बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी (शनिवार, २० डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आपले सासरे बापूसाहेब देशपांडे यांना सूचकपणे आपल्या मृत्यूचा संकेत दिला, पण त्यांना तो समजलाही नाही! महाराज म्हणाले, ‘‘बापू, आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे!’’ आपल्या मुलीच्या मृत्यूचा हा संकेत असल्याचे वाटून घाबरून सासरे बोलून गेले, ‘‘महाराज! माझी मुलगी लहान आहे!’’ महाराज चटकन म्हणाले, ‘‘बरे तर, राम तुमच्या मनाप्रमाणे करील.’’ आपल्या मुलीचा मृत्युयोग टळला, या भावनेनं सासरेबुवा निश्चिंत झाले असावेत. खरं तर श्रीमहाराजांचा असामान्यपणा  गेल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या पहिल्या भेटीपासूनच सासरेबुवांना उमगला होता. श्रीमहाराजांच्या प्रथम पत्नी सरस्वती यांचा १८७९च्या आसपास मृत्यू झाला. पुढे वडील रावजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आई गीताबाई यांनी महाराजांना दुसरा विवाह करण्याचा आग्रह केला. महाराज तेव्हा तिशी पार केलेले होते. ते म्हणाले, ‘‘लग्नाबाबत मी तुझं ऐकेन पण एका अटीवर. मुलगी मी पसंत करीन!’’ आईनंही आनंदानं कबुली दिली. नंतर महाराज गोंदवल्यापासून बऱ्याच कोसांवर असलेल्या आटपाडी गावी, बापूसाहेबांच्या घरी आले. बापूसाहेबांचं घर तसं सुखवस्तू होतं, पण त्यांना पाच-सहा मुलीच होत्या. महाराज त्यांच्याकडे गेले व लग्नाच्या मुली दाखवा, असं म्हणाले. महाराजांच्या घरी शेतीभाती भरपूर होती, कुळकर्णी म्हणूनही ते काम करीत होते. गोंदवले परिसरात अनेक जण त्यांचा सल्ला घेत. त्यामुळे महाराजांच्या परिचयाचं कुणीतरी लग्नाचं असावं, असं वाटून देशपांडे यांनी आनंदानं आपल्या मुलींना बाहेर बोलावलं. महाराज म्हणाले, ‘‘बापूसाहेब, तुमची अजून एक मुलगी आहे..’’ देशपांडे आश्चर्यानं म्हणाले, ‘‘हो पण ती जन्मापासून आंधळी आहे. तिच्याशी कोण लग्न करणार?’’ महाराज म्हणाले, ‘‘मी करणार आहे! फक्त मी पडलो गोसावी. तुम्ही विचार करून निर्णय घ्या.’’ देशपांडे यांनी आनंदानं होकार दिला. महाराजही घरी परतले आणि आईला लग्न ठरल्याचं सांगितलं. पुढे मुहूर्ताच्या दिवशी एकटेच आटपाडीला जाऊन यमुनाबाईंशी विवाह करून घरी आले. आई मोठय़ा उत्साहानं समोर आली तेव्हा महाराज म्हणाले, ‘‘आई, अशा मुलीशी मी लग्न केलं आहे की ही तुझी सून कधी डोळा वर करून तुझ्याकडे पाहणार नाही!’’ या यमुनाबाईंना आईसाहेब म्हणून ओळखतात. अखंड नामानं अध्यात्मातही त्यांनी फार मोठी प्रगती केली होती. त्यांच्या सात्त्विक मुखावर आगळं तेज असे. तर अशा आपल्या या जगावेगळ्या जावयाच्या सांगण्याचा खरा रोख बापूसाहेबांना कळला नाही. रात्री महाराज मंदिरात निरूपणास उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा आणि एकाच पायावर उभे राहावे. त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभे राहावे, याप्रमाणे रात्री दीड वाजेपर्यंत त्यांनी देहाचा अशाश्वतपणा, भगवंताची निष्ठा, सगुण भक्ती, संतांच्या संगतीचं महत्त्व याबद्दल निरुपण केलं.