ब्राझीलच्या रिओमध्ये आजपासून २०६ देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत असून एकप्रकारे गोळीबार नसलेले ते युद्धच असते..

गेल्या चार स्पर्धामध्ये अमेरिका, चीन आणि रशियाने मोठी कामगिरी केली होती. हा त्या देशांचे वृद्धी पर्यावरणअधिक चांगले असल्याचा परिणाम आहे. भारताला मिळणाऱ्या पदकांच्या संख्येकडे पाहून नाक मुरडण्याआधी आपणांस हे नीट लक्षात घेतले पाहिजे.

सात वर्षांपूर्वी ब्राझीलने पाहिलेले स्वप्न आजपासून प्रत्यक्षात उतरत आहे. जगातील २०६ देशांचा सहभाग असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आज ब्राझीलमध्ये रिओ-डी-जानेरोमध्ये सुरुवात होत आहे. ती प्रथेप्रमाणे शानदार असेल. तीन हजार वर्षांचा इतिहास असलेली आणि जगातील अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन हे नेत्रदीपक असणार. ते तसे करण्याचा सर्वच यजमान देशांचा प्रयत्न असतो. याचे कारण थेट बाजारपेठीय अर्थकारणाशी निगडित असते. ब्राझीलला हा सोहळाच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेचे आयोजन नेटके करून दाखविण्याची अत्याधिक गरज आहे. सात वर्षांपूर्वी या देशाने जेव्हा स्पर्धा भरविण्याची स्पर्धाजिंकली तेव्हा त्याच्या अर्थकारणाचा रथ ऑलिम्पिक धावपटूच्या वेगाने धावत होता. तेथील तेल, खनिजसंपत्ती, शेतमाल यांची निर्यात जोरात होती. त्यातून आलेल्या समृद्धीची झळाळी संपूर्ण देशावर पसरलेली होती. अर्थव्यवस्थेचा हा वेग कायम राहील आणि मंदावला तरी तो फारसा जाणवणार नाही असा अनेकांचा होरा होता. पण अर्थव्यवस्थेलाही भौतिकशास्त्राचे नियम लागू असतात. त्याचेही एक वर्तुळ असते. शहाणे अर्थपंडित दोन, पाच वा फार तर सात वर्षांच्या पुढचा अर्थस्थितीचा अंदाज सहसा मांडत नसतात तो त्यामुळेच. आज सात वर्षांनंतर ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा चेंडू जमिनीवर आला आहे. निर्यातघट, बेरोजगारी, घटलेली भांडवली गुंतवणूक आणि परिणामी लोकांमधील वाढता असंतोष ही त्या देशाची सध्याची अवस्था आहे. अशा परिस्थितीत जगातील हा सर्वात मोठा क्रीडा महोत्सव या देशात भरलेला आहे. समाजातील उत्सव नेहमीच आर्थिक उलाढालीला हातभार लावत असतात. तो उत्सव ऑलिम्पिकसारखा मोठा असेल, तर त्याचा परिणामही तेवढाच प्रचंड असतो. आज स्पर्धेतील कोणत्याही पदकांपेक्षा ब्राझीलच्या आशा या परिणामांवर केंद्रित झालेल्या असतील. आजच्या उद्घाटनाच्या सामन्यातून निर्माण होणारे चित्र देशाचा आत्मविश्वास वाढविणारे ठरावे अशीच तेथील राजकीय आणि आर्थिक नेतृत्वाची इच्छा असेल. भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ब्रिक्स गटातील या देशाची ही इच्छा फलद्रूप होणे हे सर्वासाठीच आवश्यक आहे. या स्पर्धेतून हे जरी साध्य झाले तरी ते तिचे मोठेच यश मानावे लागेल. इंग्रजीत याला ‘हक्र्युलीन टास्क’ असे म्हणतात. ब्राझीलसमोरील आव्हानाला त्याहून योग्य शब्द नाही. ही संज्ञा ज्या हक्र्युलसच्या नावावरून पडली, तो हक्र्युलस हा या स्पर्धेचा उद्गाता अशी दंतकथा सांगितली जाते. झ्युस या देवतेच्या सन्मानार्थ हा खेळांचा विधी भरविला जात असे आणि त्यात ग्रीसमधील विविध वंशांचे लोक सहभागी होत असत. ऑलिम्पिकच्या या ३१व्या आवृत्तीमध्ये अमेरिका, चीन यांसारख्या बलाढय़ांपासून आफ्रिकेतील गरीब, छोटय़ा देशांपर्यंतच्या विविध राष्ट्रांतील शेकडो क्रीडापटू सहभागी होत आहेत. रविवारपासून विविध क्रीडा प्रकारांच्या विविध सामन्यांत ते एकमेकांशी भिडतील.

