भारतीय तरुणाईचं निराळेपण गेल्या दहा वर्षांत ‘आयटी क्षेत्रा’तून तर दिसलंच, पण त्या क्षेत्रातल्या तरुणांचा संबंध राजकीय पक्षाशीही येऊ लागला. ‘बंद कशाला करता?’ असं एक तरुणी विचारू शकली, आणखी कुणी- घरकाम करताना पोलीस अधिकारी होण्याची स्वप्नं पाहू लागली.. भूतकाळाशी देणंघेणं नाही, भविष्यकाळ घडवायचाय- अशा तरुणाईची ओळख, १२ जानेवारीच्या ‘युवक दिना’आधी!
भारताची गेल्या १५ वर्षांतील आíथक प्रगती, इथली तरुणाई, या देशात होत असलेले सामाजिक आणि राजकीय बदल याविषयी बाहेरील जगाचे कुतूहल वाढत चालले आहे. त्यामुळे भारत कसा बदलत आहे, या बदलांची दिशा काय असणार आहे आणि भारताच्या समोरील आव्हाने काय असणार आहेत याविषयी बरेच लेखन भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या लेखकांकडून होत आहे. याच लेखनाशी नाते सांगू शकेल असे पुस्तक ‘दि एण्ड ऑफ कर्मा’ नावाचे शौमिनी सेनगुप्ता यांनी लिहिले आहे. भारतात येण्यापूर्वी सेनगुप्ता पश्चिम आफ्रिकेत काम करून आल्या होत्या आणि आता त्या न्यूयॉर्क टाइम्ससाठी न्यूयॉर्कमध्येच राहून संयुक्त राष्ट्रसंघविषयक वार्ताकन करतात. याच दैनिकाच्या दिल्ली येथील प्रतिनिधी म्हणून २००५ मध्ये सेनगुप्ता भारतात आल्या. पुढील चार-पाच वष्रे त्यांनी न्यूयॉर्क टाइम्ससाठी दिल्लीतून वार्ताकन केले. त्या काळात सेनगुप्ता भारतात बऱ्याच फिरल्या, विविध स्तरांतील लोकांना-विशेषत तरुणांना- भेटल्या, रामचंद्र गुहा आणि आशीष नंदी यांची पुस्तके त्यांनी वाचली. या साऱ्या शोधाच्या काळात जग, भारत आणि सेनगुप्ता स्वत विविध स्थित्यंतरांना सामोऱ्या गेल्या. आपल्या या प्रवासात त्यांनी एका परिघावरून बदलता भारत, विशेषत इथली तरुणाई, समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाच्या नऊपकी सात प्रकरणांमधून ११ तरुणांच्या कहाण्या त्या आपल्यासमोर मांडतात. एक अपवाद वगळता पुस्तकातील सर्व तरुणांचा जन्म १९८०च्या दशकातला किंवा त्या नंतरचा आहे. त्यापकी सात तरुण हे समाजाच्या कनिष्ठ स्तरातून आले असून जगण्यासाठी, प्रगतीसाठी विविध प्रकारचा संघर्ष सातत्याने करीत आहेत. उरलेले चार जण मध्यमवर्गीय पाश्र्वभूमी असलेले आहेत. या ११ जणांपकी सहा युवती असून पाच युवक आहेत. गंमत म्हणजे जे चार जण मध्यमवर्गीय घरातून आले आहेत ते सर्व दक्षिण भारतीय असून उरलेले सात जण हे उत्तर आणि पूर्व भारतातील आहेत. पुस्तकातील लेखन २००५ ते २०१५ या काळावर दृष्टिक्षेप टाकते. या तरुणांच्या वयाचा विचार केला तर साधारणत १५ ते ३५ वयोगटातील हे सारेजण आहेत. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन आकाराला येत असलेल्या काळात सध्याच्या लेखिका त्यांना भेटली आहे. नेमक्या याच तरुणांची निवड का केली गेली, याविषयी काहीएक निकष लेखिकेने दिलेले नाहीत. मात्र त्यांच्यातील समान घटक असा की या सर्वाना आपले भविष्य स्वतच घडवायचे आहे. भूतकाळाशी त्यांना काही देणेघेणे नाही. म्हणजे एका अर्थाने भारतीय तरुणाईचा एक प्रातिनिधिक तुकडा निवडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. पुस्तकाचे