साधनापथावर चालताना या वाटचालीच्या आणि साधनेच्या आड येणारा दोषयुक्त, विकारयुक्त ‘मी’ साधकाला जाणवू लागतो. जोवर हा ‘मी’ भावत आहे तोवर तो पदोपदी भोवणारच आणि अशा परिस्थितीत ‘तू’ म्हणजेच सद्गुरू भावणंही कठीण.. अर्थात सद्गुरूंच्या बोधाचा प्रामाणिक अभ्यासही कठीणच, असं हृदयेंद्र म्हणाला.
योगेंद्र – आणि मार्ग कोणताही असो, हा ‘मी’ तितकाच आड येत असतो..
ज्ञानेंद्र – तुमचा मुद्दा बरोबर आहे.. मुळात अध्यात्मच कशाला, व्यावहारिक जीवनातही माणूस जर आपल्या अंतरंगातल्या क्षुद्र इच्छांचा, वासनांचा गुलाम असेल तर तो उंच भरारी घेऊ शकत नाही, हे दिसतंच. भ्रम आणि मोहामुळे अज्ञानात अडकलेला माणूस ऐहिक प्रगतीही साधू शकत नाही..
हृदयेंद्र – इथे तर सूक्ष्म पालट साधायचा आहे.. मग किती काळजीनं प्रयत्न झाले पाहिजेत.. ब्रदर लॉरेन्स काय, निसर्गदत्त महाराज काय किंवा जे. कृष्णमूर्ती काय.. प्रत्येकाच्या सांगण्यातलं एक सूत्र समान आहे ते म्हणजे माणसानं आपल्या अंत:प्रेरणांकडे सजगपणे अर्थात अलिप्तपणे पहावं.. हे साधलं तर जीवनव्यवहारातला बराचसा गोंधळ कमी होईल! मौनाच्या अभ्यासात आपण पाहिलं होतं ना? माणूस आधी बोलून मोकळा होतो आणि मग त्याला वाईट वाटतं, की अरे, मी असं बोलायला नको होतं! त्यापेक्षा बोलण्याआधीच जर त्यानं विचार केला की मी हे बोलण्याची गरज आहे का? तर निम्मं बोलणं कमी होईल!
योगेंद्र – आणि ही गोष्ट केवळ बोलण्यालाच नाही, प्रत्येक कृतीला लागू असली पाहिजे.. म्हणजेच मी जे काही आत्ता करतोय, ते करणं खरंच गरजेचं आहे का? जर असा विचार केला तर अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होणारा वेळ वाचेल.. अनावश्यक गोष्टींवर खर्च होणारा पैसा आणि श्रमही वाचतील..
कर्मेद्र – आणि ही आवश्यकता-अनावश्यकता कशी ठरवायची? समजा मला चित्रपट पाहणं आवश्यक वाटतं, हृदूला वाटत नसेल.. मग कोणाचं बरोबर?
योगेंद्र – ज्याला खरोखर प्रामाणिक साधना करायची आहे, त्याच्याबाबत चर्चा चालली आहे..
हृदयेंद्र – कर्मू एक गोष्ट लक्षात घे.. खाणं-पिणं, चित्रपट पाहणं, नाटक पाहणं या गोष्टी मलाही आवडतात.. पण मी विचार करतो, या गोष्टींत आयुष्यातली बरीच र्वष गेलीही आहेत.. आता वेळ कमी आहे, जो वेळ आहे त्यातला जास्तीत जास्त साधनेसाठीच गेला पाहिजे..
ज्ञानेंद्र – पण तुम्ही जगणं आणि साधना या दोन वेगळ्या गोष्टी का मानता? जगणं हीच साधना का मानत नाही?
हृदयेंद्र – जगणं हीच साधना व्हावी किंवा जगण्यातला प्रत्येक क्षण साधनेसारखाच आंतरिक विकास साधणारा असावा, हे तर ध्येय आहेच.. पण ते या घडीला शक्य आहे का? सुरुवातीला ठरावीक नियमबद्ध साधनाच करावी लागेल ना? जेव्हा ती खोलवर रुजत जाईल तेव्हा ती आपोआपच होईल आणि मग जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे साधनेतून साकारलेल्या सावधानतेनं पाहता येईल.. तेव्हा सुरुवात ही कदाचित साचेबंद वाटेलही.. कुणाला वाटेल काय इतक्या माळा करीत बसला आहे.. कुणी म्हणेल का इतका वेळ डोळे मिटून ध्यान करीत बसला आहे.. कदाचित जोवर जप ‘करणं’ आहे, ध्यान ‘करणं’ आहे तोवर करणाऱ्यालाही सुरुवातीला तसं वाटेल बरं का! की, किती वेळ मी हे करतोय, पण काही अनुभव का नाही.. जेव्हा ते ‘करणं’ उरणार नाही आणि आपोआप होऊच लागेल तेव्हा? तेव्हा जगण्यातले अनेक गोंधळ कमी होतील..
कर्मेद्र – तुझा अनुभव आहे हा?
हृदयेंद्र – (हसत) माझा नाही.. पणं ऐक तर.. तर जेव्हा ‘करण्या’ची जागा ‘होण्या’नं घेतली जाईल तेव्हा जगणं अधिक शांत, अधिक सहज होऊ लागेल.. तेव्हा ज्ञान्या जगणं हीच साधना होईल.. तेव्हा पहिली पायरी ही की जास्तीत जास्त वेळ साधनेला द्यायला हवा..
ज्ञानेंद्र – मला वाटतं साधना करीत असतानाच अंत:प्रेरणांकडे लक्ष हवं, म्हणजेच अवधानही हवं.. हे अवधान अंतरंगातील विचारप्रवाहाचं असेल तसंच बाहेरच्या जगातील कृतीप्रवाहाचंही असेल.. सर्व कृती या विचारातून किंवा बहुतेकवेळा अविचारातूनच घडतात, हे लक्षात आलं की विचारांकडे अधिक लक्ष देणं सुरू होईल..