भारतीय पोशाखासंबंधी फॅब इंडिया कंपनीने प्रसृत केलेली एक स्थिरचित्र जाहिरात त्याविषयी विशेषतङ्म उजव्या विचारसरणीच्या मंडळींकडून समाजमाध्यमांवर आक्षेप उपस्थित झाल्यानंतर या कंपनीला मागे घ्यावी लागली. या जाहिरातीविषयी जे आक्षेप घेण्यात आले आहेत, त्यातून अभिव्यक्ती, अभिरुचीविषयी समाजातील एका मोठ्या वर्गाची समज कशी रसातळाला जात आहे, याचेच दर्शन घडले. काहींच्या मते ही समज किंवा उमज परिपक्व कधी नव्हतीच. भावना दुखावल्याच्या नावाखाली जाहिरातींना, नाममुद्रांना, कंपन्यांना लक्ष्य करणे, सुतावरून स्वर्ग गाठणे आणि ‘आम्ही’ वा ‘आमचे’ या संकल्पनेचा अत्यंत मर्यादित, संकुचित, सोयीस्कर अर्थ लावून समाजमाध्यमांवर हलकल्लोळ उडवून देणे या कामात हल्ली रिकामटेकड्यांबरोबर प्रशिक्षित, पगारी टोळ्याही सहभागी करून घेतल्या जात आहेत. फॅब इंडियाने सणासुदीला पोशाखविक्री करण्याच्या हेतून जी स्थिरचित्र जाहिरात छापली, तिचे नाव होते ‘जश्न-ए-रिवाझ’. हे उर्दू नाव हिंदू सणाविषयीच्या जाहिरातीला का द्यावे, अशी विचारणा करत अनेक ‘नवहिंदूं’नी फॅब इंडियाच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी समाजमाध्यमांवर केली. उर्दू ही अधिकृत भारतीय भाषा असून तिचा जन्मही भारतातलाच. या भाषेत धर्म शोधणाऱ्यांना बहुधा याचे ज्ञान नसावे! याही पुढे जाऊन काहींनी – यात अनेक महिलाही आहेत – जाहिरातीमधील महिलांच्या ‘पांढऱ्या कपाळां’चा उल्लेख केला. पारंपरिक पोशाखाची जाहिरात आणि महिलांच्या कपाळावर साधी टिकलीही (बिंदी) नाही म्हणजे काय, असा सर्वसाधारण सूर. वास्तविक हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा. अमुक साज-शृंगार महिलेने करावा, तरच तिने धार्मिक किंवा पारंपरिक पेहराव केला असे मानता येईल, असे ठरवणारी आणि दरडावणारी ही मंडळी कोण? भाजपचे कर्नाटकातील तरुण, तळपदार, प्रखर ओजस्वी वगैरे नेते तेजस्वी सूर्य यांना हा सगळा प्रकार म्हणजे हिंदू धर्माचे ‘अब्राहमीकरण’  करण्याचा कट वाटतो. ही मंडळी ज्या प्रकारे वागत आहेत, त्यापेक्षा वेगळी अपेक्षा यांच्याकडून नाहीच. परंतु फॅब इंडियासारख्या कंपन्या या आक्रस्ताळेपणासमोर गुडघे कसे टेकतात हा मुद्दा आहे. कंपन्यांनी अशा प्रकारे झुकण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी तनिष्क या टाटांकडील दागिने घडवणाऱ्या कंपनीने ‘दिवाळीत फटाके फोडणार नाही’ या स्वरूपाचा संदेश चलचित्र जाहिरातींमार्फत पोहोचवल्यावर वाद झाला म्हणून माघार घेतली. हिंदुस्तान लिव्हरने त्यांच्या होळीविषयीच्या जाहिरातीत हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याची ‘चूक’ केली, जी त्यांना लागलीच भोवली. भारतात अभिव्यक्तिस्वातंत्र्य घटनादत्त असते याचा विसर रिकामटेकड्या धर्मांधांना पडतो हे समजू शकते. या चिखलफेकीत राज्यघटनेशी सदैव बांधील राहण्याची शपथ घेतलेले लोकप्रतिनिधी कसे सामील होतात असा विषय आहे. यात चमत्कारिक किंवा चक्रावणारे असे काही राहिलेले नाही. धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांना अत्युच्च पातळीवरच तुडवले जात असेल, तर बुणग्यांना त्यांची काय पत्रास असणार? राहता राहिला मुद्दा भावना दुखवल्याचा! या जगात करोना-एबोलावर औषध सापडेल, पण भावनाविकारावर औषध मिळण्याची सुतराम शक्यता नाही. भावनेवर रामबाण उपाय म्हणजे सारासार विवेक. असे किती ‘आम्ही’ दिवाळीत अमुकच पोशाख परिधान करतात? दाढी, मिशी, शेंडी ही जशी वैयक्तिक बाब, तशीच टिकली हीदेखील अत्यंत वैयक्तिक बाब. त्याविषयी नियम घालून देणे आणि त्यावर थयथयाट करणे हेच मुळात हास्यास्पद. कोणत्या कंपनीने आपले उत्पादन कशा प्रकारे विकावे हा सर्वस्वी त्या कंपनीच्या अभिव्यक्तीचा मुद्दा असतो. त्यासंबंधी सारे काही घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीत असेल, तर जल्पक ब्रिगेडला भीक घालण्याची जराही आवश्यकता नाही.