शीर्षक ‘दि एण्ड ऑफ कर्मा’ याच आशयाला व्यक्त करते. पुस्तकात अनुपम नावाचा पाटणा शहरात राहणारा आणि आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न पाहणारा तरुण आहे. दिल्लीजवळील गुरगाव (गुरुग्राम) येथील उच्चभ्रू वसाहतीत घरकाम करीत असलेल्या दोन मुली आहेत. या दोघीही मूळच्या झारखंडमधील आहेत. त्यापकी एका मुलीला तर भारतीय पोलीस सेवेत जायचे आहे. आधी नक्षलवादी चळवळीत सामील झालेली आणि नंतर बाहेर पडलेली एक तरुणी आहे. नरेंद्र मोदी आणि अरिवद केजरीवाल यांच्याबरोबर अतिशय जवळून काम करणारे आयटी क्षेत्रातील दोन तरुण आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर ‘जाणारे गेले, आता बंद कसले करता?’ अशा अर्थाच्या फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पालघर शहरातील दोन तरुणी आहेत. आणि जातिव्यवस्थेचे सर्वात हिडीस स्वरूप ज्यातून समोर येते अशा ऑनर कििलगचे बळी पडलेले दिल्लीतील एक जोडपे आहे.
सेनगुप्ता यांनी या सर्वाच्या कहाण्यांना एका सूत्रात बांधले आहे. या सर्वाना प्रगतीची आशा आहे. कोणालाही आपल्या कुटुंबाकडून आलेल्या किंवा समाज-शासनाच्या स्तरावरसुद्धा भूतकाळात अडकून राहायचे नाही. आíथक आणि सामाजिक प्रगती साधायची आहे. मात्र या देशातील शासन आणि समाज विविध माध्यमांतून नेमका याच प्रगतीच्या आड येत आहे. यापूर्वीच्या तरुण पिढीमध्ये संयम होता. सेनगुप्ता ज्यांच्याविषयी लिहितात ती सध्याची तरुणाई मात्र बदलांसाठी आणि प्रगतीसाठी उतावीळ झालेली आहे. त्यामुळे एका बाजूला अफाट ऊर्जा, आशा आणि आकांक्षा असलेली अशी ही तरुणाई आहे. तिच्या हातांत आशावाद आणि तंत्रज्ञान आहे, तर दुसऱ्या बाजूला काळाच्या ओघात मागे पडत असलेल्या सामाजिक आणि राजकीय संस्था, कायदे आहेत. यालाच जोडून येणारा घटक म्हणजे भारत आपल्या प्रगतीसाठी लोकशाही राज्यव्यवस्थेच्या मार्गावर सातत्यपूर्ण वाटचाल करतो आहे. त्यामुळे होऊ घातलेले बदल आणि स्थितिशील व्यवस्था यांच्यातील संघर्षांतून उद्याचा भारत घडवला जाणार आहे असे चित्र पुस्तक वाचताना उभे राहते. पुस्तकातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला सेनगुप्ता भेटल्या आहेत, त्यांच्याशी त्यांनी गप्पा मारल्या आहेत. त्यांचा प्रवास, संघर्ष, आशा-अपेक्षा समजावून घेतल्या आहेत. पाटणा शहरात सुरू झालेला आणि हल्ली मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या अनुपमचा प्रवास त्यांनी दहा वष्रे जवळून पाहिला आहे. गुरगावमध्ये घरकाम करणाऱ्या मुलींच्या संपर्कात त्या अशीच अनेक वष्रे राहिल्या आहेत. नक्षलवादी चळवळीत सामील झालेल्या राखीला त्या भेटल्या आहेत. नक्षलग्रस्त दुर्गम भागात त्या स्वत जाऊन आल्या आहेत. ऑनर कििलगचे बळी पडलेल्या जोडप्याशी त्या स्वत भेटू शकल्या नाहीत; मात्र त्यांच्या जवळच्या लोकांशी त्या बोलल्या आहेत. याच्याच बरोबरीने त्यांनी या कहाण्यांमधून मूळ प्रश्न काय आहे याचा वेध घेतला असून त्यासाठी आवश्यक असे अहवाल, इतर वाचन त्यांनी केले आहे. त्याचे संदर्भ पुस्तकात येत राहतात.
