चित्रवाणी पत्रकार बरखा दत्त यांचं पहिलंवहिलं पुस्तक त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीबद्दल आहे आणि गेल्या २० वर्षांतल्या भारताबद्दलही! पत्रकाराच्या नोंदींना हा देश ‘अशांत’ दिसतो आहे आणि या अशांतीची कारणं सांगताना, समकालीन राजकारणावरही प्रकाशझोत पडतो आहे..
सुकुमार शिदोरे
बरखा दत्त या एक अग्रगण्य चित्रवाणी-पत्रकार आहेत. दिल्लीत व अमेरिकेत विद्यापीठीय शिक्षण घेतल्यानंतर गेली दोन दशके ‘एनडीटीव्ही’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवर त्या कार्यरत आहेत. ‘बक स्टॉप्स हिअर’सारख्या चर्चात्मक कार्यक्रमांचे ‘अँकिरग’ करण्याचे वा महत्त्वाच्या प्रसंगी घटनास्थळी जाऊन तेथील वृत्तान्त चित्रवाणी-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या सातत्याने करीत आहेत. आपल्या कामाचा भाग म्हणून अगणित छोटय़ा-बडय़ा व्यक्तींशी संभाषणे करीत आहेत- समाजातील लोकांच्या कथा आणि व्यथा जाणून घेण्याचा यत्न यातून होतो आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी लिहिलेले पहिलेवहिले पुस्तक ‘धिस अनक्वाएट लॅण्ड’ (हा अशांत देश) वाचकांपुढे आले आहे. पुस्तकाचे उपशीर्षक आहे- ‘स्टोरीज फ्रॉम इंडियाज् फॉल्टलाइन्स’. मात्र देशातील काही विघातक प्रवृत्तींवर प्रकाशझोत टाकताना लेखिकेने, समाजातील त्यांना जाणवलेल्या सकारात्मक पैलूंचाही ऊहापोह केला आहे.
पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातच (१९९२ साली) भंवरीदेवी या दलित महिलेवर राजस्थानात तथाकथित उच्च-जातीयांनी केलेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण प्रेक्षकांपुढे आणावे लागले. भंवरीदेवीने निर्विकारपणे दिलेल्या मुलाखतीचे व त्या खेडय़ातील विरोधी वातावरणाचे चित्रलेखिकेने समर्थपणे उभे केले आहे. अलीकडच्या ज्योती सिंह (निर्भया)वरील अत्याचारानंतर आम लोक रस्त्यावर आले, पण सोनिया गांधी व शीला दीक्षित यांच्यासारख्या राजकीय नेत्या उदासीन राहिल्या. आजही कायदे बदलले आहेत, पण परिस्थिती बदलली नाही. विवाहबंधनात पतीकडून पत्नीवर बलात्काराची एक प्रकारे सूटच कायद्याने दिलेली आहे. मुस्लीम समाजात तोंडी तिहेरी ‘तलाक’ची प्रथा अद्यापही चालू आहे. बलात्काराचा आरोप होत असलेले राजकारणी खुल्लमखुल्ला निवडणुका लढू शकत आहेत. वास्तविक देशातील बहुसंख्य (९० टक्के) पीडित महिलांना अत्याचार कोणी केला हे माहीत असते, असे लेखिकेने नमूद केले आहे; तथापि गुन्हेगारांना न्यायव्यवस्थेपुढे कोणी खेचत नाही. लेखिकेने स्वत: तिच्या युवा-वयात एका सहाध्यायी व्यक्तीने केलेला बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी ठरवला, उधळून लावला. त्या काळात ना कायदे कडक होते, ना व्यवस्था. त्यामुळे अपराधी व्यक्तीविरुद्ध काही करता आले नाही. आता मात्र थोडय़ा प्रमाणात का होईना, पीडित महिला अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयांत दाद मागत आहेत. शीलू निषाद, सुनीता कृष्णन आदी महिला करीत असलेल्या संघर्षांचे विवरण या संदर्भात लेखिकेने दिले आहे. .
