‘गो’ म्हणजे गाय. त्याचा दुसरा अर्थ आहे इच्छा. जो डोळे मिटून सर्व भार भगवंतावर टाकतो, त्याच्या इच्छा भगवंतच पूर्ण करतो म्हणून ‘आंधळ्याच्या गायीं देव राखतो’ म्हणतात ना? गो+वर्धन म्हणजे इच्छांचं वर्धन, वाढ. प्रपंच कसा आहे? क्षणोक्षणी इच्छा आणि त्यांच्या पूर्तीसाठी कृती, यांनी तो भरला आहे. त्यात सदोदित इच्छांची भर पडत त्यांचा पर्वतच झाला आहे जणू. सद्गुरू जीवनात येईपर्यंत जीव इंद्रियजन्य सुखांच्याच धडपडीत, इंद्रियपूजेतच रत होता. सद्गुरूंनी त्या इंद्रियांची पूजा थांबवली आणि प्रपंचात परमार्थाचं बीज रोवलं. नुसता प्रपंच नको, परमार्थयुक्त प्रपंचातच राहा, असं सांगितलं. प्रपंच म्हणजे इच्छांच्या डोंगरात ‘परमार्था’ची एक इच्छा त्यांनी मिसळून दिली. ती इच्छा अशी असते जी हळुहळू इतर इच्छा शोषून घेऊ लागते. त्यामुळे आपली आराधना थांबणार, हे लक्षात येताच इंद्रियं खवळली. प्रारब्धाची वादळवृष्टी सुरू झाली. जीव गांगरून गेला. सद्गुरू म्हणाले, काही चिंता करू नकोस. तुझ्या प्रपंचाचा भार मी तोलतो, तू स्वस्थ हो. स्वस्थ राहा म्हणजे स्वस्वरूपाच्या जाणिवेत (स्व) स्थिर हो (स्थ). स्वरूपाचं, मी खरा कोण आहे याचं भान बाळगून जगायला त्यांनी शिकवलं. मी खरा कोण आहे? सर्व तत्त्वज्ञान बाजूला ठेवा, पण आपण ‘माणूस’ आहोत इतपत तरी सांगता येईलच ना? मग ‘माणूस’ असून मी माणसासारखा वागतो का? तेव्हा मी माणूस आहे, याची जाणीव ठेवून वागणं हेसुद्धा स्वस्थ होण्याचीच सुरुवात आहे. प्रपंचाचा भार म्हणजे काय? खरं पाहाता प्रपंच हा होतच असतो. तो ‘करावा’ लागत नाही. त्यात ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यात प्रत्यक्ष कृतीचा भाग फार थोडा असतो पण त्या कृतीच्या विचाराचा, कल्पनेचा, चिंतेचा, काळजीचा, स्वप्नाचा भाग फार मोठा असतो. तोच खरा ‘भार’ असतो. कालची आणि उद्याची चिंता सद्गुरूंवर सोपवून आज आवश्यक तो व्यवहार करीत असताना त्यांच्या बोधानुरूप जगणं म्हणजे खरं ‘स्वस्थ’ होणं आहे. आता हे एकदा सांगून भागत नाही. त्यांनी सर्व भार घेतला आहे, यावर आपला विश्वास नसतोच. त्यामुळे आपणही कल्पनेच्या, काळजीच्या, चिंतेच्या काठय़ा लावून प्रपंचाचा ‘गोवर्धन’ सांभाळू पाहातो. अखेर त्यानं आपलेच ‘हात दुखू लागतात’ म्हणजे कर्तृत्वशक्ती म्हणजे क्षीण होऊ लागते. त्या दमछाकीमुळे हळुहळू तो ‘भार’ आपण त्यांच्यावर सोपवू लागतो. एवढय़ानंही भागत नाही. असा ‘स्वस्थ’ साधक कधी ‘अस्वस्थ’ होईल आणि त्याच्या मनाचे खेळ सुरू होतील, याचा भरवसा नसतो. म्हणून त्याला सत्संगात ठेवावं लागतं. आपल्या बोधाची बासरी सद्गुरू वाजवू लागतात आणि त्या लयीत साधक तल्लीन होतो. बाहेरच्या वादळवाऱ्याचं भानही उरत नाही. अखेर इंद्र म्हणजे इंद्रियं हार मानतात. वादळवृष्टी थांबते. तेव्हा जो सद्गुरूंच्या बोधानुरूप जगू लागेल त्याला भय कशाचं उरणार? शाश्वताच्या स्मरणात आणि शाश्वताच्या संगात जो बुडाला आहे त्याला अशाश्वताचं भय काय भिववणार?
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2013 रोजी प्रकाशित
१२९. गोवर्धन
‘गो’ म्हणजे गाय. त्याचा दुसरा अर्थ आहे इच्छा. जो डोळे मिटून सर्व भार भगवंतावर टाकतो, त्याच्या इच्छा भगवंतच पूर्ण करतो म्हणून ‘आंधळ्याच्या गायीं देव राखतो’ म्हणतात ना? गो+वर्धन म्हणजे इच्छांचं वर्धन, वाढ. प्रपंच कसा आहे? क्षणोक्षणी इच्छा आणि त्यांच्या पूर्तीसाठी कृती, यांनी तो भरला आहे. त्यात सदोदित इच्छांची भर पडत त्यांचा पर्वतच झाला आहे जणू.
First published on: 02-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan desire enhancement