सेनगुप्ता स्वत मुळात भारतात जन्माला आल्या. त्यांचे आई-वडील १९७५ मध्ये भारत सोडून अमेरिकेला गेले. त्यानंतर २००५ मध्ये त्या भारतात परत आल्या. मधल्या ३० वर्षांत त्यांचा भारताशी थोडाफार संबंध येत राहिला. पुस्तकात सेनगुप्ता आपले वैयक्तिक आयुष्य आणि पुस्तकातील व्यक्तींचे आयुष्य याची सांगड घालत राहतात आणि आपला मुद्दा नेमकेपणे स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, गुरगावमधील ज्या घरातील मुलीची कहाणी त्या आपल्याला सांगत असतात त्या घराच्या मालकिणीविषयी त्या लिहितात की, जर मी भारतातच राहिले असते तर आज जशी ती आहे तशीच माझी जडणघडण झाली असती. किंवा नक्षलवादी चळवळ कशी बदलली आहे यासाठी त्या त्यांच्या नक्षलवादी चळवळीत सामील झालेल्या एका मामाचे उदाहरण देतात. त्याच्या माध्यमातून सत्तरीच्या दशकातील नक्षलवादी आणि आताचे नक्षलवादी यांच्यातील फरक त्या स्पष्ट करून दाखवतात. सेनगुप्ता यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पुस्तकातील एका व्यक्तीविषयी सांगताना आपल्याच पुस्तकातील इतर कोणाच्या तरी कहाणीतील पूरक संदर्भ त्या देत जातात. उदा. : राजकीय पक्षांबरोबर (त्यांच्या समाजमाध्यम पथकांमध्ये) काम करणाऱ्या आयटी क्षेत्रातील मुलांच्या कहाणीत २०१४ च्या निवडणूक निकालावर त्या बिहारमधील अनुपमचे काय मत आहे हे आपल्याला सांगून जातात. त्यामुळे होते काय, तर पुस्तकात एक अंतर्गत सुसंगती राहते. प्रत्येक व्यक्तीची गोष्ट ही सुटी सुटी नसून ती भारत नावाच्या अवाढव्य, मोठय़ा कहाणीचा एक भाग आहे आणि इथले सर्वजण एकमेकांशी काही ना काही कारणाने जोडले गेले आहेत असे जाणवत राहते.
सेनगुप्ता यांची लेखनशैली ही बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी मार्क टुली यांची आठवण करून देते. दोघांत अनेक साम्यस्थळेसुद्धा आहेत. सेनगुप्ता यांच्याप्रमाणेच टुली यांचासुद्धा जन्म भारतात, तोसुद्धा कोलकत्यात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर दोघेही भारताबाहेर गेले आणि एका परदेशी वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून भारतात आले. टुलीसुद्धा सेनगुप्ता यांच्याप्रमाणेच भारतात भरपूर फिरून, सामान्य लोकांची आयुष्ये समजून घेऊन, त्यांच्या माध्यमातून भारतासमोरील आव्हाने त्यांनी मांडली. एका अर्थाने त्या त्या वेळेचा भारत समजावून देणारे ते लेखन होते. अतिशय वाचनीय, पत्रकाराच्या शोधक नजरेने टिपलेले आणि तरीही ललित शैलीत लिहिलेले अशी ती पुस्तके आहेत. सेनगुप्ता नेमक्या अशाच प्रकारे लेखन करतात.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात अतिशय चमकदार अशी निरीक्षणे आहेत. कदाचित जे भारतीय नजरेला अतिशय सवयीचे झालेले असते त्याविषयी सेनगुप्ता लिहितात आणि काही तरी वेगळे देऊन जातात. बिहारमधील अनुपमची गोष्ट आणि गुरगावमध्ये पोलीस अधिकारी बनू पाहणारी मुलगी- वर्षां- यातील मुख्य भेद सांगताना त्या नोंदवतात की उलट घरकामाचा मुख्य वाटा वर्षांला उचलावा लागतो, जिथे की अनुपमची आई सर्व कामे आटपून त्याला फक्त अभ्यास करू द्यायची. अनुपमची जीवापाड काळजी घेणारी आई गुरगावमधील वर्षांकडे नाही. का? अनुपम मुलगा आहे तर वर्षां मुलगी. अशी निरीक्षणे पुस्तकात जागोजागी विखुरलेली आहेत.