बरखा दत्त यांना कारगिल युद्ध ‘कव्हर’ करण्याची संधी मिळाली होती. नियंत्रण रेषेच्या आत घुसून, म्हणजेच भारतावर आक्रमण करून हे युद्ध पाकिस्तानने भारतावर लादले होते. जिवाला असलेला धोका पत्करत बरखा दत्त आघाडीवरील सैनिकांसोबत बंकरमध्ये राहिल्या. त्यांच्यासह धुमश्चक्रीत समग्र मोहीम टिपली. अखेरच्या टप्प्यात, ‘टायगर हिल’वर कब्जा मिळवण्याचा भारतीय सेनेचा पराक्रम वृत्तवाहिनीद्वारे लोकांपर्यंत पोहोचविला. या युद्धात पाचशेहून अधिक सैनिक शहीद झाले, त्यापैकी एक म्हणजे विक्रम बत्रा. त्याने याआधी लेखिकेला ताज्या यशस्वी ‘ऑपरेशन’बद्दल सगळे सांगितले होते. लेखिकेने विचारले, ‘तुझ्या जिवाला धोका होता.. भय नाही वाटले?’ विक्रम खळखळून हसत म्हणाला, ‘ये दिल मांगे मोअर’! काही दिवसांनी, आघाडीवरच आपल्या सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात विक्रमने स्वत:चा प्राण गमावला. अशा शूर सैनिकांच्या मनाचा थांग घेण्याचा लेखिकेचा प्रयत्न दिसतो. एकीकडे युद्ध चालू असताना भारत, पाकिस्तान व अमेरिका येथे युद्धसंबंधित राजकीय घडामोडीही होत होत्या. त्यांचा पुरेसा परामर्शही पुस्तकात वाचावयास मिळतो.

अपेक्षेप्रमाणे, देशाच्या शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवादी कारवायांबद्दल पुस्तकात एक संपूर्ण प्रकरण आहे. संसद भवनाच्या आवारातील हल्ला व सीमेवर सैन्याची जमवाजमव, तसेच मुंबई (२००८ व २०११), हैदराबाद (२००७), अहमदाबाद (२००८) आणि समझौता एक्स्प्रेस (२०००) या उल्लेखनीय हल्ल्यांबाबत हे प्रकरण आहे.
हिंसाचार झाले तरी मुंबईकर शहर सोडत नाहीत. आपले काम करीत राहतात म्हणून त्यांची वाखाणणी केली जाते, पण याचे खरे कारण उपजीविकेशी संबंधित आहेत. २०११च्या हल्ल्यानंतर जव्हेरी बाजारात लेखिकेला नरेंद्र जैन नामक व्यक्ती भेटतात. तीन-तीन दहशती हल्ले झाले तरी ते त्याच ठिकाणी काम करत आहेत. तुम्ही शहर सोडत का नाही, असे विचारले तर ते म्हणाले, ‘रोजी-रोटी का सवाल है, जाएंगे तो कहा जाएंगे?’ तेव्हा, मुंबईकरांची सहनशीलता, चिकाटी वगैरे गुण हे एक मिथक आहे!
पुस्तकात बऱ्याच मार्मिक नोंदी आढळतात. २००८च्या मुंबई हल्ल्याबाबत ताजमहाल-ओबेरॉय हॉटेलबाहेर चॅनेल्सवाल्यांनी जेवढे चित्रीकरण केले तेवढे मुंबई (सीएसटी) स्टेशनवरील दहशती हल्ल्याचे केले नाही. असे का? रेल्वे स्टेशनवरील माणसे गरीबगुरीब किंवा मध्यमवर्गीय असतात, म्हणून? असे प्रश्न लेखिकेने उपस्थित केले आहेत. समझौता एक्स्प्रेसवरील हल्ल्याबाबत उजव्या विचारसरणीच्या ‘हिंदू’ गटांच्या दहशतवादाचा ऊहापोह करणे क्रमप्राप्तच आहे. ‘रॉ’ या आपल्या संस्थेच्या एका अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे ‘दहशतवादापेक्षा कट्टरतावाद जास्त धोकादायक आहे, हिंदू व मुस्लीम कट्टरतावादी एकमेकांना बळ देत आहेत. असहिष्णुतेबाबत आपण असहिष्णू असायला पाहिजे.’
