लोकशाहीची कोणतीही चाड नसलेल्या जगातील अनेक प्रभावी नेत्यांना निकोप लोकशाही प्रक्रियेची नेहमीच भीती वाटत आलेली आहे. बेलारुस या पूर्व युरोपातील देशात लोकशाहीहननाचा जो खेळ सुरू आहे, तो सोव्हिएतकालीन पूर्व युरोपातील लोकशाही लढय़ांचे स्मरण करून देणारा आहे. या लढय़ाच्या केंद्रस्थानी आहेत बेलारुसचे विद्यमान अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को. ते १९९४ पासून अनिर्बंध आणि निरंकुश सत्तेवर आहेत. ९ ऑगस्ट रोजी त्या देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्याला सुमारे ८० टक्के मते मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांचा हा दावा हास्यास्पद ठरला. कारण प्रचारावेळी लुकाशेन्को नव्हे, तर त्यांच्या अवघ्या ३७ वर्षीय प्रतिस्पर्धी स्वेतलाना तिखानोवस्काया यांच्या सभांना सर्वाधिक गर्दी होत होती. स्वेतलाना यांचे पती हे लेखक (ब्लॉगर) आहेत आणि तेच लुकाशेन्कोंना यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीत आव्हान देणार होते. परंतु त्यांना लुकाशेन्को सरकारने तुरुंगात डांबले, म्हणून मूळच्या इंग्रजी शिक्षिका असलेल्या स्वेतलाना त्यांच्या जागी निवडणुकीत उतरल्या. लुकाशेन्को यांच्या जवळपास पाव शतकाच्या एकछत्री अमलाला कंटाळलेल्या बेलोरशियन जनतेने स्वेतलाना तिखानोवस्काया यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. राजधानी मिन्स्क आणि बेलारुसच्या इतर शहरांत स्वेतलाना यांच्या सभांना झालेली गर्दी लक्षणीय होती. तिचा धसका घेऊनच बहुधा सत्तारूढ लुकाशेन्को यांची मजल निवडणुकीत गैरप्रकार करण्यापर्यंत गेली असावी. स्वेतलाना यांना केवळ १० टक्के मते मिळाल्याचे जाहीर झाले आणि बेलारुसमध्ये जनक्षोभाचा जणू स्फोट झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी स्वेतलाना यांना निवडणूक कार्यालयात पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडून जबरदस्तीने निवडणूक निकाल मान्य असल्याचे वदवून घेऊन ती चित्रफीत प्रसृत करण्यात आली. स्वेतलाना यांना त्यांच्या मुलांसह बाजूच्या लिथुआनियात परागंदा व्हावे लागले. त्यांच्या काही सहकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. पती तुरुंगात, मुले असुरक्षित अशा हतबल अवस्थेतला त्यांचा साश्रुनयनी संदेश त्यांच्या चाहत्यांना अधिकच संतप्त करणारा ठरला. लुकाशेन्को यांना युरोपातील शेवटचे हुकूमशहा असे संबोधले जाते. सोव्हिएत महासंघाच्या पोलादी छत्रातून मोकळे झालेल्या बहुतेक देशांनी सोव्हिएत प्रतीके आणि पद्धती समूळ नाकारल्या. लुकाशेन्को हे ठसठशीत अपवाद. केजीबीसारखी गुप्तचर संस्था त्यांनी कायम ठेवली. सोव्हिएत अर्थव्यवस्थेला जवळ केले. बहुतेक बडय़ा सरकारी कंपन्यांना खासगीकरणापासून दूर ठेवले. रशियन अनुदानाची सवय जडल्यामुळे स्वत:हून वेगळ्याने आर्थिक प्रगती साधण्याची गरजच उरली नाही. मध्यंतरीच्या काळात तर रशिया आणि पश्चिम युरोप व अमेरिका यांच्यातील सुप्तयुद्धाचा फायदा त्यांनी पुरेपूर उचलला. पण करोनाने इतर नेत्यांप्रमाणेच लुकाशेन्कोही उघडे पडले. व्होडका व सौना अशा साधनांनी करोनाला थोपवता येईल, असे दावे त्यांनी मध्यंतरी मांडले होते. त्यानंतर अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबणे किंवा त्यांचे अपहरण करणे असे उद्योग आरंभून त्यांनी मोठा जनाधार गमावला. मात्र व्लादिमीर पुतीन, क्षी जिनपिंग हे मित्र तर सोडाच, पण युरोपीय समुदाय किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांचा निषेध अद्याप केलेला नाही. त्यामुळे तूर्त स्वेतलाना तिखानोवस्काया आणि बेलारुसची संत्रस्त जनता हेच त्यांच्या विरोधात ठामपणे उभे आहेत. पूर्व युरोपातील यापूर्वीच्या युगोस्लाव्हिया पोलंड, रोमानिया आदी सत्ता – जनक्षोभासमोरच कोसळल्या होत्या. बेलारुसही त्याच मार्गावर आहे. १६ ऑगस्ट रोजी मिन्स्कमधील निदर्शनांत दोन लाख माणसे सहभागी होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घेतल्यास, तेथील जनतेचे आणि लुकाशेन्कोंच्या विरोधकांचे अधिक हाल होणार नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2020 रोजी प्रकाशित
बेलारुसच्या हुकूमशाहीला घरघर
स्वेतलाना यांचे पती हे लेखक (ब्लॉगर) आहेत आणि तेच लुकाशेन्कोंना यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीत आव्हान देणार होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 18-08-2020 at 00:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on belarus dictatorship whirring abn