आपण औषध घेत आहोत पण ते पोटात जाऊ देत नाही. भजन, पूजन, नामस्मरण आपण करतो, पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. आता नामासाठी मुळातच आपलं मन सन्मुख नसतं. श्रीमहाराजही सांगतात, ‘‘लोक आधी नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत; आणि मनन करून ज्यांना पटले, ते पटले असूनही करीत नाहीत!’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. १३८). आता मनन करून पटलेल्यांच्या पायरीपासूनही आपण आज कित्येक योजने दूर आहोत. तेव्हा इतके आपण नामाला विन्मुख असताना ते नाम समजून घेण्याचा म्हणजे नाम मनापर्यंत पोहोचेल, असं घेण्याचा विचारही आपण करीत नाही. नाम मनापासून घेतलं पाहिजे, असं आपण ऐकतो. पण त्या नामात आपलं मन लागतच नाही, तर ते मनापासून कुठून होणार? त्यामुळे मन दुनियेच्या विचारात भरकटत असताना जे नाम बाहेरून कसंबसं सुरू असतं ते मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, हेच नामसाधनेच्या पहिल्या टप्प्यातलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आपण एखादं व्याख्यान ऐकत आहोत पण ते ऐकताना दुसऱ्याच गोष्टीबद्दल मनात विचारांची आवर्तनं सुरू असतील तर त्या व्याख्यानातले विचार मनापर्यंत पोहोचत नाहीत. मग अचानक लोकांचा हशा किंवा टाळ्या कानावर पडतात आणि आपण भानावर येतो. तसं नाम नुसतं बाहेरून सुरू आहे. बाहेरून म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियांच्या परिघाबाहेरून सुरू आहे. कोणत्याही वाटेनं ते आत शिरत नाही. तोंडानंही त्याचा नुसता उच्चार सुरू आहे. असं नाम घेणं म्हणजे औषध घेताक्षणी ते बाहेर ओकून टाकणंच! औषध पोटात गेलं नाही तर रोग कसा दूर होईल? तेव्हा जे नाम घेत आहोत ते मनापर्यंत पोहोचावं, त्याला आत शिरू द्यावं, यासाठी प्रथम प्रयत्न करायला पाहिजे. आता ते नाम मनापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग श्रीमहाराजांना अपेक्षित आहे तो आहे प्रेमाचा, श्रद्धेचा, निष्ठेचा. श्रीमहाराज सांगतात, ‘‘नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच ‘निष्ठेचे नाम’ असे म्हणतात. तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ७८). तर भगवंताची प्राप्ती नामानेच होईल, या खात्रीने होणारे नाम हेच मनापर्यंत पोहोचले पाहिजे किंवा तेच नाम पोहोचेल, असे श्रीमहाराजांना अभिप्रेत असावे. आज आपल्या मनापर्यंतही नाम पोहोचते पण ते वेगळ्याच रूपात! इतकं नाम घेतो पण अजून प्रपंच मनासारखा सुखाचा का होत नाही, या कुरतडणाऱ्या प्रश्नाच्या वाटेनं नामाची जाणीव मनाला होत असते! प्रपंचातल्या सर्व अडचणी मिटविणारी भगवंताची कृपा कधी एकदाची प्राप्त होते, या ओढीने मग नामाला प्रापंचिक चिंतेची झालर असलेल्या तळमळीचा किंचित स्पर्श होतो. अशा अवस्थेतही जर नाम चिकाटीनं घेतलं तरी ते काम करू लागतं! हेच नाम आपल्यात पूर्ण पालट घडवतं, हेच नाम खऱ्या एकांताचा, खऱ्या मौनाचा अनुभव देतं, हेच नाम सर्व तऱ्हेच्या अशाश्वतापासून सोडवतं. त्या विश्वासानं आपण समजून नाम घेतो का?
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2013 रोजी प्रकाशित
२२१. नामनिष्ठा
आपण औषध घेत आहोत पण ते पोटात जाऊ देत नाही. भजन, पूजन, नामस्मरण आपण करतो, पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही
First published on: 13-11-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 221 spiritual faith