काँग्रेसच्या शासनकाळात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे खूप प्रकार झाले. नेल्ली (१९८३), हाशिमपुरा (१९८७), भागलपूर (१९८९), हैदराबाद (१९९०), सुरत (१९९२) आणि जिच्या जखमा अजून ताज्या आहेत अशी १९८४ सालातील दिल्लीतील शिखांची कत्तल. तथापि एकविसाव्या शतकात (२००२ साली) साबरमती एक्स्प्रेसला आग लागून कारसेवकांना जाळण्याच्या गोध्रा येथील हिंसाचारानंतर गुजरातेत सुमारे तीन दिवस मुस्लिमांवरील अत्याचारांचे जे सत्र घडले त्याला तोड नाही. दिल्ली (१९८४) व गुजरात (२००२) या दोन कांडांतील प्रमुख साम्यस्थळ म्हणजे दोन्ही शासनाच्या आशीर्वादाने पार पडली. गुजरात २००२ लेखिकेने पत्रकार म्हणून कव्हर केले. तसे करताना बडोदा ते गोध्रा हा प्रवास आपल्या टीव्ही युनिटसह रस्त्याने करायचे ठरले. वाटेत भीषण दंगलीच्या खुणा दिसल्या, कारखान्यांना लावलेल्या आगी दिसल्या, लुटालूट करणारे दंगेखोर भेटले. गोध्रा जवळ येऊ लागले तसे हल्लेखोरांचे गट आमची गाडी थांबवून आम्ही सगळे हिंदू असल्याची खातरजमा करू लागले.
गुजरात (तसेच १९९२-९३च्या मुंबईतील दंगली व १९९३चे बॉम्बस्फोट) संबंधित पीडितांशी झालेल्या संभाषणावरूनही त्यांच्या यातना जाणवतात. गुजरात अत्याचाराबाबत सीबीआयच्या अन्वेषण पथकाने नरेंद्र मोदींना दिलेली ‘क्लीन चिट’ व न्यायालयाने माया कोदनानी, बाबू बजरंगी आदींना ठोठावलेली सजा अशा किती तरी घटनांचा व राजकीय घडामोडींचा आढावा क्रमप्राप्तच आहे.
काश्मीर हा लेखिकेचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय. तेथील सगळ्या उलथापालथी तिने अनुभवल्या आहेत. महत्त्वाच्या प्रसंगांचे रिपोर्टिग केले आहे. उदा. अब्दुल गनी लोनची कट्टर अतिरेक्यांनी खुल्या सभेत हत्या केली तेव्हा किंवा २००० साली हिजबुल मुजाहदीन व केंद्र सरकारच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर अतिरेक्यांनी जे हिंसक थैमान घातले तेव्हा लेखिका तेथेच होती. काही सहयोगी पत्रकार अतिरेक्यांकडून मारले गेले किंवा जखमी झाले. सुदैवाने लेखिका बचावली. काश्मीरमधील सर्व स्तरांच्या लोकांशी ती सतत बोलत राहिली आहे. आपल्या सेनाधिकाऱ्यांच्या शौर्याचे ती कौतुक करते, पण त्याबरोबरच जेव्हा पथरीबालसारख्या घटनाक्रमात पाच निरपराध काश्मिरींचे अपहरण करून सेनाधिकारी त्यांना दहशतवादी ठरवून खून करतात किंवा २०१० साली दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर बेछूट गोळीबार करून शंभर युवकांचे प्राण घेतात, तेव्हा लेखिका सैन्याच्या अशा दुष्कृत्यांवर जरूर बोट ठेवते. १९९० सालच्या दहशती कारवायांमुळे सुमारे सहा लाख काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले. सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने तोंडपाटीलकी केली, पण कोणीही त्यांच्या ‘घरवापसी’कडे खरे लक्ष दिले नाही. काश्मीरमध्ये फुटीरतावादी दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकार सदैव साहाय्य करीत आले आहे. ते त्यांचे निषेधार्ह धोरण आहे, पण भारतीय शासनाच्याही चुका झाल्या आहेत. उदा. १९८७ च्या बनावटी निवडणुका, पथरीबालसारख्या घटना, यासिन मलिकसारख्यांच्या संघटनांना मुख्य धारेत सामावून न घेणे, सैन्याकडून मानवाधिकारांचे उल्लंघन वगैरे, वगैरे. घटनेच्या ३७०व्या कलमाबाबत आक्षेप घेत राहणेही सध्या थांबले आहे, ते योग्यच आहे. काश्मीर प्रश्नाच्या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे, असे लेखिका सुचवते.
