आपण नाम घेतो म्हणजे काय करतो? तर इष्टदेवतेच्या नाममंत्राचा जप करतो आणि त्या नामात स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. थोडं आणखी खोलात जाऊ. ‘नामातच मी आहे’, असं श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात. आधी त्याचा अर्थ कळत नसे. मग जाणवलं, स्थूलार्थानंही आणि सूक्ष्मार्थानंही ते नामात आहेतच. स्थूलार्थानं कसे आहेत? तर आपणच आपल्या नामजपाच्या वेळी काय होतं, आठवून पहा. मंत्र रामाचा सुरू असतो, पण मनात आठवण श्रीमहाराजांचीच येत असते! आपण जणू गोंदवल्यातच आहोत, महाराजांच्या खोलीत त्यांच्यासमोर बसून जप करीत आहोत, अशीही भावना होत असते. सूक्ष्मार्थानं श्रीमहाराज त्यात कसे आहेत, हा ज्यानंत्यानं घ्यायचा एक आनंदानं भरलेला शोध आहे. शास्त्रानुसार सांगायचं तर तो श्रेष्ठ सत्संग आहे. सत्संग चार प्रकारचा असतो. श्रीमहाराजांचा थेट सहवास, हा पहिला सत्संग झाला. श्रीमहाराज देहात असताना जे त्यांच्याजवळ नुसते पडून होते, त्यांना हा सत्संग मिळत होता. असा सत्संग किती अनमोल आहे, याची जाणीव मात्र फार थोडय़ांना असते. तरी त्याचा परिणाम होतोच होतो. समजा एखाद्याला स्वच्छतेची अत्यंत आवड आहे. त्याच्या दृष्टीस एखादं जळमट जरी पडलं तरी ते काढून टाकल्याशिवाय तो राहात नाही. सद्गुरू तसे असतात. जो नजरेस पडला त्याच्यावर कृपा केल्याशिवाय ते रहात नाहीत. ही कृपा दृश्यातली नसतेच. ते त्याचं अंतरंग सुधारायची प्रक्रिया सुरू करून देतात. महाराज जेव्हा कर्नाटकात गेले तेव्हा दिवसा रस्त्यावरून ते जात असताना ब्रह्मानंदमहाराज मशाली जाळून त्यांच्या पुढून जाऊ लागले. का? तर दिवसाढवळ्या मशाली कोण जाळतंय, हे पाहण्यासाठी तरी लोक रस्त्यावर येतील आणि महाराजांची दिव्यदृष्टी त्यांच्यावर पडून त्यांचं जन्माचं कल्याण होईल! तर प्रत्यक्ष सहवास, मग तो असा क्षणमात्र असो की अनेक दिवसांचा असो, तो पहिला सत्संग आहे. बरं, हा सत्संग जितका सोपा तितकाच कठीण आहे. त्यांच्याजवळ मला राहवतं थोडंच? आग आणि लोणी, असा संग आहे तो. मला प्रपंचाची आवड तर त्यांना रामाची आवड. तेव्हा हा सत्संग माझ्या बाजूनंच अखंड साधत नाही. दुसरा सत्संग आहे, त्यांच्या ग्रंथाचं वाचन. सद्ग्रंथाच्या वाचनानंही मन त्याच विषयाच्या चिंतनात रहातं आणि म्हणून हा सत्संगही मोलाचा आहे. अर्थात त्यालाही मर्यादा आहे. कारण माणूस किती वाचणार आणि त्यातलं किती लक्षात ठेवणार? तरी वाचन, मनन, चिंतन सुरू आहे तोवर हा सत्संग टिकतोच. महाराजांच्या आठवणीत रहाणं, हा सत्संगाचा तिसरा प्रकार आहे. थोडक्यात महाराजांवर प्रेम करणाऱ्या माणसांशी भेट होणं आणि त्यातून त्यांचाच विषय, त्यांच्याच आठवणी निघणं. या सत्संगालाही काळ-वेळ, परिस्थितीच्या मर्यादा आहेत. चौथा जो सत्संग आहे तो अगदी प्रत्यक्ष सहवासाइतकाच लाभ देणारा आहे, तो सत्संग आहे नामाचा! गोंदवल्याला जाऊन श्रीमहाराजांजवळ राहून जो लाभ मिळतो, तोच त्यांचं नाम घेतानाही मिळतो. नाम म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष सहवासच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2013 रोजी प्रकाशित
२३९. नामसंग
आपण नाम घेतो म्हणजे काय करतो? तर इष्टदेवतेच्या नाममंत्राचा जप करतो आणि त्या नामात स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. थोडं आणखी खोलात
First published on: 09-12-2013 at 01:18 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan name of god