अमेरिकेच्या मागे लागून ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी इराक युद्धाचा निर्णय ब्रिटनवर लादला, त्याबद्दल त्यांना आता १२ वर्षांनी उपरती होण्यास एक कारण आहे..या युद्धाच्या निर्णयाविषयी चौकशी करणाऱ्या ब्रिटिश समितीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे..

स्वत:ची अक्कल गहाण टाकून मोठय़ांच्या कच्छपि लागले की काय होते याचा प्रत्यय ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या कबुलीमुळे त्या देशास आला असेल. २००३ साली इराकविरोधातील युद्धात आपण ब्रिटनला ओढले ही चूकच झाली आणि सद्दाम हुसेन याची गच्छंती समर्थनीय असली तरी त्यामुळे आजची कराल दहशतवादी संघटना आयसिस हिचा उदय झाला हे नाकारता येणार नाही, असा साक्षात्कार ब्लेअर यांना सोमवारी झाला. सीएनएन या अमेरिकी वृत्तसंस्थेला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली. ही मुलाखत आगामी दोन दिवसांत प्रक्षेपित केली जाणार आहे. त्या आधी तिचा तपशील जाहीर झाला असून त्यावर ब्रिटनमध्ये काही प्रमाणात खळबळ माजली आहे. ब्लेअर यांच्यावर या निमित्ताने जोरदार टीका सुरू झाली असून जे अनेक अभ्यासकांना आधीच माहीत होते ते नव्याने मान्य करण्यात काय हशील, अशी प्रतिक्रिया तेथे उमटत आहे. त्याचबरोबर ब्लेअर यांच्यावर थेट युद्ध गुन्हेगारीसाठी खटला भरावा अशा मागणीचे सूरही उमटू लागले आहेत. ब्लेअर यांना ही उपरती आताच का झाली, असे प्रश्नही विचारले जात असून माजी पंतप्रधानांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत सद्दाम याचे उच्चाटन हीच मुळात चूक होती, हेदेखील मान्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ती गर नाही. याचे कारण सद्दाम यांनी भयानक संहारक अस्त्रे जमवली असून ती ते नष्ट करण्यास तयार नसल्यामुळे सद्दामलाच नष्ट करणे आवश्यक आहे, असा अमेरिका आणि म्हणून इंग्लंड यांचा युक्तिवाद होता. तो करणारे युद्धानंतर सपशेल तोंडावर आपटले. कारण ते सांगत होते तसे एकही अस्त्र पुराव्यादाखल त्यांना सादर करता आले नाही. अमेरिकेचे तत्कालीन संरक्षणमंत्री जनरल कॉलीन पॉवेल यांनी तर त्या वेळी संयुक्त राष्ट्र सभेत प्रभावी भाषण करून सद्दाम किती धोकादायक आहे आणि त्याचा नायनाट करणे ही कशी काळाची गरज आहे, असे नाटय़पूर्ण रीतीने सांगितले होते. नंतर त्यांनादेखील या धडधडीत असत्यासाठी माफी मागावी लागली. कारण ही मंडळी जे काही सांगत होती, तसे काहीही सद्दामकडे सापडले नाही. या विषयावर या आधीही ब्लेअर यांनी माफी मागितली होतीच. आता त्या माफीचा अर्धसूर वाढवत या युद्धामुळे आयसिस या भयानक दहशतवादी संघटनेचा उदय झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. सद्दाम याचे उच्चाटन झाले नसते तर आयसिस जन्मालाच आली नसती, हे ब्लेअर कबूल करतात. पण तरीही सद्दामला पदच्युत करणे आवश्यकच होते असेही नमूद करतात. स्वत:चे काही धोरण नसले की हे असे होते.
ब्रिटनचे हे असे झाले कारण आपण जणू अमेरिकेचे बावन्नावे राज्यच आहोत, असे त्या देशातील राज्यकर्त्यांचे वागणे होते. एकावन्नावे राज्य इस्रायल. आता त्याचे अमेरिकेशी फाटले आहे आणि ब्रिटनही अमेरिकेच्या प्रत्येक कृतीला मम म्हणत होकार देण्याची सवय घालवू पाहत आहे. ती मुदलात लागलीच नसती तर ब्रिटन हा अमेरिकेच्या मागे असा फरफटत गेला नसता आणि इराक युद्धात सहभागी झाला नसता. ते युद्ध ही केवळ चूष होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या हौसेखातर हे युद्ध झाले. त्याआधी २००१ साली ९/११ घडले होते आणि त्याचा सूड घेण्यासाठी आपण काही शौर्यकृत्य करणे आवश्यक आहे, अशी बुश यांची धारणा झाली होती. या युद्धखुमखुमीचाच भाग म्हणून आधी अफगाणिस्तानवरही हल्ला करण्यात आला. ९/११चे हल्लेखोर आणि इराकचा सद्दाम हुसेन यांच्यात कसे लागेबांधे आहेत, याच्या कंडय़ा पिकवल्या गेल्या. अमेरिकेच्या मदतीवर पोटार्थी देशांनी त्यावर