गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घटनांनी आपल्या समाजातील धर्म, परंपरा आणि सांस्कृतिक समजुतदारपणावर नवे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. कर्नाटकातील मैसूरचा दसरा असो, ठाण्यातील भाषेवरील वाद असो किंवा महाराष्ट्रातील गरबाबंदीचा फतवा असो; या तिन्ही घटना पाहिल्या तर धार्मिक श्रद्धा, ओळख आणि राजकारण यांचा संगम अधिकच तीव्र होत चालला आहे, हे लक्षात येतं.

गेल्या काही दिवसांतल्या या तीन घटना पाहूया…

पहिली घटना –

मैसूरच्या प्रसिद्ध दसरा उत्सवाच्या उद्घाटन समारंभाला कर्नाटक सरकारने प्रमुख पाहुण्या म्हणून बानु मुश्ताक यांना आमंत्रित केलं. बानु मुश्ताक या बुकर पुरस्कार विजेत्या पहिल्या कन्नड लेखिका आहेत. त्यांच्या हार्ट लॅम्प या १२ कथांच्या संग्रहाला याच वर्षी हा सन्मान मिळाला. तर अशा प्रतिभावान आणि राज्याचं नाव जगात गाजवणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणं ही खरंतर त्या राज्यातल्या रहिवाशांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब. पण घडलं भलतंच…

भाजप नेत्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात रान उठवलं. त्यांचं म्हणणं असं की चामुंडेश्वरी देवीची पूजा हा या उत्सवातला एक महत्त्वाचा विधी आहे, त्यामुळे देवीवर विश्वास नसलेल्या मुश्ताक यांचा या उत्सवात सहभाग असता कामा नये. पण सिद्धरामय्या यांचं सरकार मागे हटेना. मग अलीकडच्या प्रथेप्रमाणे प्रकरण न्यायालयात गेलं.

अनेक जनहित याचिका दाखल झाल्या. पण अखेर कर्नाटक उच्च न्यायालयाने – राज्याच्या उत्सवात अन्य धर्मीय व्यक्तीच्या सहभागामुळे धार्मिक वा कायदेशीर अधिकारांचं उल्लंघन होत नाही, असं म्हणत याचिका फेटाळून लावल्या. सर्वोच्च न्यायालयानेही धर्मनिरपेक्ष देशातील उत्सवांत विविध धर्मीय व्यक्ती सहभागी होऊ शकतात. त्यांच्या सहभागामुळे कोणाच्याही हक्कांची पायमल्ली होत नाही, असं निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळल्या. अखेर काल २२ सप्टेंबर रोजी पिवळी सहावारी साडी नेसून आणि आंबाड्यात गजरा माळून आलेल्या बानु मुश्ताक यांच्या हस्ते महतोत्सवाचं उद्घाटन झालं.

द्वेषाने धगधगणाऱ्या आजच्या जगात मैसूरचा दसरा हे शांततेसाठी फुंकलेलं रणशिंग आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. टीकाकारांचे आडाखे खोडून काढत त्यांनी चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन तिचे आशीर्वादही घेतले. खरंतर मैसूरच्या दसरा उत्सवाचं उद्घाटन मुस्लीम व्यक्तीच्या हस्ते होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी २०१७मध्येही

कवी के. एस. निसार अहमद यांच्या या हस्ते उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि त्यावेळीही वाद उद्भवले होते, तेव्हाही सिद्धरामय्याच मुख्यमंत्री होते.

दुसरी घटना –

ठाण्यातले एक रहिवासी एस. के. श्रीवास्तव यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली की हिंदी वृत्तवाहिन्या वार्तांकन करताना ऊर्दू शब्दांचा सर्रास वापर करतात. हे प्रमाण सुमारे ३० टक्के असतं. हिंदी वाहिनीवर ऊर्दू बोलणं हा गुन्हा आहे, असं या तक्रारीत म्हटलं होतं. अलीकडे माहिती प्रसारण खातं भलतंच अॅक्टिव्ह झालं आहे. अदानींविरोधातल्या बातम्या हटवण्यासाठी या खात्याने दाखवलेल्या उतावीळपणाला सर्वोच्च न्यायालयाने लगाम घातल्याची घटना ताजीच आहे.

तर या प्रकरणात माहिती प्रसारण खात्याने १८ सप्टेंबरला टीव्ही नाईन, आज तक, एबीपी, टीव्ही एटीन, झी न्यूज इत्यादी वृत्तवाहिन्यांना नोटीस पाठवली आणि यावर काय पावलं उचलण्यात आली, हे १५ दिवसांत स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. तशरिफ रखिये, सैलाब सारखे शब्द ऊर्दू आहेत, ते हिंदी वाहिन्यांवर उच्चारू नयेत, असं श्रीवास्तव यांचं म्हणणं. खरं तर भाषेपेक्षा वृत्तवाहिन्यांचा पक्षपातीपणा आणि कर्कशतेविरोधात पुढाकार घेतला गेला असता, तर आधिक सयुक्तिक ठरलं असतं.

तिसरी घटना –

विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र विभागाने २० सप्टेंबरला सर्व मोठ्या गरबा मंडळांसाठी एक सूचनापत्र काढलं. त्यात म्हटलं होतं की गरब्यात हिंदूंव्यतिरिक्त अन्य धर्मीयांना सहभागी होऊ देऊ नये. मंडपात प्रवेश देतानाच आधार कार्ड तपासण्यात यावं. सहभागींना कपाळावर टिळा लावावा लागेल, हातात गंडा बांधावा लागेल. देवीची पूजाही करावी लागेल. विदर्भ महासचिव प्रशांत तितरे यांनी लोकांवर गोमूत्र शिंपडलं जाईल आणि बजरंगदल व विश्व हिंदू परिषदेचे सदस्य प्रवेशद्वारांवर तपासणी करतील, असं स्पष्ट केलं.

परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता राज नायर यांनी पीटीआयला सांगितलं की, गरबा काही केवळ नृत्य नाही. देवीला प्रसन्न करण्याची एक पद्धत आहे, त्यामुळे ज्यांची या अनुष्ठानांवर श्रद्धा आहे, त्यांनाच यात सहभागी करून घेणं योग्य ठरेल. लव्ह जिहाद होऊ नये म्हणून एवढी खबरदारी घ्यावीच लागेल.

अन्य धर्मियांवर लादलेली ही गरबाबंदी केवळ महाराष्ट्रपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. मध्य प्रदेशात भोजपाल गरबा उत्सव समितीनेही गैरहिंदूंना प्रवेश देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर वराहाची प्रतिमा लावणण्यात येईल. वराहाचा आशीर्वाद घेऊन, टिळा-गंडेदोरे बांधून घेतल्यानंतरच सनातनींना मंडपात प्रवेश दिला जाईल, असं या मंडळाने जाहीर केलं आहे. रतलाममध्ये गंगाजल शिंपडण्यात येईल, धोती कुर्ता घालून आरती करावी लागेल, असे स्पष्ट फलकच लावले आहेत.

या घटना प्रातिनिधिक आहेत. हल्ली असं काही ना काही रोजच घडत असतं. नवनव्या मिशिदींत देवळं शोधण्याचा अट्टहास असो, एखाद्या खासदाराला भर संसदेत अन्य खासदाराने धर्मवाचक अश्लाघ्य शिविगाळ करणं असो, दर सणावाराला एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्यदिनालाही मांसविक्रीवर बंदी घालण्याची मागणी होणं, कावड यात्रेवेळी फेरीवाले आणि दुकानदारांनी मालकाच्या नावाची पाटी लावावी, असा फतवा काढला जाणं, बीफ आहे की बफ याची खातरजमा न करता झुंडबळी घेणं, मंगलसूत्र चुरा लेंगे और उनको देंगे जिनके ज्यादा बच्चे होते है म्हणून घाबरवणं, वक्फवर मुस्लिमेतरांची वर्णी लावण्याचा आता न्यायालयाच्या आदेशामुळे फसलेला प्रयत्न, बुलडोझरचा न्याय, बटेंगे तो कटेंगे किंवा कपडे देख कर ही पहचान लेंगे सारखी वक्तव्य असोत… दिवसागणिक आपल्या सामाजिक समजुतदारपणाची लक्तरंच वेशीवर टांगली जात आहेत.

आपण मूळचेच असे आहोत का? केदारनाथ, ऋषिकेश, अजमेर शरिफ, हजरत निजामुद्दीन, हाजी अली, माहीमसारखे दर्गाह, माउंट मेरीचं चर्च, सुवर्णमंदिरासह देशभरातले विविध गुरुद्वारा, बोधगया, लडाखमधल्या मॉनेस्ट्री, शिर्डीचे साईबाबा अशा विविध ठिकाणी हा समजुतदारपणा ठसठशीत दिसत असे, आजही दिसतो.

वेदांतातल्या अद्वैताशी साम्य दर्शवणारं सुफी तत्त्वज्ञान आपल्याला भावलं, शीख धर्मीयांच्या एकमेकांना सांभाळून घेत पुढे जाण्याच्या, उच्च-नीच भेद न करता बंधुत्वभाव जपण्याच्या वृत्तीचं आपल्याला कौतुक वाटत आलं. आपण बोधगयेत बुद्धापुढे नतमस्तक होत आलो. लडाखच्या निर्मनुष्य पहाडांवरचे धीरोदात्त विहार पाहून स्तिमित झालो. गालिब, फैजपासून राहत इंदूरी, निदा फाजली, गुलजारांपर्यंत, नूर जहाँ, बेगम अख्तर यांच्यापासून रफी, गुलाम अलींपर्यंत अनेकांच्या शब्द-सुरांचे चाहते झालो.

ख्रिसमसचा प्लम केक, गुरुद्वारातला पिन्नी प्रशाद, नवरोजच्या सल्ली बोटी- पात्रानी मच्छीपासून इफ्तारीच्या बिर्यानी-फिरनीपर्यंत साऱ्याची चव आपल्या मनात नेहमीच रेंगाळत राहिली. सत्तेसाठीच्या साठमारीमुळे भोवताल बेचव होत असताना आपण मात्र हे शब्द, सूर, गंध, जायके लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला चौकटीत बसवण्याचा आक्रस्ताळा अट्टहास सुरू असताना त्या चौकटींतून बाहेर पडण्यासाठी किमान धडपडणं तरी महत्त्वाचं आहे.

राजकारण हा तत्त्वं, मूल्य, सुसंस्कृतता, विधिनिषेध, माणूसकी या साऱ्याला सोडचिठ्ठी देऊन केला जाणारा व्यवसाय आहे. मतांसाठी समाज कलुषित करण्याचे, धर्मांमधली दरी वाढवण्याचे प्रयत्न आजच सुरू झालेले नाहीत. तेव्हा शाह बानो होती, मग बिल्किस बानो आणि आज बानु मुश्ताक आहेत. लाटा आल्या गेल्या, त्यामुळे समाज विस्कटला असेल, पण विखुरलेला नक्कीच नाही, विखुरणारही नाही. कारण नेत्यांनी शहाणपण गमावलं तरी जनता ते सोडणार नाही.

विजया जांगळे | vijaya.jangle@expressindia.com