कारवाईचा अधिकार नाही आणि राजकारण जमत नाही, अशा दोन्ही आघाडय़ांवर मनमोहन सिंग यांची कोंडी होत गेली. अणुकराराच्या वेळी एकदाच धमक दाखवल्यानंतर त्यांनी आपली शस्त्रे म्यान केल्याने ते उत्तरोत्तर निष्प्रभ होत गेले. शौर्य आणि तडफेने गायल्या जाणाऱ्या समरगीताचे बघता बघता शोकगीतात रूपांतर व्हावे तसे मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीचे झाले..
इतिहास आपले मूल्यमापन अधिक सहृदयतेने करेल अशा प्रकारची भावना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. ती संधी त्यांना काँग्रेसने नाकारली. त्यामुळे मनमोहन सिंग हे लक्षात राहतील ते एक केवळ योगायोगी पंतप्रधान या नात्यानेच. हे कटू असले तरी वास्तव आहे आणि ते दुर्दैवी आहे. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतला झळाळता अध्याय लिहिला गेला तो १९९१ साली. ते अर्थमंत्री होते तेव्हा. भारत जागा होत आहे, हे जगाला आता सांगायची वेळ आली आहे, असे आश्वासक शब्द उच्च्चारत त्यांनी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प सादर केला आणि सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेस पुन्हा पालवी फुटली. त्यांचे त्या वेळचे पंतप्रधान होते नरसिंह राव. वास्तविक सिंग यांच्याप्रमाणेच तेही दुर्दैवी योगायोगामुळे त्या पदापर्यंत पोहोचलेले. राजीव गांधी यांची हत्या आणि प्रणब मुखर्जी यांच्यावरील अविश्वास यातून तडजोडीचा उमेदवार म्हणून राव यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे गेली. मनमोहन सिंग यांचेही तसेच. सोनिया गांधी यांना पंतप्रधानपद मिळणे अशक्य आणि काँग्रेसचे कुलदैवत असलेल्या गांधी घराण्यातील पुढच्या पिढीचा राहुल अपरिपक्व. अशा परिस्थितीत अन्य कोणाकडे पंतप्रधानपद द्यावे तर हात दाखवून अवलक्षण होण्याची शक्यताच अधिक. अशा वेळी तडजोडीचा सुरक्षित पर्याय म्हणून मनमोहन सिंग यांचे नाव पुढे आले आणि एक साधा, सरळमार्गी गृहस्थ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. राव आणि सिंग यांच्यातील हे साम्य येथेच संपते. पंतप्रधानपद हाती आल्यावर राव हे पंतप्रधानासारखे वागले तर सिंग यांच्यातील नोकरशहा जागा झाला. राव यांनी पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांचे पंतप्रधानपदाबरोबर येणारी अस्त्रे वापरून पद्धतशीर खच्चीकरण केले तर सिंग यांनी अभावितपणे असेल वा आळस म्हणून, ही अस्त्रे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पदरात घातली. सिंग हेदेखील राव यांच्याप्रमाणे जनप्रिय नेते नव्हते. परंतु अप्रत्यक्षपणे का असेना पण नेतृत्व करण्याची राव यांच्याकडे असलेली आस आणि ऊर्जा सिंग यांच्याकडे नव्हती. सिंग यांच्या अवमूल्यनास सुरुवात झाली ती त्या क्षणापासून. याचे साधे कारण असे की पंतप्रधानपदासारख्या शीर्षस्थ पदावरील व्यक्ती केवळ सज्जनपणाच्या इंधनावर त्या पदाचा गाडा हाकू शकत नाही. पंतप्रधानपद मुळात राजकीय आहे. पण सिंग यांना ते मिळाले तेच मुळी ते राजकारणी नाहीत म्हणून. म्हणजे किमान आवश्यक गुणवत्तेशिवाय एखाद्यास महत्त्वाचे पद दिले गेल्यास त्याचे जे होईल तेच सिंग यांचे झाले. काँग्रेसने ते केले कारण पंतप्रधानपदामागील राजकारण सोनिया गांधी यांना करावयाचे होते आणि राहिलेल्या फायली निपटण्याची प्रशासकीय गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना सुरक्षित व्यक्ती हवी होती. ती गरज मनमोहन सिंग यांनी पूर्ण केली. त्यांनी जे केले.. वा करावे लागले.. तो काँग्रेसमधील अंतर्गत व्यवस्थेचा भाग होता हे जरी खरे असले तरी सर्वोच्च पदावरील व्यक्तीने इतका अधिकारसंकोच करून घेणे धोक्याचे असते. याची जाणीव सिंग यांना त्या वेळी झाली नसावी. आता मात्र ती त्यांना नक्कीच टोचत असेल. या अधिकारसंकोचामुळेच सिंग हे केवळ नामधारी प्रधान राहिले आणि खरे पंतपद सोनिया गांधी यांच्याकडेच गेले. त्यामुळे दूरसंचार घोटाळ्यातील ए राजा असोत वा राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी. यांच्यावर काहीही कारवाई करण्याचा अधिकार पंतप्रधान सिंग यांना नव्हता. कारवाईचा अधिकार नाही आणि राजकारण जमत नाही. अशा दोन्ही आघाडय़ांवर सिंग यांची कोंडी होत गेली. कारकिर्दीच्या वेगवेगळ्या स्तरांवर अनेकांना या अवस्थेस सामोरे जावे लागते. परंतु अशा वेळी तोंड दाबून होणारा हा बुक्क्यांचा मार सहन करायचा की नाही, या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने शोधावयाचे असते. सिंग यांनीही ते शोधले आणि मुकाटपणे सर्व काही सहन करण्याचा निर्णय घेतला. आज जे मनमोहन सिंग करुण वाटतात ते या निर्णयामुळे.