विश्वासदेखील ठेवला आणि इराकवर हल्ला करण्यात आला. बुश यांना ही युद्धाची चन परवडण्यामागे आणखीही एक कारण होते. अमेरिकी रिझव्‍‌र्ह बँकेचे, म्हणजे फेडरल रिझव्‍‌र्हचे तत्कालीन प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांनी प्रचंड प्रमाणावर व्याजदर कमी करून कर्जे घेणे अतिस्वस्त करून ठेवले होते. त्यामुळे अमेरिकी व्यवस्था चांगलीच झोकात होती. युद्ध करण्यासाठी शस्त्रास्त्रांपेक्षा तिजोरीचे बळ लागते. अमेरिकेकडे ते होते. म्हणून इराकवर हल्ला झाला आणि पुढचे रामायण घडले. अमेरिकेच्या बलाढय़ ताकदीपुढे एकेकाळी अमेरिकेनेच लाडाकोडाने मोठय़ा केलेल्या सद्दामचा निभाव लागणार नाही, हे उघड होतेच. तसेच झाले. परंतु प्रश्न अमेरिकेपुढे सद्दामचे काय होणार हा नव्हता. तर सद्दामनंतरच्या इराकचे काय होणार, हा महत्त्वाचा मुद्दा होता. परंतु बुश यांना त्याची फिकीर नव्हती. त्यांच्या तीर्थरूपांनी १९९१ साली हेच केले होते. त्या वेळी सद्दामपासून कुवेत वाचवण्यासाठी युद्ध केले गेले. त्यासाठी सद्दाम हा कुवेतनंतर सौदी अरेबियाचा घास घेणार आहे, अशी आवई उठवली गेली. त्यासाठी खोटेनाटे पुरावे दिले गेले. तेव्हा धाकटय़ा बुश यांची २००३ सालची युद्धखोरी त्या परंपरेस साजेशीच झाली. या बापलेकांतील फरक इतकाच की थोरल्या बुश यांनी सद्दाम यांस अकारण वाचवले तर धाकटय़ा बुश यांनी त्यास अकारण मारले. परिणामी संपूर्ण इराक अस्थिरतेच्या खाईत सापडला. सुन्नी आणि शिया यांच्यातील संघर्ष उघड सुरू झाला. सद्दामने शियाबहुल इराकला सुन्नी असूनही धाकात ठेवले होते. तो खऱ्या अर्थाने आधुनिक होता. धर्मगुरूंचे अवडंबर त्याने कधीही माजवले नाही. त्याच्या राजवटीत स्त्रियांना समान हक्क होते आणि शिक्षणापासून त्यांना रोखले जात नव्हते. परंतु तो गेला आणि धर्मगुरू माजले. शेजारील इराणने शिया पंथीयांना उत्तेजन देण्यास सुरुवात केली. परिणामी सुन्नी चवताळून उठले आणि शियांना सामोरे जाण्यासाठी आणि स्वत:वरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी स्वत:ची वेगळी संघटना त्यांनी स्थापन केली. ती आयसिस. सद्दामच्या पाडावानंतर मुक्त झालेल्या तेलविहिरींवर आयसिसने ताबा मिळवला आणि त्यातून आलेल्या पशातून प्रचंड प्रमाणावर शस्त्रास्त्रे खरेदी केली. याच काळात अमेरिकेत सत्तांतर झाले. युद्धखोर बुश यांच्या जागी शहाण्या डेमॉक्रॅटसचे बराक ओबामा यांच्या हाती सत्ता आली. बुश यांच्या युद्धखोरीमुळे अमेरिका डबघाईला आली आहे हे त्यांनी जाणले आणि या लष्कराच्या भाकऱ्या भाजणे त्यांनी बंद केले. परिणामी इराकमध्ये सद्दाम तर गेलेला आणि निश्चित सत्ता कोणाच्याच हाती नाही, अशी अवस्था आली. आयसिस अशा वातावरणात वाढली नसती तरच नवल. बघता बघता आयसिसचा भस्मासुर वाढत गेला. अर्थात ब्लेअर यांना हे सर्व आता जाणवले असे नाही.
परंतु आता त्यांनी ते मान्य केले कारण ब्रिटनमधे इराक युद्धाची चौकशी करणाऱ्या सर जॉन शिलकॉट समितीचा पूर्ण होत आलेला अहवाल. इराक युद्धातील ब्रिटनच्या भूमिकेवर देशात फारच टीका होऊ लागल्याने तिची दखल घेत माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राउन यांनी २००९ साली सर जॉन यांच्याकडे या युद्धामागील कारणांची साद्यंत चौकशी सोपविली. या युद्धाचा निर्णय पंतप्रधान ब्लेअर यांनी एकटय़ाने घेतला, ब्रिटिश पार्लमेंटला विश्वासात घेणे तर दूरच परंतु त्यांनी स्वत:च्या मंत्रिमंडळासदेखील या निर्णयाची कल्पना दिली नाही, असे निष्पन्न झाल्याने ब्लेअर अधिकच संकटात सापडले. सर जॉन यांचा चौकशी अहवाल लवकरच सादर होईल. त्यात या युद्धासाठी ब्लेअर यांच्यावर संपूर्ण ठपका ठेवला जाईल अशी चिन्हे आहेत. ही कबुलीची उबळ आता ब्लेअर यांना आली ती या अहवालाच्या शक्यतेमुळे, हे लक्षात घेतलेले बरे.
यंदा या युद्धास १२ वष्रे पूर्ण झाली. म्हणजे इराक युद्धास एक तप लोटले. एका तपानंतरची ही कबुली इतर युद्धखोरांसाठीदेखील एक धडा आहे.