तारक काटे

भारतात विसाव्या शतकामध्ये मांडल्या गेलेल्या आणि आजही ज्यांचा संदर्भ अपरिहार्य ठरतो अशा चार विचारधारांचा वेध घेणाऱ्या ‘चतु:सूत्रा’तील हे सूत्र ‘गांधीवादा’चे. हा परिचयलेख गांधीचरित्राकडे झुकणारा असला तरी, आजच्या संदर्भात ‘गांधीवादी’ ठरणाऱ्या प्रयोगांचा परामर्श पुढील लेखांत घेतला जाईल..

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

महात्मा गांधींच्या हत्येला या जानेवारी महिन्यात ७४ वर्षे पूर्ण होतील. या प्रदीर्घ काळातील वेगवेगळय़ा कालखंडांत जगभरच्या सुज्ञ, विचारी आणि सुजाण नागरिकांच्या मनात गांधीचे आणि त्यांच्या विचारांचे गारूड कायम राहिले आहे. गांधींच्या काळातील नामवंत चिंतक, लेखक, तत्त्वज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींवर जसा त्यांचा प्रभाव होता तसा तो इतरही काळात राहिला. सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट १९८२ साली जेव्हा जगभर प्रदर्शित झाला तेव्हा त्या काळातील तरुण पिढीला गांधींचे जीवितकार्य नव्याने समजून घेता आले. माझ्या एका सहकाऱ्याची शास्त्रज्ञ बहीण गेल्या वर्षी बर्लिनला वास्तव्याला होती. त्या काळात तिने नव्याने मैत्री झालेल्या जर्मन मुलीला तिचे हिटलरबद्दलचे मत विचारले. हिटलरने नाझीवादाच्या आडून केलेल्या ज्यूंच्या नरसंहारामुळे जर्मन लोकांची मान जगात खाली गेली असा त्या लोकांचा समज असल्यामुळे जर्मनांना असा प्रश्न आवडत नाही. त्यामुळे या प्रश्नावर ती मैत्रीण म्हणाली, ‘‘आम्ही दुर्दैवी की आमच्याकडे हिटलर निपजला आणि त्याने जे केले ते आम्हा सगळय़ांना अपमानास्पद आहे, परंतु तुम्हा भारतीयांचे सुदैव की त्याच काळात तुमच्याकडे जनतेला योग्य  मार्ग दाखवायला गांधी होते. आता तुम्ही त्यांचे काय करता हा तुमचा प्रश्न आहे.’’

या पार्श्वभूमीवर आपण गांधींचे काय करतो हा प्रश्न आज आपणा सगळय़ांना विचार करायला लावणाराच आहे.

गांधींचा हा सार्वकालिक प्रभाव टिकून राहण्यातील वैशिष्टय़  आहे ते गांधींच्या व्यक्तिमत्त्वात आणि त्यांच्या विचारात. सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे नेणारा गांधींचा जीवनप्रवास हा अतिशय सजगतेने स्वत:ला घडवत राहण्याचा आहे. स्वत:चे अनुभव आणि प्रयोगशीलता यातून शिकत राहून गांधी स्वत:ला सतत बदलत राहिले; कटाक्षाने आपल्यातील दोष शोधून त्यावर कठोरपणे मात करीत राहिले. गांधी लिहितात की, त्यांच्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यात कस्तुरबांची फार मदत झाली. त्यांच्यामुळे त्यांना संयम शिकता आला आणि दुसऱ्यावर प्रेम कसे करावे हेही. त्यामुळे  अत्यंत प्रक्षुब्ध परिस्थितीतही शांत राहण्याची, धीर न सोडण्याची क्षमता प्राप्त करता आली. त्यामुळेच विरोधक शत्रुत्वाने वागले तरी मनात कोणतेही किल्मिष न ठेवता ते त्यांच्याशी सदैव संवादाची तयारी ठेवू शकले. सत्य, अहिंसा, प्रेम, त्याग, सेवाभाव आणि नैतिकता ही त्यांची जीवनमूल्ये होती. ईश्वरावर त्यांची श्रद्धा होती, पण ‘सत्याचा शोध म्हणजेच ईश्वराचा शोध’ ही त्यांची धारणा होती.

