श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाच्या आधारे ‘सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे’ हा उपासनेचा पूर्वार्ध आपण पाहिला आणि ‘नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे’, या उत्तरार्धातला ‘नामात भगवंत आहे असे जाणावे’, इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. या चर्चेत आपण काय जाणलं? तर, आपण ‘सगुण’ आहोत, ‘साकार’ आहोत, त्यामुळे अध्यात्माची वाटचाल आकाराच्या आधाराशिवाय आपल्याला साधू शकत नाही. परमात्म्याचं सगुण, साकार रूप कल्पिलं तरी त्याची भक्ती ‘जिवंतपणा’च्या अस्सल जाणिवेसारखी होत नाही. त्या सगुण परमात्म्यावर परिपूर्ण प्रेम करणारी दुसरी व्यक्ती पाहिली, तिचा सहवास लाभला, तिच्याकडून प्रेरणा मिळाली, मार्गदर्शन मिळालं तरच उपास्यदेवतेतला अस्तित्वभाव दृढ होऊ शकतो. साधना गतिमान होऊ शकते. परमात्म्यावर परिपूर्ण प्रेम करणं केवळ सद्गुरूलाच साधतं. त्यामुळे त्यांची भेट व्हावी, म्हणून मी तळमळीने, मनापासून त्यांनाच हाक मारली पाहिजे. तो धावा अखंड होण्याचा सर्वात सोपा उपाय भगवंताचं नामस्मरण हाच आहे. माझ्या जीवनात प्रत्यक्ष प्रवेश करून माझ्या अंतरंगातील नामाला, अर्थात हाकेला सद्गुरू जेव्हा ‘ओ’ देतील तेव्हाच नामात भगवंत आहे, ही गोष्ट माझ्या अनुभवाचा भाग बनेल. जाणिवेत पक्की होईल. मग सगुण-साकार परमात्म्याची स्वबळावर भक्ती करण्यापेक्षा सगुण-साकार श्रीसद्गुरूची भक्ती, त्याचा सहवास, त्याचा बोध ऐकणं, मनातल्या शंकांचं त्याच्याकडून निरसन करून घेणं, त्यांच्या सांगण्यानुसार चालण्याचा प्रयत्न करणं; हे सोपं आहे, असं वाटेल. साकार सद्गुरू हा आपल्या आवाक्यातला, आपल्याला जाणण्यासारखा, आपल्या आकलनाच्या कक्षेत येण्यासारखा वाटेल. बोध, सहवास, सत्संग या मार्गानं त्याचं होऊन राहण्याची संधी मला लाभेल. त्यांचं होऊन राहता आलं तर नंतर त्यांच्याशिवाय जगण्याचं दुसरं ध्येय, दुसरा मार्ग, दुसरा हेतूही उरणार नाही. ही उपासनेची परमपूर्तता आहे. उपासनेचा हा क्रम श्रीमहाराजांनी अवघ्या दोन वाक्यांत सांगितला आहे, तरी उत्तरार्धातील ‘त्यांचं होऊन राहावं’, हे तीन शब्द म्हणजे एक अत्यंत दीर्घ आणि अत्यंत कठीण अशी तपस्यामय प्रक्रिया आहे. आपल्या या सदराच्या अखेरच्या टप्प्यात, पुढील दोन महिन्यांत आपण ‘त्यांचं होऊन राहायचं’ म्हणजे नेमकं काय असावं, याचाच मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण गोंदवल्याला जात असू, आपण श्रीमहाराजांना सद्गुरूस्थानी मानत असू तर त्यांचं होऊन राहावं, हे आपलं ध्येय असलंच पाहिजे. आपण जर त्यांचे असू तर जे त्यांना आवडतं ते आपल्यालाही आवडलं पाहिजे, जे त्यांना रुचत नाही ते आपल्यालाही रुचता कामा नये. जीवनात ज्या गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलं त्या गोष्टींना माझ्याही जगण्यात महत्त्व असलंच पाहिजे. आपल्या माणसानं जगात कसं जगावं, याबाबत त्यांचा जो काही बोध आहे तो माझ्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न मी निष्ठेने आणि नेटाने केला पाहिजे. त्यांचे असू तर ते ज्याचे आहेत, त्याचे आपणही झाले पाहिजे.