या कारुण्यामागे एक वास्तव आहे. ते म्हणजे पंतप्रधानपद सांभाळण्याइतकी अर्हता सिंग यांच्याकडे कधीच नव्हती. ते आयुष्यभर प्रशासकीय अधिकारीच होते आणि केवळ प्रशासकीय कामे केलेल्याची गुणवत्ता निर्णयांच्या अंमलबजावणीवरून मोजावयाची असते. उत्तम प्रशासकीय अधिकारी हा पडद्यामागे राहून काम करीत असतो. पडद्यासमोर असणाऱ्याने घेतलेले निर्णय राबवणे हे त्याचे प्राथमिक कर्तव्य असते. सिंग हे असे अधिकारी होते. अर्थमंत्री म्हणून ते उत्कृष्ट ठरले कारण धाडसी निर्णय घेणारे पंतप्रधान त्यांना लाभले म्हणून. परंतु जेव्हा पंतप्रधानपदच घ्यायची वेळ त्यांच्यावर आली तेव्हा ते उत्तरोत्तर निष्प्रभ होत गेले आणि शेवटी शेवटी तर ते विझलेच. आपल्यातील निर्णयक्षमतेचा प्रत्यय त्यांनी दिला तो एकदाच. अमेरिकेबरोबरच्या अणुकराराच्या निमित्ताने सिंग यांनी आपले सरकार पणाला लावले आणि स्वत:ला हवे ते करवून घेतले. परंतु असे करण्यात फारच ऊर्जा लागते हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली शस्त्रे म्यान केली आणि सर्व निर्णयांचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द करून आला दिवस साजरा करणेच पसंत केले. असे करणे हा सिंग यांचा मोठा ऱ्हास होता. पण तो मार्ग त्यांनी निवडला होता. त्यामुळे कानामागून आलेला कालचा पोर राहुल गांधी यांनी जाहीर पाणउतारा केला तरी सिंग यांची शांतता ढळली नाही आणि पदाला चिकटून राहणेच त्यांनी पसंत केले. सिंग यांना राजकीय अभिलाषा नव्हती आणि नाहीही. तरीही त्यांनी हे असले जगणे का सहन केले हे अनाकलनीय गूढ म्हणावे लागेल. सिंग यांच्या संयत व्यक्तिमत्त्वास या गूढाने घेरले आणि अखेर त्यानेच त्यांच्या कर्तृत्वाचा घास घेतला. तेव्हा सिंग हे ओळखले जातील एक केविलवाणे, असाहाय्य आणि अर्थातच अपयशी पंतप्रधान म्हणूनच. कारण कोणाही व्यक्तीच्या कार्याचे मोजमाप हे शेवटच्या पदावरील यशापयशाच्या आधारे होत असते. त्या व्यक्तीची इतिहासातील पुण्याईपुंजी कितीही वजनदार असली तरी वर्तमानातील जमाखर्चच श्रेयाची श्रीशिल्लक ठरवीत असतो. हे सिंग यांना अर्थातच जाणवत असेल. त्यामुळे पंतप्रधानपदावरून पायउतार होताना त्यांच्या मनात हर्ष-खेद ते मावळले.. अशी उदात्त भावना असण्याची शक्यता कमीच. त्यांच्या मनात निश्चित असेल ती खंत आणि एक वेदना.
पाकिस्तानातील फाळणीने उद्ध्वस्त झालेले बालपण घेऊन भारतात आलेला एक गरीब मुलगा मुळातील अभ्यासू वृत्ती, चिकाटी आणि सचोटी या गुणांवर देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचतो ही खरे तर सर्वार्थाने गौरवगाथाच. परंतु नंतर मात्र ती तशी राहिली नाही. शौर्य आणि तडफेने गायल्या जाणाऱ्या समरगीताचे बघता बघता शोकगीतात रूपांतर व्हावे तसे मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीचे झाले आणि तब्बल दहा वर्षे चाललेली ही सहनगाथा बुधवारी एका केविलवाण्या सुरावटीवर संपुष्टात आली. राजकारणाच्या सबगोलंकार छिद्रात सारली गेलेली चौकोनी खुंटी अशीच सिंग यांची नोंद इतिहास करेल.