हे भिडणे म्हणजे केवळ स्पर्धा नसते. ते युद्ध असते. जॉर्ज ऑर्वेल यांच्या शब्दांत सांगायचे तर, त्याचा खिलाडूवृत्तीशी काहीही संबंध नाही. द्वेष, ईर्षां, अहंकार, अनादर आणि परपीडेतील आनंद हे त्यांत ओतप्रोत भरलेले असते. थोडक्यात सांगायचे तर ते गोळीबार नसलेले युद्धच असते. अशाच प्रकारचे वेगळे, अधिक हिंसक आणि खरे युद्ध जगात सर्वत्रच सुरू आहे. त्याची झळ लागलेली नाही असा एकही देश आज उरलेला नाही. आयसिससारख्या दहशतवादी संघटनांनी चालवलेला रक्तपात, त्यातून निर्माण झालेली निर्वासितांची समस्या, चीनसारख्या देशांची वाढती साम्राज्यवादी आकांक्षा, जगभरात वाढलेले स्थलांतर आणि त्यावरून निर्माण होत असलेला संघर्ष, याच मुद्दय़ावरून दुभंगलेला युरोपीय महासंघ आणि हाच मुद्दा अग्रस्थानी आणून लढवली जात असलेली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अशा जग अस्थिर करणाऱ्या घटना प्रत्यही घडत आहेत आणि त्या पाश्र्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धेतील अहिंसक युद्ध सुरू होत आहे. पण या युद्धाची खासियत अशी की त्यातून होते ते युद्धखोर भावनांचे विरेचनच. खेळाचा हा महत्त्वाचा गुणधर्म. मानवी भावनांना कडेलोटापासून सावरणारा. इ.स.पूर्व ७७६ मध्ये प्राचीन ग्रीसमधील ऑलिम्पिया येथे जेव्हा पहिल्यांदा ऑलिम्पिकची सुरुवात झाली, तेव्हा त्याचा मूळ हेतूही हाच होता. राग, चीड, ईर्षां, वर्चस्वाची इच्छा या भावना माणसाचे रूपांतर जनावरात करणाऱ्या, रक्तपात घडविणाऱ्या. त्यांचे शमन हिंसेने न करता मैदानी खेळातील कौशल्यातून व्हावे, हा त्यामागचा दृष्टिकोन होता. आज त्या घटनेला तीन हजार वर्षे लोटत आली आहेत. या काळात कधी दुष्काळ, महापूर तर कधी शीतयुद्ध अशा या ना त्या कारणांनी स्पर्धेत खंड पडला, परंतु संपली नाही. उलट ती अधिकाधिक व्यापक आणि प्रगल्भ होत गेली. आदिम पाशवी भावनांचे विरेचन करत राहिली. त्याचा परिणाम किती झाला, हे अर्थातच वेगळे सांगायची आवश्यकता नाही. यंदा या स्पर्धेत निर्वासितांचा दहा जणांचा संघ सहभागी होत आहे. ही कृती तशी सांकेतिकच. जागतिक सद्भावनेचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहावे लागेल. परंतु तोही तसा अपवादच. एकुणात खेळांचा असा सामाजिक परिणाम समाजावर होत असता, तर शाळांपेक्षा क्रीडांगणांना अधिक महत्त्व आले असते.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे देश किंवा त्यांचे खेळाडू खरेच खिलाडूवृत्तीने सहभागी होतात का? की केवळ आणि केवळ जिंकण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यातील अपेक्षित खेळभावनेला पुरून उरते, हे जाणण्यासाठी संशोधनाची गरज नाही. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच्या घडामोडी पाहिल्या तरी, या गोष्टी लख्खपणे समोर येतील. आपल्या खेळाडूंनी अधिकाधिक पदे जिंकावीत यासाठी रशिया सरकारने स्वत:च उत्तेजक सेवन कार्यक्रम राबवला आणि उत्तेजक सेवनात खेळाडू दोषी आढळू नये म्हणून प्रयत्न केले हे आता उघड झाले आहे. दुसरे यापेक्षा वेगळे उदाहरण आपल्या देशातील. ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या नरसिंग यादवला स्पर्धेत उतरण्यापूर्वीच बाद करण्यासाठी त्याच्या जेवणात उत्तेजक द्रव्य मिसळण्यात आल्याचे उघड झाले. नरसिंग त्या परीक्षेतून सहीसलामत बाहेर पडला, पण या प्रकरणाने देशातल्या देशातच खेळाडूंमध्ये असलेली स्पर्धा किती जहरी होत चालली आहे, याचे दर्शन घडवले. विजयाचा उन्माद नसावा आणि पराभवाची भीती नसावी, ही खेळामागची भावना. पण त्या भावनेलाच आता छेद दिला जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे खेळात शिरलेले अर्थकारण असे सांगितले जाते. त्यात तथ्य आहेच. परंतु हे अर्थकारण नसेल तर अशा खेळस्पर्धाही टिकू शकणार नाहीत. अर्थकारणाचा संबंध केवळ खेळांच्या आयोजनाशीच नसतो, तर खेळाडूंच्या कौशल्याशीही असतो. त्यांच्या विजयाशीही असतो. खेळाच्या केवळ आयोजनातून तो देश स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करू शकतो, हे ऑलिम्पिकविषयक संशोधनातून दिसून आले आहे. गेल्या चार स्पर्धामध्ये अमेरिका, चीन आणि रशियाने मोठी कामगिरी केली होती. हा त्या देशांचे ‘वृद्धी पर्यावरण’ अधिक चांगले असल्याचा परिणाम आहे. भारताला मिळणाऱ्या पदकांच्या संख्येकडे पाहून नाक मुरडण्याआधी आपणांस हे नीट लक्षात घेतले पाहिजे.

गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडू सांघिक क्रीडाप्रकारांत चमकत असले, तरी यंदाही वैयक्तिक स्पर्धेतूनच भारताला पदकांच्या अधिक आशा आहेत. भारताच्या सामाजिक रचनेबद्दल भाष्य करणारी अशीच ही गोष्ट आहे. देश एकीकडे विश्वगुरू बनण्याची स्वप्ने पाहात असताना आपले सांघिक यश समजून घेणे ही आपल्या शहाणपणात भर घालणारी कृती ठरेल. ऑलिम्पिक स्पर्धेने पुन्हा एकदा त्या संधीची ज्योत पेटवून आपल्या हातात दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व खेळाडूंना ‘लोकसत्ता’च्या शुभेच्छा!