त्यांच्या सार्वजनिक आयुष्याला खरी चालना मिळाली त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्यातून. वकिली व्यवसाय सचोटीने करणारी व्यक्ती म्हणून जरी ते तेथील हिंदूी बांधवांमध्ये नावारूपाला येऊ लागले होते तरी त्यांचे आयुष्य ढवळून काढणारा क्षण होता तो दरबान ते प्रिटोरियादरम्यान रेल्वेच्या पहिल्या वर्गात प्रवास करताना पीटरमारीट्झबर्ग स्टेशनवर डब्यातील गोऱ्या माणसाने ‘तू श्वेतवंशीय नसल्यामुळे या पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करण्यास धजलासच कसा’ असे म्हणून खाली ढकलून देण्याचा. वयाच्या चोविसाव्या वर्षी अनुभवलेला हा क्षण वंशवादाचा खरा चटका भोगण्याचा आणि विलक्षण अपमानाचा तर होताच, पण एका नव्या दृढनिश्चयाचादेखील होता. या घटनेने त्यांचे पुढील सारे आयुष्यच केवळ बदलून गेले नाही तर ती त्यांच्या चैतन्यमय सामाजिक जीवनाची नवी सुरुवातही ठरली. या घटनेचे फलित म्हणजे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत तेथील जनतेवर होत असलेल्या गोऱ्यांच्या वंशवादावर आधारित अन्याय्य वागणुकीविरोधात स्थानिकांच्या मदतीने मोठय़ा निर्भयतेने उभारलेले लढे आणि त्यासाठी अहिंसेवर आधारित सविनय कायदेभंग आणि सत्याग्रह या नव्या पर्यायी आयुधांचा शोध व वापर. नि:शस्त्र असलेल्यांनी िहसक शासकांविरुद्ध ताकदीने उभारलेल्या या लढय़ाचे नेतृत्वच त्यांना मोहनदासकडून महात्मापदाकडे घेऊन गेले. याच काळात ते सॉक्रेटिस, रस्किन आणि टॉलस्टॉय या तत्त्वज्ञांच्या वैचारिक प्रभावाखाली आले. त्यांच्या राहणीमानात आणि जीवनदृष्टीमध्ये विलक्षण बदल झाला. त्याला अनुसरूनच गांधींनी फिनिक्स येथे टॉलस्टॉय आश्रम स्थापून साधेपणाने आणि आपल्या गरजा किमान पातळीवर ठेवून सामूहिक पद्धतीने कसे जगावे याचा वस्तुपाठ गिरविला.

१९१५ मध्ये गांधी भारतात कायमचे परतल्यानंतर त्यांचे राजकीय गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सूचनेवरून गांधींनी देशभर भ्रमण करून देशातील गरिबी व शेतकऱ्यांच्या हलाखीचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा येथील अथांग गरिबी आणि सामान्यजनांची दुरवस्था त्यांच्या संवेदनशील मनाला भिडून गेली. या भ्रमणात देशातील दारिद्य्राचे जे भीषण दर्शन झाले त्यामुळेच अंत्योदय हा त्यांच्या सामाजिक कार्याचा प्राधान्यक्रम राहिला. १९१५ ते १९२० या दरम्यान  ते भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होत राहिले तरी त्यांची रुची अहिंसात्मक जनचळवळीतच राहिली. काँग्रेसची सूत्रे लोकमान्य टिळकांच्या हाती आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ ही लोकचळवळ बनविली. लोकमान्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेतृत्व गांधींच्या हाती आले आणि टिळकांनी जागविलेल्या जनक्षोभाचे रूपांतर व्यापक सत्याग्रहात करण्याचा गांधींनी प्रयत्न केला. टिळक आणि गांधी या दोघांचीही भूमिका सामान्यातले असामान्यत्व जागृत करूनच स्वराज्य मिळेल अशीच राहिली आहे.

