रंगकर्मी म्हणून आयुष्यभर काम केले, तरी एखाद्या नटाची एखादी भूमिका गाजते, एखादय़ा नाटकाच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक किंवा एखाद्याच नाटकाशी नाव जोडले गेलेले लेखकही कमी नाहीत. रघुवीर नेवरेकरांनी मात्र, असा ‘एकुलता एक’ शिक्का टाळण्याचे कसब राखले. इतकेच नव्हे, तर नट किंवा लेखक किंवा दिग्दर्शक यापैकी एकाच कोनाडय़ात न बसता ‘रंगकर्मी’ ही ओळख ते कायम ठेवू शकले. शिक्का बसू न देण्याचे त्यांचे बहुविध कसब हे, रविवारी झालेल्या त्यांच्या निधनानंतरही प्रेरणादायी ठरेल.
शिक्का अनेकांना उपयुक्तही वाटतो.. मग कुणाला ‘डिट्टो संभाजी’ व्हायचे असते तर कुणाला ‘तळीराम’.. अशाने लोकप्रियता मिळते, पण व्यक्तिमत्त्व हरपते. रघुवीर नेवरेकर यांना आज कुणी ‘संशयकल्लोळ’ नाटकातील ‘फाल्गुनराव’ म्हणून ओळखते, तर कुणी ‘श्वेतांबरा’ या दूरदर्शन-काळच्या मालिकेतील ‘गायकवाड’ म्हणून.. तर आणखी काही जण ‘शारदा’ नाटकातील ‘भुजंगराव’ या भूमिकेसाठी आजही रघुवीर नेवरेकरांची तारीफ करतात. वास्तविक या भूमिका निरनिराळय़ा.. भुजंगराव आणि फाल्गुनराव ही गोविंद बल्लाळ देवलांनी लिहिलेली दोन्ही वयस्कर पात्रे प्रेक्षकांसाठी हास्यविषय ठरली हे खरे, पण पन्नाशीतील फाल्गुनराव संशयीपणा आणि अतिशहाणपणामुळे फजित होतो, तर ‘अवघे पाऊणशे वयमान’ असलेल्या भुजंगरावाचा लंपटपणा एकाच वेळी हास्यास्पद आणि तरीही चीड आणणारासुद्धा ठरतो! हे सारे रंग दाखवणाऱ्या नेवरेकरांना ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’च्या कलाविभागामुळे दिग्दर्शनाची तर संधी मिळालीच, पण त्यांनी काही नाटकांचे लेखनही केले होते.
हे नाटय़लेखन त्यांच्या मातृभाषेत, कोंकणीत होते, इतकेच. गोवामुक्तीनंतर पणजी आकाशवाणी केंद्रावर सादर झालेले पहिले नभोनाटय़ रघुवीर ‘नेवरेकार’ यांनी लिहिले होते! ‘पोपयबाबली मुंबई’ हे त्या नभोनाटय़ाचे नाव. पोपयबाब हा गोव्याहून मुंबईला स्थायिक होतो आणि मुंबईची अफाट, अचाट वर्णने लोकांना सांगतो, त्यातून घडणाऱ्या गमतींची ही गोष्ट. ती साधीच असली, तरी नभोवाणीसारख्या नव्या माध्यमात चांगले नट आले पाहिजेत, म्हणून त्यांनी तेव्हा केलेले प्रयत्न अनेकांना आजही आठवतात! हे असेच प्रयत्न त्यांनी ‘जल्मगांठ’ या दूरदर्शनवर सादर झालेल्या कोंकणी नाटकासाठी केले होते. आशालता वाबगावकर, मोहनदास सुखठणकर ही कोंकणीभाषक मंडळी या नाटकात होतीच, पण या भाषेशी मूळचा संबंध नसलेल्या भक्ती बर्वेकडून उच्चार आणि हेल घटवून घेऊन, तिला नायिका म्हणून उभी करण्याचे आव्हानही रघुवीर नेवरेकर यांनी पार पाडले होते.
कलाकाराचे बहुपैलुत्व इतरांना महत्त्वाचे वाटतही नसेल, पण ते आनंद देते आणि मुख्य म्हणजे, व्यक्ती म्हणून कलाकाराचा कणा या बहुपेडीपणामुळे ताठ राहतो. तो कणा नेवरेकरांनी अखेपर्यंत जपला होता.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2014 रोजी प्रकाशित
रघुवीर नेवरेकर
रंगकर्मी म्हणून आयुष्यभर काम केले, तरी एखाद्या नटाची एखादी भूमिका गाजते, एखादय़ा नाटकाच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक किंवा एखाद्याच नाटकाशी नाव जोडले गेलेले लेखकही कमी नाहीत.
First published on: 25-11-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About raghuvir nevrekar personality