अशाश्वत अशा ‘मी’पणाचं कीर्तन सोडून, शाश्वत अशा परमात्म्याचं चिंतन, मनन, स्मरण, कीर्तन जेव्हा सुरू होतं तेव्हा त्या चिंतन, मनन, स्मरण, किर्तनानं साधकाला जे सुख लाभतं, जी तृप्ती लाभते तिनं परमात्मारूपी सद्गुरू सुखावतो. अशाश्वत अशा, नश्वर अशा गोष्टींनी मात्र मी जेव्हा ‘सुखी’ होतो आणि त्या गोष्टींत आसक्त होतो तेव्हा तो परमात्मारूपी सद्गुरू उदास होतो. ते ‘मी’पणाचं कीर्तन ओसरलं आणि खरं संकीर्तन सुरू झालं की सद्गुरू आनंदी होतात. मग ‘वैकुंठीचा राव’ अर्थात साधनेआड येणाऱ्या विघ्नांचा संहार करीत ते साधकासोबत सदोदित चालू लागतात. मग? त्रलोक्यभ्रमण करीत नारद। त्यासवें गोविंद फिरतसे।। साधक तीन लोकांत भ्रमण करू लागतो तेव्हा ‘गोविंद’ही त्याच्याबरोबर असतोच. आता हे त्रलोक अर्थात तीन लोक म्हणजे काय? हरिपाठाचा वेध घेणाऱ्या ‘अनादि अनंत’ या सदरात आपण या तीन लोक शब्दाचा गूढार्थभेद पाहिला होता. हरिपाठाच्या १०व्या अभंगात माऊली म्हणतात- ‘पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक। नामें तिन्ही लोक उद्धरती।।’ इथेही नारदमुनींचा संबंध आलाच! जंगलात वाटसरूंना अडवून, प्रसंगी त्यांचा प्राण घेऊन वाल्या त्यांना लुटत असे. या वाल्याला आपल्या मार्गावर आणण्यासाठी नारदमुनी जाणीवपूर्वक एकदा त्याच्या मार्गात आले! नारदमुनींच्या बोधाने वाल्यात पालटाची सुरुवात झाली. तोवर जगण्याची जी रीत होती, त्याबद्दल तो प्रथमच जागा झाला. नारदांनी त्याला एक नाम दिलं. त्या नामानं वाल्याचं वाल्मीकीत रुपांतर झालं. नामानं माझ्यासारखा अत्यंत पापी माणूस उद्धरू शकतो तर कुणी का नाही उद्धरणार, असे वाल्मिकींनी सांगितले. पुराणांतरी प्रसिद्ध असलेल्या या कथांमध्ये वाल्मिकी ऋषीच सांगतात की नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. हे तीन लोक म्हणजे सत्त्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी! मग, ‘त्रलोक्यभ्रमण करीत नारद। ’ म्हणजे काय? हरिकीर्तनात साधक आत्मतृप्तीचं सुख अनुभवू लागला तरी त्याचा बाह्य़ जगातला वावर सुटत नाही. प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि देहधारणासाठी आवश्यक व्यवहारात त्याला वावरावंच लागतं. हे जग त्रिगुणमिश्रित आहे. प्रत्येक जीवमात्रात सत्, रज आणि तम हे तीन गुण आहेतच, पण प्रत्येकात यातला एक गुण प्रबळ असतो आणि त्यानुसार तो माणूस सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी म्हणून ओळखला जातो. व्यवहारात वावरताना साधकाचा या तीन गुणांच्या माणसांशी संबंध अटळ असतो. सत्त्वगुणी माणसाबरोबरच्या व्यवहारात त्याला आनंद वाटतो पण तमोगुणी आणि रजोगुणी माणसाबरोबरच्या व्यवहारात एक धोका असतो. तो असा की साधकाच्या वृत्तीवरही त्या गुणांचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे जगात वावरताना, जगातले व्यवहार पार पाडताना साधकाची वृत्ती कुठे गुंतू नये, यासाठी तो ‘गोविंद’ म्हणजे गुंता सोडवून आपल्यातच गोवून घेणारा परमात्मा सदोदित साधकाच्या बरोबर असतो. मग तुकोबा म्हणतात- नारदमंजुळ सुस्वरे गीत गाय। मार्गी चालताहे संगे हरी।। तुका म्हणे त्याला गोडी किर्तनाची। नाही आणिकांची प्रीती ऐसी।।’
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
१२६. त्रलोक्यभ्रमण
अशाश्वत अशा ‘मी’पणाचं कीर्तन सोडून, शाश्वत अशा परमात्म्याचं चिंतन, मनन, स्मरण, कीर्तन जेव्हा सुरू होतं तेव्हा त्या चिंतन, मनन, स्मरण, किर्तनानं साधकाला जे सुख लाभतं, जी तृप्ती लाभते तिनं परमात्मारूपी सद्गुरू सुखावतो. अशाश्वत अशा, नश्वर अशा गोष्टींनी मात्र मी जेव्हा ‘सुखी’ होतो आणि त्या गोष्टींत आसक्त होतो तेव्हा तो परमात्मारूपी सद्गुरू उदास होतो.
First published on: 27-06-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan contemplation of god