सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात मोहीम चालवणारे समाजमाध्यमी टोळभैरव आणि त्यांच्या नियंत्रकांना समोर आणण्याचा मुंबई पोलिसांचा निर्धार स्वागतार्ह..

याचे कारण अनेक देशांतून ८० हजार बनावट नावांनी याप्रकरणी समाजमाध्यमी राळ उडवली. याचा अर्थ हे सर्व पद्धतशीरपणे केले गेले आणि त्यासाठी आवश्यक पैसा हाती असल्याखेरीज हा गोंधळ इतका जागतिक होताच ना..

आधुनिकपूर्वकालीन युद्धतंत्रात लाठय़ाकाठय़ांनी लढणारे सैनिक आरंभालाच त्यांच्या संख्येपेक्षा किती तरी पट अधिक गलबला माजवून देत. हेतू हा की, शत्रू सैन्यास आपली संख्या आहे त्यापेक्षा अधिक वाटून त्याच्या उरात धडकी भरावी. माणूस आधुनिक झाला तरी त्याच्या प्रेरणा आदिमच राहतात. म्हणून त्याची साधने बदलली तरी समोरच्यास गोंधळून टाकण्यासाठी नुसताच गलबला करण्याची त्याची सवय तशीच आहे. कालानुरूप यात फरक झाला असेल तर तो इतकाच की, त्या काळी युद्धे लढण्याच्याही वेळा होत्या आणि सूर्य अस्तास गेल्यानंतर शस्त्रे त्या दिवसासाठी म्यान केली जात. आता युद्धे ‘जाहीर’ करून लढली जात नाहीत आणि जीव घेणे हा या युद्धांचा हेतू असतोच असे नाही. तसेच आजच्या युद्धांतील गोंधळी हे डोळ्यांस दिसत नाहीत. या आधुनिक पगारी, कंत्राटी गोंधळ्यांस समाजमाध्यमे असे म्हणतात. जीव घेणे आणि गेलेल्या जीवाची उस्तवारी करणे हे खर्चीक असल्याचे त्यांना समजत असल्याने माणसांस न मारता त्यांची विचारक्षमता बधिर करून त्यांस इष्ट लक्ष्यास जुंपण्याचे काम ते चोख करतात. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर जो काही धुरळा उडवून दिला गेला त्यातून हेच आदिम सत्य दिसून आले. या उच्छृंखल आणि बेजबाबदार तरुणाचा मृत्यू हा आत्महत्याच असा निर्वाळा नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांतील या गदारोळाचा समाचार घेणे आवश्यक ठरते.

याचे कारण ज्या गतीने त्यातल्या त्यात बुद्धीने बरे वाटत होते असेही राजकारणी या निर्बुद्ध गलबल्यात सहभागी झाले ते थक्क करणारे होते. जनमताच्या लाटेवर आपण किती स्वार व्हावे याचा कोणताही विचार आणि विवेक या राजकारण्यांनी दाखवला नाही. तसेच यातील दुसरा गंभीर मुद्दा म्हणजे, राजकीय शत्रुत्व जोपासण्यासाठी आपण कोणत्या ‘शस्त्रा’चा वापर करीत आहोत हे समजून घेण्याची अक्कलदेखील या राजकारण्यांच्या आणि त्यांच्या हाती असलेल्या कंत्राटी जल्पकांकडे नाही, हे यातून दिसले. राज्यातील शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या सरकारचे वाभाडे काढण्यासाठी डझनाने मुद्दे आहेत. पण त्या मुद्दय़ांवर सरकारला उघडे पाडावयाचे असेल तर किमान अभ्यासाची गरज आहे. त्यापेक्षा निर्बुद्धातील निर्बुद्धासदेखील भावेल असा सोपा मार्ग या राजकारण्यांनी निवडला. या सोप्या मार्गाची गरज, बिहारी निवडणुका, सुशांतसिंहचे बिहारी असणे आणि त्याची प्रेमिका-मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचे भाजपसाठी तूर्त अभेद्य बंगाली असणे असे सर्व कावळे एकाच वेळी सोयीच्या फांदीवर बसले आणि सामूहिक विवेकाची फांदी बघता बघता तुटली. यात समाजमाध्यमी जल्पकांनी घातलेला गोंधळ हा निश्चितच आक्षेपार्ह आणि गुन्हेगारी स्वरूपाचा ठरतो. या कंत्राटी जल्पकांनी मुंबई पोलिसांविरोधात जी मोहीम चालवली ती त्याहूनही अधिक गुन्हेगारी स्वरूपाची ठरते. चांगल्या वेतनाच्या आणि सुखसोयींच्या मोहाने (आणि त्यात गैर काही नाही) पाश्चात्त्य जगात जाऊन तेथे स्थिरावल्यानंतर अधिक जोमाने भारतमातेचा जयजयकार करणाऱ्या दांभिकांनीही या समाजमाध्यमी लढय़ात मतलबी राजकारण्यांस साथ दिली. या संदर्भात प्रकाशित झालेल्या तपशिलानुसार, रोमानिया, अमेरिका, इटली अशा अनेक देशांतून ८० हजार बनावट नावांनीसुद्धा या समाजमाध्यमी गदारोळात आपल्या वाटचा चिखल भिरकावला. याचा अर्थ हे सर्व पद्धतशीरपणे केले गेले. आपले कार्य इतक्या शिस्तबद्धपणे तडीस नेण्याची बांधिलकी आणि त्यासाठी आवश्यक पैसा हाती असल्याखेरीज हा गोंधळ इतका जागतिक होताच ना.

