चर्चा रंगली होती तोच वाफाळता चहा घेऊन सखारामनं प्रवेश केला. चहाचे घोट घेता घेता बेत ठरला, एवढय़ा जवळ समुद्र आहे तर थोडा फेरफटका मारून येऊ. मग जेवून रात्री चर्चा सुरू ठेवता येईल.. चहापान झालं.
हृदयेंद्र – बाहेर पडण्याआधी अभंगातल्या ज्या चरणाची चर्चा सुरू आहे तो वाचून घेऊ.. म्हणजे वाटलं तर फिरता फिरताही चर्चा सुरू ठेवता येईल.. ऐका.. ‘विवेक हातवडा घेऊन। कामक्रोध केला चूर्ण’.. दादासाहेब याचा अर्थ काय?
ज्ञानेंद्र – अरे थांब.. आधी समुद्रावर तर जाऊ!
समुद्राचा उसळता नाद आणि वाऱ्याच्याही लाटा मनाच्या किनाऱ्यावर आदळत होत्या.. काही क्षणांतच किती ताजेतवाने वाटू लागले..
हृदयेंद्र – दादासाहेब.. हातवडा म्हणजे लहानशी हातोडी ना? (दादासाहेबांनी होकारार्थी मान हलवली) या हातवडीनं काम-क्रोधाचं चूर्ण केलंय म्हणतात.. दागिना घडवताना असं चूर्ण होतं का?
दादासाहेब – इथे चूर्णच अर्थ चुरा असा घेऊ नका.. चूर्ण म्हणजे चक्काचूर करणं.. एखाद्या गोष्टीचा आपण चुरा करतो तेव्हा काय होतं? त्याचा मूळ आकार नष्ट होतो.. तसं कामक्रोधाचं चूर्ण झालं म्हणजे काम-क्रोध मूळ स्वरूपात उरले नाहीतच आणि ते कोणत्याही कामाचे राहिले नाहीत.. आता हा जो हातवडा आहे ना, त्यानं तार ठोकत तयार केली जाते किंवा दागिन्याला आकार दिला जातो..
हृदयेंद्र – थोडक्यात दागिन्याचा ओबडधोबडपणा जर काही असेलच तर तो नष्ट केला जातो.. अगदी त्याचप्रमाणे माझ्यातले काम-क्रोध हेच तर माझं जीवन ओबडधोबड बनवत असतात..
योगेंद्र – इथे हे जे काम-क्रोध म्हटलं आहे ना त्यात पुढचे सारेच अभिप्रेत आहेत.. लोभ, मोह, मद, मत्सर.. कारण काम आणि क्रोध हे दोन प्रमुख विकार आहेत.. पुढचे त्यातूनच प्रवाहित होतात..
हृदयेंद्र – काम म्हणजे कामना, इच्छा. या कामनेतूनच लोभ निर्माण होतो.. कामनापूर्ती झाली तर मोहानं मी त्या कामनेतच अडकतो आणि मग ती गोष्ट प्राप्त केल्याचा मद निर्माण होतो. जर कामनापूर्ती झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो आणि त्या क्रोधातूनच माझ्याऐवजी ज्याला ती गोष्ट मिळाली आहे त्या दुसऱ्याचा मत्सर निर्माण होतो. म्हणजे बघा.. काम आणि क्रोध किती सूक्ष्म आहेत आणि त्यातून माझ्या घसरणीला किती मोठा वाव मिळत असतो..
योगेंद्र – माझ्या प्रत्येक कृतीमागे सुप्त कामनाच असते.. कोणतीही गोष्ट मी अकारण करीत नाही.. प्रत्येक कृतीमागे कोणती ना कोणती ओढ असते.. माझी आंतरिक धारणा, अंतरंगातील सुप्त वासना, मनाची घडण आणि ओढ यातूनच प्रत्येक कृती घडते.. तेव्हा माझ्या जगण्यावर कामनेचा किती प्रभाव आहे.. नव्हे, माझं जगणं व्यापून कामना उरलीच आहे आणि त्या अतृप्त कामनेसाठीच मी पुन्हा पुन्हा जन्म घेत आहे..
अंधार पडू लागला होता. शाळांचे सुटय़ांचे दिवस होते म्हणून समुद्रावर मुलांची आणि त्यांना सांभाळणाऱ्या मोठय़ांचीही गर्दी होती.. अंधार पडू लागला तशी ही गर्दी ओसरू लागली.. दादासाहेबांचं लक्ष गेलं.. वाळूत मुलांनी किल्ले बनवले होते.. घरं बनवली होती.. त्यातली काही तुटली होती.. काही तशीच उभी होती.. भरतीच्या लाटा येतील आणि या उरल्या सुरल्या वाळूघरांनाही आपल्या हातांनी अथांग समुद्रात खेचून नेतील.. इथं एक चिमुकलं भावविश्व उभं होतं, याच्या काही खुणाही पुढच्या क्षणी उरणार नाहीत! कामनेच्या बीजातूनही तर माणूस असंच अवघं भौतिक विश्व उभारतो.. काळाच्या लाटा ते वारंवार पुसून टाकतात आणि तरी नव्या कामनेच्या नव्या उमेदीनं माणूस त्याचं जगही वारंवार उभारतोच.. तोच हृदयेंद्रचा मोबाइल वाजला.. ‘‘डॉक्टर नरेंद्र!’’ तो उद्गारला.. कुणीसे डॉक्टर नरेंद्र नेपाळला आहेत आणि अजून आठ-दहा दिवसांनी म्हणजे एप्रिलअखेरीस तेथून निघणार आहेत, असं काहीसं दादासाहेबांच्या कानावर पडलं.. त्यांच्या मनात मात्र नरहरी महाराजांचे शब्द घुमत होते.. चिताऱ्या चितर
ें काढी भिंतीवरी। तैसें जग सारे अवघे हें।। पोरें हो खेळती शेवटीं मोडिती। टाकूनियां जाती आपुल्या घरा।। तैसे जन सारे करिती संसार। मोहगुणें फार खरें म्हणती।। कैसी जड माती चालविली युक्ति। नानापरी होती देह देवा।। कांही साध्य करा साधुसंग धरा। नाम हें उच्चारा नरहरी म्हणे!!
चैतन्य प्रेम