राजकीय नेत्यांपैकी सोनिया-राहुल गांधी, केजरीवाल व नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीचा धांडोळा घेण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे. त्यात विशेषत: नरेंद्र मोदींच्या राजकीय घोडदौडीचे विश्लेषण लक्षणीय आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी आपण चहावाला असल्याचे कसे चातुर्याने भांडवल केले आणि शिवाय विकासाचा मुद्दा घेऊन मध्यमवर्गीयांना कसे आकृष्ट केले हे अधोरेखित केले आहे. मोदींच्या पाकिस्तान धोरणाबाबत विवेचन करताना लेखिकेने एक गौप्यस्फोट केला आहे. २०१४ साली नेपाळमधील सार्क संमेलनात मोदी व नवाज शरीफ ताठरपणे वागून एकमेकांपासूनचा दुरावा दर्शवीत होते; तथापि त्याच दोन-तीन दिवसांत पोलाद उद्योगातील उद्योजक सज्जन जिंदल यांच्या हॉटेलमधील खोलीत मोदी-शरीफ यांची सुमारे तासाभराची गुप्त बैठक झाली, अशी खबर लेखिकेला फार उशिरा मिळाली. ती पुस्तकात सामील झालेली पाहताच आधी पाकिस्तान शासनाकडून व नंतर आपल्या शासनाकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला; तथापि नुकतेच २५ डिसेंबरला मोदी लाहोरला नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले, तेव्हा सज्जन जिंदलही आधीच लाहोरला त्याच कामास्तव आले होते, ही वस्तुस्थिती आहे. अफगाणिस्तानातील कच्चे लोखंड पाकिस्तानमार्गे आपल्या उद्योगाकरिता भारतात आणायचा मार्ग सुकर व्हावा, हा जिंदल यांचा उद्देश असू शकतो किंवा दोन्ही नेत्यांमधील ही ‘ट्रॅक-टू डिप्लोमसी’ असू शकते. असो. मोदी हे चतुर नेते आहेत हे याच नव्हे तर इतर अनेक उदाहरणांनी सिद्ध होते. तीन विचारवंतांची देशात हत्या होते, दादरीसारख्या भीषण घटना घडतात किंवा संघपरिवाराचे नेते किंवा महेश शर्मासारखे मंत्रीदेखील सांप्रदायिक आक्षेपार्ह विधाने करतात, तेव्हा मोदी त्यांची ‘मन की बात’ जाहीर का करीत नाहीत?
नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचे विश्लेषण करून लेखिकेने एक निष्कर्ष असा काढला आहे की, भारत व्यावहारिकदृष्टय़ा ‘अध्यक्षीय प्रणाली’ (म्हणजे अमेरिकेसारखी प्रेसिडेन्शल सिस्टम) अंगीकारीत आहे. शिवाय, अनेक वर्षांच्या निरीक्षणानंतर लेखिकेचे असे मत झाले आहे की, मोदींच्या आकांक्षा व ध्येये ही व्यक्तिगत आहेत- विचारसरणीवर आधारित नाहीत. लेखिकेचे असे निष्कर्ष विचारप्रवर्तक आहेत, यात शंका नाही.

भारताच्या आधुनिक राजकारणाबाबतच्या ग्रंथसंपदेत या पुस्तकाने लक्षणीय भर पडली आहे.
‘धिस अनक्वाएट लॅण्ड’ ‘स्टोरीज फ्रॉम इंडियाज फॉल्ट लाइन्स’,
लेखिका : बरखा दत्त, प्रकाशक : अलेफ बुक कं.
पृष्ठे- ३२४, किंमत- ५९९ रुपये.
 parag.phatak@expressindia.com