१९२० ते १९४६ असा खूप मोठा काळ गांधींच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्यावरील जनसामान्यांच्या विश्वासाचा राहिला आहे. या काळात जनतेने गांधींना अपार प्रेम दिले तर गांधींनी त्यांना दिला इंग्रजांच्या अत्यंत जुलमी आणि निष्ठुर सत्तेविरुद्ध लढण्यासाठी निर्भयतेचा वसा आणि त्यासोबतच या अफाट देशातील खेडय़ापाडय़ांत पसरलेल्या जनतेला सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास दिला.

गांधीजींच्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढय़ाचा आणि त्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या राजकारणाचा आढावा घेण्याचा या लिखाणाचा हेतू नाही, तर समाजभानाच्या संदर्भातील त्यांच्या विचारांचा परामर्श घेण्याचा आहे.

गांधींनी १९०९ मध्ये लिहिलेल्या ‘हिंदू स्वराज’ पुस्तिकेत पाश्चिमात्य संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातून येणारा चंगळवाद याला विरोध केला आहे. आपल्या आताच्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या आगगाडी, डॉक्टर, वकील यांसारख्या घटकांबाबतही त्यांनी गेल्या शतकाच्या त्या पहिल्या दशकाअखेरीस, निषेध नोंदविला आहे. यातील काही भाग काळाच्या ओघात स्वीकारणे शक्य नाही. गांधींची ग्रामस्वावलंबन आणि ग्रामस्वराज्याची कल्पना त्यांचे राजकीय उत्तराधिकारी असलेल्या नेहरूंनाही मानवली नाही. परंतु स्वातंत्र्यानंतर स्वीकारण्यात आलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेनंतर आणि नव्वदच्या दशकात अमलात आलेल्या ‘खाउजा’ (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणानंतर आपण आता कुठे आहोत? आपल्या देशातील गरिबी, सर्वसामान्य जनतेसाठी चांगले शिक्षण व आरोग्यसोयी, रोजगार यांसारख्या प्रश्नांना आपण उत्तरे शोधू शकलो का?

उलट या मोठय़ा कालखंडात देशातील या प्रश्नांनी आता आणखी विक्राळ रूप धारण केले आहे, देशातील सामाजिक व आर्थिक दरी खूपच वाढली आहे. यासोबतच नैसर्गिक संसाधनांचे शोषण, पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांनीदेखील आपण ग्रस्त आहोत. शेतीची आणि शेतकऱ्यांची दुरवस्था तर अधिकच वाढली आहे. त्यामुळे दरिद्रीनारायणाची चिंता करणाऱ्या गांधींच्या विचारांकडेच पुन्हा यावे लागते. याचा अर्थ काळ मागे नेण्याचा नसून आजच्या संदर्भात उत्तरे शोधण्याचा आहे. गांधींचा विरोध हा सरसकट तंत्रज्ञानाला नव्हता तर माणूस हा तंत्रज्ञानाचा गुलाम होण्याला होता; माणसाचे निष्कारणचे कष्ट कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाला त्यांची ना नव्हती. निसर्गाला ओरबाडून नव्हे तर त्याला समृद्ध करून लोकांचा सामुदायिक परिश्रमाने विकास व्हावा ही त्यांची धारणा होती. माणसाचे शिक्षण केवळ पुस्तकी नको तर ते जगण्याला बळ देणारे आणि निसर्ग आणि मानव यातील अनुबंध शोधणारे असावे असे त्यांचे प्रतिपादन होते. गांधींच्या या विचारांच्या प्रकाशात आपल्याला नवा मार्ग शोधता येईल का हा आपला यापुढे प्रयत्न असायला हवा.

आपल्या देशातील आणि देशाबाहेरील अशा काही प्रयोगांचा मागोवा घेणे हा या  लेखमालेचा हेतू आहे.

लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या  विषयांचे अभ्यासक आहेत.

vernal.tarak@gmail.com