scorecardresearch

चिंतनधारा: आत्मस्थितीच्या सुधारणेचा मार्ग

सर्व माणसे सारखीच असताना त्यांच्या आत्मस्थितीत भेद पहायला मिळतो, तो का? याचे विवेचन करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात विश्वाची काळजी वहाता यावी एवढी शक्ती कशी मिळवायची हा प्रश्न राहतोच.

चिंतनधारा: आत्मस्थितीच्या सुधारणेचा मार्ग

सर्व माणसे सारखीच असताना त्यांच्या आत्मस्थितीत भेद पहायला मिळतो, तो का? याचे विवेचन करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात विश्वाची काळजी वहाता यावी एवढी शक्ती कशी मिळवायची हा प्रश्न राहतोच.

याकरिता अनेकांनी अनेक उत्तरे दिली आहेत. भावनावादी म्हणतात, गुरूने शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे ज्ञान प्राप्त होते. गुरूंच्या या प्रसादामुळे शिष्याच्या चित्तात आपोआप काहीही प्रयास न करता ही प्रक्रिया घडते. अन्य काही लोक म्हणतात, गुरू अथवा अनुभवी मनुष्य इतरांना आपले अनुभव सांगून मार्गदर्शन करतो. ‘अमुक मार्गाने जा, म्हणजे तुला आत्मस्थितीचा लाभ होईल’ असा उपदेश करतो.

गुरूच्या संपर्कात येणारे सारेच लोक त्या थोर आत्मस्थितीचे अधिकारी झालेले दिसत नाहीत. पहिल्या मताप्रमाणे गुरुकृपा जर देता आली असती तर भारतवर्षांत कोणीच अज्ञानी राहिले नसते. सर्वच मोक्षाचे अधिकारी झाले असते, पण इतके संत-महात्मे, देव-देवता या देशात होऊनही त्याप्रकारचे दृश्य का पाहायला मिळत नाही. कोणी म्हणतात, अशी गुरुकृपा कोणाला द्यायची हे गुरूवर अवलंबून असते. तो एखाद्याला कृपाप्रसाद देईल तर दुसऱ्याला देणारही नाही. पण हेही मनाला पटत नाही कारण महात्मा हा विशाल हृदयाचा असतो. त्याला सर्व सारखेच असतात. तो भेदभाव करत नाही.

कोणताही भेदभाव न करता नदी ज्याप्रमाणे जवळ आलेल्या सर्वानाच पाणी देते, तृष्णा शमवते, सूर्य सर्वानाच प्रकाश देतो त्याप्रमाणे गुरूचेही आहे. खरी गोष्ट अशी आहे की गुरू कोणालाच कृपा देत नाही, तो फक्त मार्गदर्शन करतो, पण गुरूच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करून मुक्कामाला पोहोचणारे मोजकेच असतात. यात गुरूचा दोष नाही. नदीवर पाण्यासाठी गेलेल्या माणसाजवळ जेवढी भांडी असतील तेवढेच पाणी त्याला घेता येईल. त्यानुसार सद्गुरूच्या मार्गदर्शनाचा लाभ प्रत्येकाला आपल्या मनाच्या भावनेच्या शक्तीएवढाच घेता येईल. मनुष्याला आत्मस्थितीत सुधारणा करून घ्यायची असेल तर महाराजांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे कष्टाला प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. महाराज म्हणतात..

म्हणोनि जीवात सामथ्र्य अनंत।
अभ्यासाने प्रकटे निवांत।।
नलगे आत्मशक्तीचा अंत। कोणासही।।
सर्व होते केले असता।
सर्व मिळते धरीता हाता।।
अभ्यासे तव ब्रह्मसत्ता। पावती योगी।।

राजेश बोबडे
rajesh772 @gmail. com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 01:27 IST

संबंधित बातम्या