|| अभिजीत ताम्हणे

हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त असले तरी, खुर्शीद यांना अभिप्रेत असलेले परिवर्तन घडवण्यास ते कमी पडेल…

‘‘ घंटानाद आणि पवित्र स्तोत्रांनंतर भारताचे लोक स्वत: बोलू लागतील, तेव्हा त्यांच्या आवाजात ईश्वरलीनतेचा भाव असेल आणि राज्यघटनेच्या पालनास आम्ही बांधील आहोत, असा सूरसुद्धा. सत्यमेव जयते’’- अशा पहाटेचे स्वप्न ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या अखेरीस सलमान खुर्शीद पाहातात आणि गांधीजींचे प्रिय ‘रघुपति राघव राजाराम…’ हे भजन संपूर्ण उद्धृत करून पुस्तक संपते. गांधीजींची रामराज्याची कल्पना ईश्वरी पावित्र्य, ते जपण्यासाठी माणसांचे सदाचरण यांवर आधारित असून ती वैश्विकच आहे, गांधीजींना अभिप्रेत रामराज्याचा धर्माधिष्ठित राष्ट्राशी (हिंदुराष्ट्राशी) संबंध जोडणे चूकच, असे याआधी खुर्शीद सप्रमाण सांगतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला, अयोध्येतील राम-मंदिराचा मार्ग सुकर करणारा ९ नोव्हेंबर २०१९ रोजीचा निकाल हा पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. तसेच, पुस्तकाचा आवाका फार मोठा आणि लेखकाच्या अभ्यासूपणाला भरपूर वाव देणारा आहे.

पण हा अभ्यासूपणा आणि लेखकाला अभिप्रेत असलेल्या शहाणिवेसाठी आवश्यक असणारी चर्चा यांचा संबंध पुस्तकामध्ये पुरेसा प्रस्थापित होतो आहे का? प्रथमदर्शनी होय. कारण ही चर्चा केवळ निकालापुरती राहात नाही. रामकथा ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी आहे, प्रांतोप्रांती आणि कालौघात रामायण कसे टिकून आहे याविषयी अख्खे प्रकरण (क्र. ३), त्यानंतर जगातील सर्व धर्मांची ओळख करून देणारे आणि मग, जगातील आणि भारतातील ‘वादग्रस्त’ धर्मस्थळांचा आढावा घेणारे प्रकरण, असा विस्तीर्ण टापू न्याहाळून पुढल्या सात-आठ प्रकरणांतून टप्प्याटप्प्याने हे पुस्तक ‘केंद्रबिंदू’कडे- म्हणजे २०१९च्या अयोध्या निकालाकडे येते. ही रचना प्रथमदर्शनी तरी, साकल्याने- साद्यंत चर्चा करण्याच्या भूमिकेची द्योतकच. पण या रचनेला न्याय देणारे लिखाण पुस्तकात आहे का?

