विचारांचा कल्लोळ मनात उसळलेला असला की झोप लागत नाही, हा अनुभव सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा येतच असतो. मनोव्यापारांपासून मन परावृत्त झाले की मग हळूहळू निद्रेचा अंमल चढू लागतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर वृत्ती अस्थिर असते तोवर नाही होत मन शांत आणि मनाचे शांतवन होत नाही तोवर पारखेच राहतो आपण सुखनिद्रेपासून. व्यवहारातील हाच न्याय तंतोतंत लागू होतो परमार्थाच्याही क्षेत्रात. ‘‘तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी। सुखाचे शेजारी पहुडईन।’’ ही तुकोक्ती अतिशय स्पष्ट आणि मार्मिक ठरते या संदर्भात. विचारमग्न असलेले मन तिथून निवृत्त झाल्याखेरीज त्याला शांतता लाभत नसते. ‘निमग्नता’ हा होय ‘प्रवृत्ती’ या शब्दाच्या अनेकार्थापैकी एक अर्थ. प्रवृत्तीकडून मन निवृत्तीकडे वळणे हे ठरते आंतरिक स्थित्यंतराचे प्रथम पर्व. इथे ‘प्रवृत्ती’ आणि ‘निवृत्ती’ या दोन संज्ञा ठरतात परस्परसापेक्ष. प्रवृत्तीचा निरास साधून साधक स्थिर होतो निवृत्तीच्या प्रांतात. ‘‘मन हें राम जालें मन हें राम जालें। प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तिसी आलें।’’ हे ज्ञानदेवांचे उद्गार साक्ष पुरवितात नेमक्या त्याच आंतरिक प्रवासाची. अद्वयाच्या प्रांतात अणुमात्रही अवकाशच नाही कोणत्याच सापेक्षतेला. त्यामुळे ‘निवृत्ती’ असे नाम धारण केलेल्या आपल्या गुरुपदाच्या संदर्भात विलक्षण जागरूक आणि संवेदनशील आहेत ज्ञानदेव. प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन साध्य करून परम निवृत्तीच्या अवस्थेमध्ये चिरंतन स्थित असलेली विभूती म्हणजे सद्गुरू निवृत्तिनाथ, अशी जर कोणाची धारणा असेल तर, व्यवहारातील ती सापेक्षता पूर्णत: अप्रस्तुतच ठरते. माझ्या सद्गुरूंच्या बाबतीत, असे ठाम आणि निरपवाद प्रतिपादन आहे ज्ञानदेवांचे. ‘‘वांचौनि प्रवृत्ति विरोधे। कां निवृत्तिचेनि बोधे। आणिजे तैसा वादे। निवृत्ति नव्हे।’’ ही ‘अनुभवामृता’च्या दुसऱ्या प्रकरणातील ओवी अधोरेखित करते ज्ञानदेवांची ही भूमिका. किंबहुना, वृत्तीचा कणभरही संसर्ग माझ्या सद्गुरूंना कधीच झालेला नसल्यामुळे, वृत्तीचा विलय घडवून आणल्याचे निदर्शक ठरणारे ‘निवृत्ती’ हे अभिधान त्यांनी निर्हेतूक धारण केलेले आहे, असे स्पष्टीकरण होय ज्ञानदेवांचे या संदर्भात. कमालीची विलोभनीय अशी एक मोठी मौज केलेली आहे ज्ञानदेवांनी इथे. ‘अनुभवामृता’च्या दुसऱ्या प्रकरणातील- ‘‘सूर्यासि अंधकारू। कैं झाला होता गोचरू। तऱ्ही तमारी हा डगरू। आलाचि कीं।’’ ही ओवी पराकोटीची मार्मिक ठरते इथे. ज्या सूर्याने अंधाराचे कधी तोंडही बघितलेले नाही त्याला ‘अंधाराचा शत्रू’ (तमारी) असे संबोधणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर आळ घेण्यासारखेच होय. अगदी त्याच न्यायाने, ज्यांना वृत्तीचा कधी संसर्गही झालेला नव्हता अशा माझ्या सद्गुरूंना ‘वृत्तीचा निरास करणारे ते निवृत्तिनाथ’ असे संबोधणे हा त्यांच्यावर अन्यायच नाही का, असा कमालीचा अर्थगर्भ प्रश्न उपस्थित करतात ज्ञानदेव. प्रवृत्तीच्या निराकरणाद्वारे माझ्या सद्गुरूंचे ‘निवृत्त’पण प्रस्थापित झालेले नसून ते स्वयंभू आहे, हे अलौकिक वास्तव- ‘‘ऐसे करणियावीण। स्वयंभचि जे निवृत्तिपण। तयाचे श्रीचरण। वंदिले ऐसे।’’ अशा निरपवाद शब्दांत गर्जून सांगतात ज्ञानदेव. ‘सद्गुरू’ हे अधिष्ठान असे निरंतर विद्यमान असते सापेक्षतेच्या कुंपणाबाहेरच! – अभय टिळक

agtilak@gmail.com