भगवंत आपलासा करून घेणे हेच ज्यांचे जीवितध्येय बनते आहे अशा उपासकांसाठी तुकोबाराय त्यांच्या एका अल्पाक्षर परंतु कमालीच्या आशयघन अशा अभंगात जणू एक प्रारूप आचारसंहिताच नमूद करतात. आणिकांचें कानीं। गुणदोष मना नाणीं हा त्या अभंगातील तिसरा चरण आहे विलक्षण मार्मिक. मौनसाधनेची वाटच जणू निर्देशित करतात तुकोबा या शब्दकळेद्वारे. या उपदेशाचा गाभा समजावून घ्यायचा तर एक जी फार मोठी गंमत नाथरायांनी त्यांच्या ‘एकनाथी भागवता’च्या १६व्या अध्यायात करून ठेवलेली आहे तिची तोंडओळख करून घ्यावयास हवी. देवा तुझ्या विभूती नेमक्या कोणत्या आहेत ते मला कृपा करून कथन करावे, अशी विनंती परमभक्त उद्धव प्रेमपडिभाराने श्रीकृष्णनाथांना करतात असा प्रसंग नाथ चितारतात १६व्या अध्यायात. अगदी श्रीमद्भगवद्गीतेमधील ‘विभूतियोगा’चे स्मरण व्हावे, असेच आहे ते सारे कृष्णमुखातून तिथे अवतरलेले नाथकृत विभूती-विवरण. त्या ओव्यांमधील, तें गुह्यांमाजीं अतिगुह्य जाण। सत्य वाचा कां मनींहूनि मौन। तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य हे कृष्णवचन अधोरेखित करते तुकोबा आणि नाथराय यांचे कमालीचे मधुर असे आंतरिक सामरस्य. ‘सत्य’ आणि ‘मौन’ या दोन माझ्या विभूती होत, हेच सांगत आहेत भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने उद्धवांना. तर, परतत्त्वाचे तेच विभूतिमत्व हस्तगत करून घ्यायचे असेल तर इतरेजनांच्या गुणदोषांची चर्चा करण्यात वाणी वेचू नका, हेच सांगत आहेत तुकोबाराय त्यांच्या परीने. नाथांचे मानसपुत्रच जणू तुकोबाराय शोभतात ते असे. इतरांच्या दोषगुणांची चिकित्सा करत बसण्याने आत्मसंवाद अबाधित राखण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या मौनाला आपण पारखे होतो, हा अतिशय सूक्ष्म परंतु गंभीर धोका एवं स्तुति निंदा वाग्वाद। करितां खुंटला संवाद। महामौनें अतिशुद्ध। परमानंद साधकां अशा शब्दांत आपल्या पुढे उघड करतात नाथराय तेवढ्याचसाठी. परंतु, एवढ्यावरच थांबत नाहीत ते. चारचौघांच्या गुणदोषांचे अकारण चर्वितचर्वण करण्यापेक्षा मौनावर ध्यान केंद्रित करण्यामागील कार्यकारणभावाचा अनुबंध नाथराय थेट जोडतात तो अद्वयबोधाशी. शांभवाद्वयाच्या प्रतिपादनानुसार परमशिव हे एकच तत्त्व सृष्टीमध्ये ओतप्रोत असल्यामुळे दुसऱ्याचे गुणदोष तपासत बसायचे तर ‘दुसरा’ पदार्थ आहेच कोठे मुदलात अस्तित्वात, असा अगदी मुळावरच घाव घालतात नाथ. अद्वयदृष्टीचे लेणे ल्यालेल्या परिपक्व साधकाच्या नेत्रद्वयाला सर्वत्र एकमात्र चैतन्याचीच काय ती प्रचीती येत असल्याने (अगदी करायचीच झाल्यास) स्तुती अथवा निंदा करायची कोणी, कशी आणि कोणाची हाच मूलभूत प्रश्न त्याच्या मनीमानसी उद्भवतो. आपणच आपली स्तुती अगर निंदा करण्याला तत्त्वश: काही अर्थ तरी कधी असतो का? तेव्हां ज्याचे बोलावे अवगुण। तेथें दिसे हृदयस्थ आपण। यालागीं बोलतां पैशुन्य। पडे मौन गुरू वाक्यें अशी अवस्था अद्वययोग्याची असल्याने अवगुणांची निंदा निखालस निरर्थकच ठरते. आणि, गुण देखोनियां स्तवन । करितां पडे दृढ मौन । मीचि स्तव्य स्तविता स्तवन । मज म्यां वानितां पूर्ण मूर्खत्व माझें अशी स्थिती अद्वयबोधावर स्थिर झालेल्या उपासकाची असल्याने गुणकीर्ती गाण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही. एकूण काय तर, त्रिपुटीचा लय झाला की बाकी उरते ती निखळ आणि केवळ महामौनाचीच!

agtilak@gmail.com

– अभय टिळक