आजच्या भारताच्या समोर असलेल्या विकासाच्या, वैविध्याच्या प्रश्नांना पुस्तक स्पर्श करून जाते. ग्रामीण विरुद्ध शहरी, शहरातील विकासाचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, परंपरा विरुद्ध आधुनिक मूल्ये, लिंगभेद (मुलगा विरुद्ध मुलगी), प्रादेशिक विकासाचा असमतोल, विविध समाजघटकांमधील भेदाभेद, जातिव्यवस्था, स्त्रियांचे समाजातील स्थान, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि त्याची मर्यादा, आíथक आणि सामाजिक विषमता, लोकशाही व्यवस्थेविरोधातील िहसा, तंत्रज्ञान आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम, दारिद्रय़, विषमता, बेरोजगारी अशा आजच्या भारतासमोर असलेल्या महत्त्वाच्या संघर्षरेषा आपल्यासमोर उभ्या राहतात. या काही व्यक्तींच्या कहाण्यांमधून बदलत्या भारतीय तरुणाईचे एक छोटे चित्र समोर येते. ते अर्थातच परिपूर्ण नाही आणि लेखिकेचा तसा दावासुद्धा नाही. मात्र जे मांडले आहे ती निरीक्षणे नाकारता येतील असेही नाही.
पुस्तकात दोन उणिवा आहेत, त्या जाता जाता नोंदवायला हरकत नाही. पुस्तकातील विविध तरुण आणि त्यांच्या गोष्टी सांगताना लेखिकेने हे सगळे कसे झाले याची प्रक्रिया जरा विस्ताराने सांगायला हवी होती. ही विविध स्तरांतील तरुण मुले त्यांना कशी भेटली, कसा संवाद साधला आणि त्यांचा प्रवास कसकसा समजून घेतला, त्यांचीच निवड का केली हे जरा सविस्तरपणे मांडले असते तर पुस्तकाची मजा आणखी वाढली असती. दुसरे म्हणजे पुस्तकाचे नाव आणि शीर्षक या दोन्हीविषयी जरा अधिक विचार करायला हवा होता. ‘दि एण्ड ऑफ कर्मा’ हे नाव तसे फसवे आहे. पुस्तकातील आशयाचा त्यातून लगेच बोध होत नाही. पुस्तकाचे मुखपृष्ठसुद्धा असेच आहे. गुलाबी रंगातील त्या मुखपृष्ठात होळी खेळण्यात धुंद झालेल्या तरुण मुलाचा फोटो आहे. मात्र सहज नजर टाकली तर हे नेमके काय मुखपृष्ठ आहे असा प्रश्न पडतो. जरा निरखून पाहिल्याशिवाय आशय कळत नाही. हे दोन छोटे दोष वगळले तर एकूण पुस्तक छान आहे. भारताविषयी रस असलेल्या कोणीही वाचावे असे हे पुस्तक आहे.
‘द एण्ड ऑफ कर्मा- होप अॅण्ड फ्युरी अमंग इंडियाज यूथ’
लेखिका : सोमिनी (शौमिनी) सेनगुप्ता,
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स,
पृष्ठे : २४४, किंमत : ५९९ रुपये
संकल्प गुर्जर
sankalp.gurjar@gmail.com
लेखक ‘साउथ एशियन युनिव्हर्सिटी’तून पीएच.डी.चा अभ्यास करीत आहेत.