तसा प्रयत्न जरूर आहे. पण अनेकदा- त्यापैकी एक-दोन ठिकाणी तर अत्यावश्यक असूनही- सकारण, साधकबाधक चर्चेऐवजी केवळ उल्लेख करून खुर्शीद पुढे जातात. असे पहिले उदाहरण म्हणजे हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी आणि सत्ताप्राप्तीसाठीच नव्हे तर मुस्लिमांवर वचक बसवण्यासाठी करणाऱ्या गटांविषयीच्या एका वाक्यामध्ये ते ‘बोको हरम’ आणि ‘आयसिस’चा उल्लेख करतात. पृष्ठ ११३ वर, सहाव्या प्रकरणाच्या सुरुवातीला विषयप्रवेशवजा शेऱ्यांचा एक भाग म्हणून हा उल्लेख येतो आणि तिथेच विरतो! त्या हिंदुत्ववादी गटांची तुलना याच दोन इस्लामी संघटनांशी का करायची, इस्लामी गटांऐवजी अमेरिकी वंशवर्चस्ववादी ‘कू क्लक्स क्लॅन’शी का नाही, किंवा भारतात काय इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना कमी आहेत का? मग त्यांच्याशी यांची तुलना का नाही? हे खुर्शीद सांगतच नाहीत. तो उल्लेख अधांतरीच राहातो- त्याला वास्तवकथनाचा किंवा गेलाबाजार युक्तिवादाचाही आधार मिळत नाही. ही अशी अधांतरी शेरेबाजी पुस्तकाला भोवते आहेच. पुस्तकाच्या पुढल्या आवृत्तीत हा (‘बोको हरम’ आणि ‘आयसिस’) उल्लेख कदाचित गाळलाही जाईल; पण आणखी एका उल्लेखासंदर्भात तरी खुर्शीद यांना स्पष्टीकरणवजा चर्चा करावीच लागेल, तो म्हणजे रामकथेच्या आज होणाऱ्या वापराबद्दल त्यांचे एक निरीक्षण. रामकथेच्या समकालीन निरूपणांमध्ये- म्हणजे उदाहरणार्थ, करोनाकाळापूर्वी दरवर्षी अगणित ठिकाणी होणाऱ्या ‘रामलीलां’मध्ये तुलसीदासांचे मोजके दोहेच निवडून, नाट्यीकरणावर भर देऊन राम हा आदर्शच आणि रावण केवळ दुष्टच असा प्रचार केला जातो हे ज्यांनी पाहिले आहे, त्यांना कदाचित खुर्शीद यांच्या स्पष्टीकरणाविना आजही ते निरीक्षण पटेल. पण इतरांनीही ते समजून घ्यावे, असे मानण्याचा खुर्शीद यांना काय अधिकार? – ‘रामकथेचा वापर ‘आपण आणि ते’ या कल्पनेला आधार देण्यासाठी करणे (महाभारतापेक्षा) सोपे जाते’ असे खुर्शीद यांचे म्हणणे. उद्या तेही वादग्रस्त ठरवण्यात आले, तर नवल नाही. याखेरीज, अयोध्या वादात आम्हीच भाजपविरुद्ध उभे ठाकू, असे भासवत समाजवादी पक्ष वाढला आणि काँग्रेस उत्तर प्रदेशात आक्रसली, अशा अर्थाचे वाक्य पुस्तकात दोनदा (प्रकरण १ व १३) येते, पण काँग्रेसची पीछेहाट या एकाच कारणाने झाली का, यावर मौन! 

खुर्शीद वकील आहेत तसेच राजकारणीही आहेत. परिणाम साधण्यासाठी बोलणे हे वकिलांप्रमाणेच राजकारण्यांचेही वैशिष्ट्य; पण राजकारण मोघमपणाची ताकद ओळखते. खुर्शीद यांनी लेखक म्हणूनही त्याच ताकदीला महत्त्व देणे हे पुस्तकाबद्दल किंतु निर्माण करते. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी ‘६ डिसेंबर १९९२’ संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आम्हां सहकाऱ्यांना बोलूच दिले नाही, असे खुर्शीद सांगतात पण तेव्हा त्यांना काय म्हणायचे होते, हे आजही गुलदस्त्यात राहाते. दुसऱ्यांनी लिहिलेले उतारेच्या उतारे – मग ते रामकथेचे सारांश असोत की कायद्यातील कलमे की राष्ट्रपतींच्या सहीनिशी निघालेला आदेश की अनेक महत्त्वाची निकालपत्रे… हे सारे अगदी नीटसपणे खुर्शीद (किंवा त्यांचे स्वीय सहायक वगैरे) या पुस्तकामध्ये उतरवून काढतात, पण स्वत: खुर्शीद यांना काय म्हणायचे आहे, हे अक्षरश: धुंडाळावेच लागते.

लेखकाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी पृष्ठ २७६-७७; पृ. २८५; पृ. ३३७-३९;  पृ. ३५९-६१ ही पाने अधिक उपयुक्त आहेत. विशेषत: ३०० नंतरच्या पानांत अयोध्या निकालाबद्दल खुर्शीद यांचे विश्लेषण वाचता येते. त्याचा सुसूत्र गोषवारा सांगताना दोन भाग करावे लागतील. पहिला तांत्रिक/ वकिली निरीक्षणांचा. सन १५५८ ते १८८५ पर्यंत वादग्रस्त वास्तूवर आमचाच निर्विवाद हक्क होता आणि तिथे नमाजही सुरू होती, हे मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळ व अन्य याचिकादारांच्या वकिलांना सिद्ध करता आले नाही. याउलट, हिंदू प्रार्थना तिथे सुरू असल्याच्या दाव्यास पुष्ट्यर्थ, गतकाळातील भारतवर्णनांचे वगैरे पुरावे देता आले. उद्ध्वस्त मशिदीखाली पुरातत्त्व विभागाला मंदिरच सापडल्याचा हिंदूंचा दावा न्यायालयाने मान्य केलेला नाही. इत्यादी निरीक्षणे खुर्शीद नोंदवतात.

