अभय टिळक agtilak@gmail.com

भगवान शिवशंकर आणि आदिशक्ती भवानी यांच्या गुजगोष्टींद्वारे शांभवाद्वयाच्या तत्त्वदर्शनाचे अवतरण घडून आले, अशी आहे परंपरेची धारणा. नाथसंप्रदायाचा उगमही कैलासनाथांपासूनच. शिवमुखातून उगम पावलेला शैवागमाचा तोच बोधप्रवाह परंपरेने पुढे वाहत आला ज्ञानदेवापर्यंत. क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये शांभवाद्वयाचे शब्दरूप कैलासराण्याच्या मुखाद्वारे आदिशक्तीच्या कानांत प्रवेशताना श्रवणेंद्रियांद्वारे झिरपले त्याच परिसरामध्ये असणाऱ्या मच्छिंद्रनाथांच्या अंतर्मनात. नाथसंप्रदाय मुदलात योगप्रधान. आदिनाथ गणले जाणारे भगवान शंकर त्याचमुळे होत महायोगीही. योगप्रधान अशा त्या तत्त्वदर्शनाच्या प्रगाढ अनुभूतीमुळे मच्छिंद्रनाथ थेट योगसमाधीमध्ये प्रविष्ट झाले असावेत, असे अनुमान काढण्यास अवसर गवसतो ज्ञानदेवांच्या कथनामध्ये. ‘ज्ञानेश्वरी’च्या अंतिम अध्यायात ग्रंथोपसंहारादरम्यान ज्ञानदेवांनी तो सारा घटनाक्रम तपशिलाने उलगडून मांडलेला आहे. ‘मग समाधि अव्यत्यया । भोगावी वासना यया । ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं’ ही ज्ञानदेवांची ओवी उद्बोधक ठरते. ज्या तत्त्वबोधाच्या प्रभावाने योगसमाधीचे सुख लाभले तोच बोधरूपी वसा आपल्या शिष्योत्तमाच्या, म्हणजेच, गोरक्षनाथांच्या ओंजळीमध्ये सुपूर्द करतेवेळी योगसमाधीचे अवस्थांतर ‘अव्यत्यय’ समाधीमध्ये घडून यावे याची दक्षता मच्छिंद्रनाथांनी घेण्यात एक अत्यंत निर्णायक असे स्थित्यंतर सामावलेले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगयोगातील अंतिम अशी आठवी अवस्था म्हणजे समाधी. या योगसमाधीला कालाच्या सीमा आहेत. समाधिवस्थेमध्ये प्रविष्ट होणे आणि समाधिवस्थेचे विसर्जन घडवून आणून पुन्हा एकवार लौकिकातील देहवृत्तीवर येणे या उभय बाबी योग्याच्या आधीन असतात. अष्टांगयोगाची, खास करून योगसमाधीची साधना  दुष्करच. मात्र, प्रेमसमाधीची बाबच काही और!  प्रेमसमाधी खऱ्या अर्थाने ठरते ‘अव्यत्यय’. मच्छिंद्रनाथांनी जी मुद्रा गोरक्षांच्या अंत:करणावर उमटविली तिच्या प्रभावापायी गोरक्षांना प्राप्ती झाली अव्यत्यय अशा प्रेमसमाधीची. आणि तोच प्रेमसमाधीयोग परंपरेने हस्तगत झाला ज्ञानदेवांना. गोरक्षांना त्यांच्या सद्गुरूंनी प्रदान केलेली मुद्रा ही ‘प्रेममुद्रा’च होती याचा दाखला देतात निवृत्तिनाथच गुरु परंपरेच्या अभंगात. ही अवघी परंपरा ज्यांच्यापासून उगम पावते त्या कर्पूरगौर शिवाला मस्तकी धारण करूनच ब्रह्मांडनायक पंढरीश परमात्मा विटेवर उभा ठाकलेला असल्याने पंढरीपेठ  ठरते प्रेमनगरी. ‘ऐसें पंढरीचें स्थान । याहूनि आणिक आहे कोण । विष्णुसहित कर्पूरगौर । जेथें उभे निरंतर’ असे पंढरीक्षेत्राचे अनन्यत्व नाथराय वर्णन करतात त्याचे गमक हेच. शिव आणि विष्णू या उभय तत्त्वांचा समन्वय नांदणारे पंढरी हे लोकक्षेत्र अहोभाग्याचे गणले जावे, हे तर ओघानेच आले. ‘धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं’ असे तुकोबाराय म्हणतात ते काय उगीच ! योगसमाधीद्वारे देहातीत अवस्थेला पोहोचलेल्या योग्याला ऐकू येणारा अनाहत नाद त्या योगसमाधीपेक्षा प्रेमसमाधीमध्ये भजनानंदाच्या माध्यमातून घरोघरी निमग्न असलेल्या साधकांनाही ऐकू यावा, यात नवल ते काय?  ‘अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळुगा’ हे नामदेवरायांचे  उद्गार म्हणजे वास्तवाची रोकडी साक्षच!