– अभय टिळक
लोकव्यवहाराचा पोत सुधारायचा तर त्यासाठी आवश्यक ठरतो लोकसंवाद. तो साधायचा तर लोकभाषेचा अंगीकार अनिवार्य ठरतो. इथे ‘लोकभाषा’ या संज्ञेची ‘लोकांची वा लोक बोलतात/ वापरतात ती भाषा’ इतकी बंदिस्त व्याख्या करून भागणार नाही. ‘लोकांना समजेल अशी भाषा’ हाही अर्थाचा एक पदर इथे अलक्षित ठेवून चालणार नाही. महात्मा चक्रधरस्वामींपासून उगम पावणाऱ्या लोकसंग्राहक आणि समाजाभिमुख संतविभूतींच्या परंपरेने तिच्या भाषाव्यवहाराद्वारे आपल्या पुढ्यात समूर्त-साकार केलेला मुख्य धडा कोणता असेल, तर तो हाच! लोकव्यवहारातील हिणकस अंश दूर करण्यासाठी समाजशिक्षणाचे कंकण बांधलेल्या धुरीणांना त्यासाठी प्रथम मेहनत घ्यावी लागते, ती भाषेसंदर्भात. जे सांगायचे आहे ते लोकमानसाला थेट भिडेल अशी भाषा प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. अशी भाषा आकाशातून पडत नसते. तर, व्यवहारातील भाषेद्वारे हस्तगत होणारे मूलद्रव्य वापरूनच, पण आपल्याला जे म्हणायचे आहे त्याचे वहन नेमकेपणाने घडवू शकणारी समर्थ भाषा समाजसेवाव्रतींना घडवावी लागते. त्यासाठी उपसावे लागतात कष्ट. स्वभाषेचा निव्वळ पोकळ अभिमान यासंदर्भात पुरेसा ठरत नाही. हे इंगित अचूक हेरले ज्ञानदेवांनी. ‘‘माझा मºहाटा चि बोलु कवतिकें। परि अमृतातें हीं पैजेंसीं जींके। ऐसीं अक्षरें चि रसिकें। मेलवीन।।’’ ही त्यांची प्रतिज्ञा त्या जाणिवेचे द्योतक ठरते. आपणही असे बहाद्दर, की ज्ञानदेवांच्या या कथनाद्वारे व्यक्त होणारा स्वभाषाभिमान तेवढा आम्ही आपलासा केला. त्यासाठी ज्ञानदेवांनी घेतलेल्या परिश्रमांकडे मात्र आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो आहोत. लोकभाषेची अर्थवाहकता सक्षम व वृद्धिंगत बनवत असतानाच, त्या भाषाव्यवहारातील अंगभूत रसाळपणा कोठेही लोपणार नाही याची दक्षता घेत मी अर्थवाही शब्दयोजना करीन, हा ज्ञानदेवांचा निर्धार आणि त्यात अनुस्युत परिश्रम भावतात का आपल्याला कधी? ‘‘तेणें कारणें मी बोलैन। बोली अरूपाचें रूप दावीन। अतींद्रिय परि भोगवीन। इंद्रियांकरविं।।’’ या ज्ञानदेवांच्या ठायी वसणाऱ्या आत्मविश्वासाला जोड आहे ती परिश्रमांची. जो विषय शब्दब्रह्मालाही आकळता येणे दुष्कर ठरते, तो अक्षरबद्ध करण्यासाठी सरसावलेल्या ज्ञानदेवांनी म्हणूनच ग्रंथारंभी वंदन केले आहे शब्दगणेशाला. तत्कालीन ज्ञानभाषा असणाऱ्या संस्कृतचा परिचय नसल्यामुळे लोकभाषा असणाऱ्या प्राकृताचा आश्रय ज्ञानदेवांनी केला असावा, असा गैरसमज जोपासणे हे तर केवळ हास्यास्पदच ठरेल. ‘अमृतानुभव’च्या प्रारंभी रचलेल्या पाच संस्कृत श्लोकांत अंतर्भूत असणारा आशयच ज्ञानदेवांनी पुढील जवळपास ८०० प्राकृत ओव्यांमध्ये रसाळपणे विस्तारलेला दिसतो. ‘ज्ञानेश्वरी’ ही प्रतिपद टीका, तर ‘अमृतानुभव’ स्वतंत्र प्रबंध होय. टीकाग्रंथ आणि प्रबंधलेखन अशा उभय उपयोजनांसाठी प्रचलित लोकभाषा असणारी प्राकृत समसमान समर्थ असल्याची रोकडी प्रचितीच जणू ज्ञानदेवांनी या दोन अक्षरलेण्यांच्या निर्मितीद्वारे संस्कृतप्रधान तत्कालीन ज्ञानविश्वातील मुखंडांच्या पुढ्यात ठेवली. ‘‘संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी। मा प्राकृतीं काय उणीवी। नवीं जुनीं म्हणावीं। कैसेनि केवीं सुवर्णसुमनें।’’ अशा आत्मविश्वासभरित शब्दांत पैठणवासी नाथरायांनी पुढे उत्तुंग इमारत उठवली ती ज्ञानदेवांनी सुदृढ आणि सक्षम बनविलेल्या लोकभाषेच्या पायावरच. मायमराठीला समर्थ ज्ञानभाषा बनविण्यासाठी आज आपण काय प्रयत्न करतो आहोत?
agtilak@gmail.com
