करतो. पोट भरलं की पशुपक्षी अन्नाचा विचार करीत नाहीत. आपल्या ‘ज्ञाना’च्या जोरावर माणसानं मात्र पाककलेचा कमालीचा विकास केला आहे. आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी त्यानं पशुपक्ष्यांनाही सोडलेलं नाही. इतकं पाकवैविध्य निर्मूनही त्याची रसना तृप्त मात्र झालेली नाही. त्या अतृप्तीतून तो गरज नसतानाही इतकं खातो की त्याच्या प्रकृतीवर त्याचे विपरीत परिणाम झाले आहेत. थोडक्यात सांगायचं तर माणसानं त्याला लाभलेल्या ज्ञानाच्या जोरावर अनंत सुखसोयी देणारी उपकरणं, साधनं तयार केली. त्याचं मन ‘तृप्त’ करणारी, शरीर ‘तृप्त’ करणारी, जिव्हा ‘तृप्त’ करणारी अनंत साधनं, वस्तू, पदार्थ तयार करूनही अखंड तृप्ती निर्माण झाली नाही. देहसुख वाढविणारी आणि देहकष्ट कमी करणारी साधनं जशी माणसानं शोधली तशीच देहदुखं कमी करणारी औषधं आणि उपचारही शोधले. मनाला उत्साहित करणारी औषधंही त्यानं निर्मिली. इतकं होऊनही जीवनात अखंड निश्िंचती, तृप्ती, समाधान मात्र त्याला अनुभवता येत नाही. मग इतकी प्रगती करून, इतका विकास साधून आपण असमाधानी का आहोत, हा विचार केला पाहिजे. आपल्या प्रपंचातच त्या दुखाचं मूळ आहे. लक्षात घ्या प्रपंच हे दुखाचं कारण नाही. त्या प्रपंचाबाबतच्या आपल्या स्वार्थमूलक कल्पना आणि आसक्ती हे दुखाचं कारण आहे. पण हा प्रपंचसुद्धा भगवंतानंच तर निर्माण केला आहे. त्याच्याच इच्छेनं तो माझ्या वाटय़ाला आला आहे. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात, ‘‘प्रपंचच काय, जगातली कोणतीही गोष्ट वाईट नाही. पण आपल्याला ती कशी वापरायची ते कळत नाही. परमात्मा सर्वत्र आहे आणि तो सुखरूप आहे म्हटल्यावर प्रपंच दुखरूप कसा असेल? तो सुखरूपच असला पाहिजे. तसा नसता तर देवाने मागे लावलाच नसता. तो कसा करावा हे आम्हास कळत नाही म्हणून आम्हाला तो दुखरूप होतो’’ (बोधवचने, क्र. ९५५). हा दुखरूप प्रपंच सुखरूप होईल तो केवळ अभ्यासाने. श्रीमहाराज सांगतात, ‘‘आपला प्रपंच विश्वातील एक भाग आहे. तो अभ्यासाकरताच आहे. ज्याने प्रपंच जिंकला त्याने जग जिंकले. ज्याने आपल्याला जिंकले त्याने प्रपंच जिंकला’’ (बोधवचने, क्र. ८६२). ‘‘माणूस प्रपंचात जसा तयार होईल तसा जंगलात जाऊन तयार होणार नाही. प्रपंच शिक्षणाकरिता आहे’’ (बोधवचने, क्र. ८६४).