पण खुर्शीद यांच्या म्हणण्याचा दुसरा भाग असा की, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्षतेला पुढे नेण्यासाठी हा निकाल उपयुक्त आहे- कारण तो अयोध्येचा जुनाट वाद संपवून टाकतो आणि ‘काशी-मथुरेचे वाद यापुढे होऊ नयेत’ अशी हमीही मागतो. काशी वा मथुरेच्या जागा वादग्रस्त आहेत हे याच पुस्तकात आधी नोंदवले आहेच, खुर्शीद यांच्या मते प्रश्न आहे तो एकोप्याने भारतीय म्हणून एकसंध वाटचाल करण्याचा. एक वाद राजकारण आणि समाजजीवनही बिघडवू शकतो, हे १९९२/९३च्या दंगली/ बॉम्बस्फोटांनी दाखवून दिले आहे, त्याचा आढावा दुसऱ्याच प्रकरणात खुर्शीदही घेतात.

‘यापुढली वाटचाल’ हा खरा प्रश्न मानणारे खुर्शीद, १५ न्यायाधीशांचे सर्वोच्च घटनापीठ बसवून आपल्या राज्यघटनेचा मूलभूत ढांचाच (धर्मनिरपेक्षता, मूलभूत हक्क, द्विदल संसदीय पद्धती, संघराज्य आदी) बदलून एकधर्मी राजवट आणणेही शक्य असल्याचा तर्क नमूद करतात आणि त्याचा प्रतिवाद करण्यासाठी, ‘अनेकान्तवाद स्वीकारण्याची एक संधीच आपल्याला अयोध्या निकालानंतर मिळाली आहे,’ असे मत मांडतात.

ही मते कुणाला पटतील, कुणाला पटणारही नाहीत. खुर्शीद यांना अपेक्षित असलेल्या अनेकान्तवादाशी ते सुसंगतच! मग पुस्तकाचे महत्त्व काय? – धर्मांविषयी, त्यासंदर्भाने झालेल्या वादांविषयी, ‘सेक्युलरिझम’ किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी जे सहा-सात अतिमहत्त्वाचे न्यायनिवाडे आजवर झाले, त्यांची उत्तम उद्धृते या पुस्तकात आहेत, धर्मांविषयीची अन्य माहितीही आहे, कायद्याच्या तत्त्वांचाही ऊहापोह ओघाने येतो. एक प्रकारे माहितीकोश-कर्त्यांसारखे काम खुर्शीद यांनी केलेले आहे… पण सलग एक पुस्तक म्हणून वाचताना ‘इकडचे थोडे- तिकडचे थोडे’ ही पद्धत विसविशीत वाटू शकेल. विद्यार्थिवर्गास हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्तच, पण खुर्शीद यांचा धर्मनिरपेक्षतावाद माहीत असलेल्यांना मात्र या पुस्तकात त्या विचाराची सुसूत्र मांडणी दिसणार नाही. म्हणूनच, खुर्शीद यांना अभिप्रेत असलेले परिवर्तन घडवण्यास हे पुस्तक कमी पडेल.

पुस्तकाच्या विसविशीतपणात भर घालणारी प्रकाशकीय घोडचूक म्हणजे, संदर्भग्रंथ ठरू शकणाऱ्या या पुस्तकाला सूची (इंडेक्स) नाही! उद्धृते आणि लेखकाचा मजकूर यांतील फरक कळावा यासाठी निराळे टंक (फॉण्ट) वापरणे ठीकच, पण त्याने पुस्तकाचे दृश्यरूप एकसंध राहात नाही. तरीही, धर्मविषयक निवाड्यांचा एकत्रित संदर्भ म्हणून हे पुस्तक अवश्य वाचण्याजोगे आहे.