९१. जाण

माझ्या जीवनातील सर्वच गोष्टी प्रारब्धानुसार वा ईश्वरी इच्छेनुसार होत असतील तर अनुचित र्कम माझ्याकडून होणं, हेदेखील प्रारब्धच का मानू नये,

माझ्या जीवनातील सर्वच गोष्टी प्रारब्धानुसार वा ईश्वरी इच्छेनुसार होत असतील तर अनुचित र्कम माझ्याकडून होणं, हेदेखील प्रारब्धच का मानू नये, असा सहज भासणारा धूर्त सवाल आपल्या मनात येतो. त्यातही मेख अशी की, अनुचित र्कम हातून होणं हे प्रारब्ध असेल तर त्याचं फळही प्रारब्धात असेलच ना? आपल्याला मात्र वाईट वागूनही फळ चांगलंच हवं असतं! इथे प्रारब्धाचा सिद्धान्त आणि त्यातदेखील माणसाला मिळालेलं स्वातंत्र्य, याचा थोडा विचार करू. जीवनातला एकही क्षण कर्माशिवाय सरत नाही. कर्म झालं की त्याचा संस्कारही अटळ. त्यायोगे प्रारब्धही अटळ. मग कर्म बंधनात पाडणारं नाही का? डॉ. राधाकृष्णन् यांच्या ‘अ‍ॅन आयडियालिस्ट व्ह्य़ू ऑफ लाइफ’ या ग्रंथाचा हवाला देत ग. वि. तुळपुळे ‘डोळस नामसाधन अर्थात् आत्मानंदाचा शोध’ (प्रकाशक- राजीव रजन लाड ट्रस्ट, मुंबई) या ग्रंथात म्हणतात की, ‘‘कर्माचा नियम हा बंधक नसून मोचक आहे. मागील कर्माने आपण बांधलेलो आहोत, त्यामुळे आपल्या स्वातंत्र्याला काही मर्यादा पडल्या. परंतु पुढे कोणते कर्म करावयाचे हे स्वातंत्र्य मनुष्य-मात्राला आहे आणि योग्य कर्माची निवड करून ते केले म्हणजे त्याला मुक्त होता येईल. हाच विचार डॉ. राधाकृष्णन् यांनी मांडला आहे. ते म्हणतात- आत्म्याच्या कायद्याने वागणे म्हणजे मुक्ती, त्याच्या उलट वागणे हा बंध!’’ (पृ. २९९). तेव्हा मागील कर्मानुसार आजच्या जीवनाची चौकट ठरली असली तरी या चौकटीतही माणसाला कर्मस्वातंत्र्य आहे. अनुचित कर्मानी माणूस बंधनातच अडकतो आणि उचित कर्मानी तो गुंत्यातून मुक्त होतो. म्हणून अनुचित कर्म टाळण्याचं आणि उचित कर्म करण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. मग कोणतं कर्म उचित आणि कोणतं अनुचित? ते कसं ठरवायचं? डॉ. राधाकृष्णन् यांच्या सूत्रानुसार, मुक्तीकडे नेणारं, बंधनापासून सोडवणारं उचित कर्म कोणतं, याची निवड आत्मशक्ती, आत्मप्रेरणा कायम सुचवीत असते! तुळपुळे लिहितात, ‘‘मनुष्याला बुद्धी आहे, क्रियाशक्ती आहे, अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची शक्ती आहे. म्हणूनच त्याला आत्म्याच्या इच्छेप्रमाणे वागणे शक्य आहे. तो तसे न करील तर त्याच्या परिणामाला तोच जबाबदार राहील. मूळचे ईश्वरत्व मिळवणे, हे शेवटी त्याच्या प्रयत्नाने होणार आहे. ते मिळविण्याचे स्वातंत्र्य व शक्ती ईश्वराने दिली आहे, पण ते (मूळचे ईश्वरत्व) आयते हातात दिलेले नाही, दिले जाणार नाही. मनुष्यप्रयत्न श्रेष्ठ आहे. त्याची दिशा ठरवून तो कटाक्षाने केला पाहिजे. या सर्व विचारांत संतांचे जगावर किती उपकार आहेत! आत्म्याच्या कायद्याने कसे वागावे, हे त्यांच्याशिवाय कोण सांगणार? मनुष्याला ते अन्य कोणत्याही मार्गाने कळणे शक्य नाही’’ (पृ.३००). इथे श्रीसद्गुरूआधाराच्या मोलासंबंधातील एक फार व्यापक रहस्य काका तुळपुळे सांगून जातात. बुद्धी आणि क्रियाशक्ती आहे, पण तिचा वापर कसा आणि कशासाठी करावा, ही जाणच महत्त्वाची. ती नसेल तर अनुचित कर्मानीच जीवन भरून जाईल. ही मुक्तीदायक जाण सद्गुरूकृपेशिवाय शक्य नाही, हे वास्तवच काका तुळपुळे सूचित करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cognition

ताज्या बातम्या