‘थोडक्यात समजणे’ वा ‘थोडक्यात समजावणे’, यासाठी मुद्देसूद असण्याची  हातोटी लिखाणात हवी, ती पुस्तक लिहिणाऱ्यांना कळू नये, ही मोठी कोडय़ात टाकणारी गोष्ट आहे. की त्यांना ती कळलेली असते, पण लिहिण्याचा सोस त्यांना शब्दबंबाळ जंगलात दूर दूर घेऊन जातो? त्यातही व्यक्तिचित्रणात लेखणीवर न राहिलेला ताबा वाचकांना पुस्तक वाचतानाच टक्क जागं राहण्याची सूचना देऊन जातो. व्यक्तिचित्रणात लिखाणाचे अनेक कंगोरे असू शकतात; पण साधारण त्या व्यक्तीचा समाजावर पडलेला प्रभाव आणि त्यातून समाजात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा वास्तववादी आशय नेमकेपणाने वाचकाच्या मनात उतरत असेल तर अशा पुस्तकांचे स्वागत करणे अधिक योग्य होईल. अनेक लेखकांची पकड इथेच सुटलेली असते, मग पुस्तकातील मजकुराचे तारू असे काही भरकटत जाते की वाचकाला वाचनानंद काही गवसत नाही!

तीन खंडांतील किमान पाच देशांमध्ये अभ्यास करून आलेल्या आणि अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या गुंजन जैन यांच्या ‘शी वॉकस्, शी लीडस्- विमेन हू एन्स्पायर इंडिया’ या सचित्र पुस्तकाबाबत असेच झाले आहे. खरे तर त्यांच्या नावामागे अर्थशास्त्र आणि गुंतवणूक व्यवस्थापन याशिवाय ‘प्रतिमा व्यवस्थापन’ आदी अनेक पदव्यांचा उल्लेख आहे. त्या स्वत:ला प्रेरणादायी लेखिका, वक्त्या आणि विचारनेत्या म्हणवून घेतात. त्यामुळे त्यांच्यावर हे पुस्तक अधिक गोळीबंद सिद्ध करण्याची जबाबदारी अधिक वाढते. पुस्तकांतील एकूण ५५६ पानांमध्ये

उद्योगपतींच्या पत्नी नीता अंबानी, राजश्री बिर्ला, सुधा मूर्ती, यास्मीन प्रेमजी आणि परमेश्वर गोदरेज (यांचे निधन अलीकडेच  झाले.) यांचा ‘परोपकारी आणि समाजशील’ म्हणून; तर कॉर्पोरेट, बँकिंग आणि कायदे क्षेत्रातील इंद्रा नुयी, चंदा कोचर, अर्नवाझ अनु आगा, नैना लाल किडवाई, किरण मजुमदार-शॉ, झिया मोदी, स्वाती पिरामल, मनोरंजन क्षेत्रातील प्रियांका चोप्रा, मीरा नायर, शबाना आझमी आणि करीना कपूर खान. फॅशन, कला आणि सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या अनामिका खन्ना, रितू कुमार, ज्योत्स्ना दर्डा, माध्यमातील शोभना भाटिया, इंदू जैन आणि क्रीडा विश्वातील मेरी कोम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल यांचा कर्तबगार महिला म्हणून या पुस्तकात समावेश आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारे मुद्दे विस्ताराने मांडले आहेत. याशिवाय त्यांचे कर्तृत्व सांगणारे त्यांचे पती आणि/ किंवा त्या क्षेत्राशी निगडित मातब्बर यांच्या मुलाखती आहेत. पुस्तकातील व्यक्तींबद्दल अशी वेगवेगळ्या स्वरूपातील माहिती कशासाठी वाचतो आहोत, याचा अंदाज लागणे कठीण आहे. मासिकातील व्यक्तिपर लेखांना जशी त्या व्यक्तीबद्दल इतर जण काय म्हणतात हे सांगणाऱ्या चौकटींची जोड असते, तसे या पुस्तकाचे झाले आहे.

त्याखेरीज, पुस्तकाच्या सुरुवातीला नामांकितांची अवतरणे पानांपानांत विखुरलेली आहेत. उदाहरणार्थ, नीता अंबानी यांच्याविषयी शाहरुख खान याने मांडलेले मत- ‘नीता अंबानी यांचं व्यक्तिमत्त्व एखाद्या ‘स्पंज’सारखं आहे. त्या कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला त्या साच्यात टाकून घडवू शकतात, मग ते क्षेत्र शिक्षणाचं असो वा समाजसेवेचं वा खेळाचं. फार कमी वेळात, अत्यंत वेगाने आवश्यक तंत्र व ज्ञान आत्मसात करण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे’. अंबानी घराण्याची सून म्हणून प्रत्येक सुख पायाशी लोळण घेण्यासाठी तयार असताना नीता यांनी पतीच्या कर्तृत्वाला साजेशी कामगिरी करण्यावर अधिक भर दिला. हा त्यातील एक चांगला भाग. यात इतर उद्योगपतींच्या सौभाग्यवतींच्याही कार्याचा उल्लेख आहेच; परंतु अंबानी यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उल्लेख यात अधिक ठळकपणे आणि त्यांच्याच छायाचित्रांसाठी सुमारे आठ पाने खर्ची घालून मांडण्यात आला आहे.

सुधा मूर्ती यांनी नोकरी करून साठवलेले पैसे ‘इन्फोसिस’ सुरू करण्यासाठी नारायण मूर्ती यांना दिले. ‘बायोकॉन लिमिटेड’च्या किरण मजुमदार-शॉ यांनी अवघ्या दहा हजार रुपयांच्या बेगमीवर व्यवसाय सुरू केला. अशी काही प्रेरणादायी उदाहरणे लिहिण्याच्या ओघात गुंजन देतात. टाटा कंपनीच्या व्यवस्थापनाला स्वत:चा नियम बदलण्यास भाग पाडणाऱ्या ‘टेल्को’मधील पहिल्या महिला अभियंत्या. ज्याची दखल जेआरडी टाटा यांना घ्यावी लागली.

यातील काही कर्तृत्ववान महिलांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि त्यातून त्यांनी त्यावर मात केली आहे, हे सांगणारी प्रकरणे आहेत, तर दुसरीकडे सधन आणि नेहमी एका आंतरराष्ट्रीय वतुर्ळात मानाने वावरणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा आलेख यात मांडण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या लेखिकेचे म्हणणे असे आहे की, या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे वाचकांना प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे ते प्रत्येकाने वाचायला हवे; परंतु वाचकांनी हे पुस्तक हातात घेतल्यानंतर नेमके काय वाचावे आणि काय लक्षात ठेवावे, याची खातरजमा करूनच हे पुस्तक विकत घेण्याचे ठरवावे, इतके मात्र नक्की!

  • शी वॉक्स, शी लीड्स
  • लेखिका : गुंजन जैन
  • प्रकाशक : पेंग्विन
  • पृष्ठे : ५८४, किंमत : ७९९ रु.

 

गोविंद डेगवेकर

govind.degvekar@expressindia.com