त्याचमुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा मुंबई पोलिसांचा निर्धार स्वागतार्ह ठरतो. त्यांच्या या प्रयत्नात त्यांना निश्चितच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचेही साहाय्यच होईल. कारण हे जल्पक स्वदेशी नव्हते. परदेशांतून आपल्या देशांतर्गत घडामोडींत इतका हस्तक्षेप स्वदेशप्रेमी, राष्ट्रवादी भाजपला बिलकूल मान्य असणार नाही. म्हणून मुंबई पोलिसांनी यातील गुन्हेगारांचा छडा लावावाच. हे जल्पक हे एके काळच्या गुन्हेगारी टोळ्यांपेक्षाही अधिक धोकादायक आहेत. त्या काळी गुन्हेगारी टोळ्यांचा सामान्यजनांस फारसा काही उपद्रव नसे. जी काही लढाई व्हायची ती त्यांची त्यांची आपापसांत. आताच्या या जल्पकांचे तसे नाही. ते सामान्यांच्या हातातील मोबाइल यंत्रात घुसले असून त्याद्वारे भुंग्याप्रमाणे त्या मोबाइलधाऱ्याचा मेंदू पोखरतात. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हेच या जल्पक भुंग्यांविरोधातील प्रतिबंधात्मक कीटकनाशक. पण त्याचीच कमतरता असल्याने या भुंगे नियंत्रकांचे फावते. परिणामी कोणा एकाच्या आत्महत्येवरील धूळफेकीस धर्मकर्तव्य समजून सहभागी होणारे हे ‘सामान्य’जन उत्तर प्रदेशात बलात्कार आणि खून झाल्याचे ढळढळीतपणे दिसूनही मौन बाळगतात, हे कसे? यामागील कारणाचा शोध घेणे अवघड नाही.

ते असे की, मुंबई पोलिसांविरोधात गदारोळ करण्यात रस असणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात आवाज उठवला जाऊ नये असे वाटते. यातील गुन्ह्य़ांचे व्यस्त स्वरूप लक्षात घेतल्यास त्यातील लबाडी आणि हितसंबंध लक्षात येतील. मुंबईत घडले ती आत्महत्या होती आणि हाथरस येथे झाला तो बलात्कार, खून आणि त्यानंतर बेकायदा अंत्यसंस्कार. असे तिहेरी गुन्हे उत्तर प्रदेशात घडले. पण मुंबई पोलिसांविरोधात समाजमाध्यमांत जी काही वावटळ उठली तिच्या एकदशांशानेही उत्तर प्रदेशातील अभागी दलित तरुणीविषयी करुणेचा हुंकार उमटला नाही. याचा अर्थ मुंबई पोलिसांच्या बदनामीत रस असणाऱ्या आणि तशी बदनामी उत्तर प्रदेशी पोलिसांची होऊ नये यासाठी खबरदारी घेणाऱ्या शक्ती या एकच आहेत असा निघू शकतो.

त्यामुळे हे सारेच समाजमाध्यमी प्रकरण गंभीर ठरते. त्यामागची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे, पैशाने उपलब्ध असणारे तंत्रज्ञान हाताशी धरून कोणाही विरोधात राळ उडवता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आणि दुसरे असे की, यात चिखल उडवणाऱ्याचे हात दिसत नाहीत. जनसामान्यांसमोर येते ती फक्त फेक. ती ज्याच्या चेहऱ्यावर पडते तो चेहरा विद्रूप होतो आणि दरवेशाचा खेळ पाहात टाळ्या पिटणाऱ्या बालकांप्रमाणे आपला समाज या विद्रूपतेची मजा घेतो. रिया चक्रवर्तीचे जे काही सुरू आहे ते हे. तिची कथित कलात्मक कारकीर्द वा इतर उद्योग याविषयी सहानुभूती बाळगण्याचे बिलकूल कारण नाही. पण या समाजमाध्यमी टोळक्यांनी तिच्याबाबत जो आंबटशौकीपणा दाखवला तो फक्त आपली सामाजिक विकृती दर्शवतो. म्हणून अशा समाजात हे समाजमाध्यमी जल्पक अधिक धोकादायक ठरतात. अशी चिथावणी कोणाच्याही जिवावर बेतू शकते. हे असे होणे रस्त्यावरील अपघातासारखे आहे. जोपर्यंत स्वत:स त्याच्या यातना भोगाव्या लागत नाहीत तोपर्यंत वाहतुकीच्या नियमपालनाचे महत्त्व अनेकांस कळत नाही. जेव्हा ते कळते तेव्हा ते जायबंदी झालेले असतात.

म्हणून आपल्याकडे वाहतूक नियमांच्या कठोर अंमलबजावणीची जशी गरज आहे तशी माहिती-महामार्गावरील वाहतुकीच्या नियमनाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या शहरांतील रस्त्यांप्रमाणे या महामार्गावरील टोळभैरवांचा बंदोबस्त व्हायला हवा. रस्त्यांवरील टोळभैरव उघड दिसतात. हे आधुनिक टोळभैरव अदृश्य आहेत. त्यांना वा त्यांच्या नियंत्रकांना समोर आणण्याचा चंग मुंबई पोलिसांनी बांधला असेल तर काही विशिष्ट राजकीय पक्ष वगळता अन्य जनसामान्य मुंबई पोलिसांना याकामी सुयशच चिंततील. हाथरस येथील भयानक प्रकारात मरावे लागलेल्याप्रति दु:ख आहेच. पण यानिमित्ताने हा आधुनिक काळ तरी सोकावू नये!