मल्याळम जगण्याचे संपूर्ण भारताकडून अवलोकन दोन हजार सालाच्या अलीकडे-पलीकडे सर्वाधिक सुरू झाले. त्याला कारण होते उत्तररात्री चालणारे संगीतमय काम-सिनेमे. त्या दशकाच्या आगेमागे अदूर गोपालकृष्णन यांच्यासारखे कलात्मक सिनेमा जगभर पोहोचविणारे दिग्दर्शक होतेच. पण त्यांच्यानंतर नाव घेता येईल, असा कोणताच केरळी दिग्दर्शक मल्याळेतरांना ठाऊक नव्हता. मग उत्तररात्री विनोद आणि दृश्यिक भयाच्या काठावर जाऊ पाहणाऱ्या सांगीतिक ‘मल्लू’ सिनेमांनी कात टाकून पुढल्या दशकात आपला चित्रपट देशातील सर्वच भाषिक राज्यांत सरस ठरू शकतो, इतपत क्रांती केली. केरळ हे सर्वाधिक सुशिक्षित आणि वैचारिक प्रगतीसाठी ओळखले जाणारे राज्य आता फक्त उत्तम साहित्य आणि चित्रपटाची भूमी म्हणून आपली छबी घडवते आहे. तिथल्या डझनभर दिग्दर्शकांची, अभिनेते-अभिनेत्रींची आणि चित्रपटांची नावे सगळीकडचीच तरुणाई मंत्रोच्चाराच्या झोकात घेते. बेन्यामिन (गोट डेज), के. आर. मीरा (हँगवुमन) आदी अलीकडच्या बऱ्याच लेखकांची पुस्तके इंग्रजी आणि भाषिक अनुवादांत वेगात पोहोचत आहेत. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या वरताण ‘केरळ लिटरेचर फेस्टिवल’ होतो. यंदा जगभरातील ६०० लेखकांचा ताफा त्यांनी आठवडी महोत्सवात बोलावला. इंग्रजीसह स्वत:च्या भाषिक पुस्तकविक्रीही कोट्यांच्या आकड्यांत नेली. भारतीय साहित्य म्हणून जगाकडून पाहिल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये मल्याळी कादंबऱ्या ठळक असतात. याचे कारण त्यांच्या चांगल्या कथा-कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित होतात. तिथल्या इंग्रजी अनुवादकांचे प्रेम अभिजात पुस्तकांबाबत जितके टिकून, तितके ताजे जगभर पोहोचायला हवे हा त्यांचा अट्टहास. मराठीला (किंवा हिंदी किंवा मध्य भारताच्या वरील कुठल्या राज्याला) ज्या ज्या साहित्यात येणाऱ्या नव्या गोष्टींची सवय नाही, त्या मल्याळम साहित्याने पूर्वापार पचविल्या असल्याचे दिसते. याचे मोठे उदाहरण म्हणून २००९ साली मल्याळममध्ये आलेल्या ‘ए पल्प फिक्शन : टेक्स्टबुक’ या कादंबरीकडे पाहता येईल.
व्ही. एम. देवदास यांनी मल्याळम भाषेत ती १६ वर्षांपूर्वी लिहिली. ही कादंबरी शालेय पाठ्यपुस्तकातील प्रकरणांच्या शैलीत मांडली गेली. पाठ्यपुस्तकांत प्रत्येक धड्याखाली जशी प्रश्नांची जंत्री असते. तसे इथे प्रश्न दिलेत आणि त्यांची उत्तरेही सादर केलीत. पण ही शालेय मुलांसाठीची कादंबरी नव्हे. ती आहे सजग आणि समंजस प्रौढांची. भारतात सुप्तपणे आणि गुप्तपणे चालणारा ‘लैंगिक खेळण्यां’चा उद्याोग या कादंबरीच्या मुळाशी. पण त्याबरोबर अनंत विषयांचे ज्ञानकण वाचकाच्या मेंदूत सारत ती पुढे सरकते. २००९ सालीच काय तर २०२५ सालीदेखील बहुतांश भारतीय भाषकांना (जो या आधुनिक साधनांचा वापर आता करू धजतो) ज्या विषयावर साहित्यातून बोलायची हिंमत होऊ शकत नाही, त्याचा व्ही. एम. देवदास यांनी दीड दशकापूर्वी मल्याळी वाचकांना परिचय करून दिला होता. तिथे गाजलेल्या या कादंबरीचा देवदास यांनी स्वत:च यावर्षी इंग्रजीत अनुवाद केल्यामुळे आता भारतीय भूमीत चालणाऱ्या छुुप्या व्यवहाराबद्दल बेतलेली कादंबरी वाचता येणे शक्य झाले आहे.
कादंबरीची सुरुवात होते ती २००९ साली छापून आलेल्या वर्तमानपत्रातील पाच बातम्यांपासून. त्यातील दोन कोचीमधून लिहिल्या गेलेल्या आणि तीन दिल्लीतून. पहिली कोचीमध्ये पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवादी नेत्याची. दुुसरी तिथल्याच कस्टम अधिकाऱ्याच्या मृत्यूची. नुकत्याच इमारतीच्या खिडकीतून खाली पडून जीव गेलेल्या बायकोची वार्ता कळल्यानंतर घरी निघालेल्या या अधिकाऱ्याचा अपघात घडून त्याला मरण कसे आले हे सांगणारी भावस्पर्शी वगैरे. तिसरी दिल्लीतील पालिका बाझार या भागातील एका गोदामात तिथल्या मालकाने स्वत:वर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येची. चौथी शाळेत ‘सेक्स टॉईज’ विकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला पोलीस पकडून नेत असताना गाडीतून मारलेल्या उडीमुळे तिचा प्राण गेल्याची. पाचवी पालिका बझार या भागाचा आगामी (२०१०) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने पुनर्विकास केला जाणार असल्याबद्दलची.
या पहिल्या धड्याच्या शेवटी वाचकाला अभ्यास दिला जातो तो बातमी तयार करण्याचा. भूकंपाच्या संदर्भात मुद्द्यांवरून वृत्त कसे लिहाल, ते उत्तरात आकर्षक शीर्षकासह येथे सांगितले जाते. दुसऱ्या प्रश्नात प्रत्येक बातमी जी तुम्ही वाचता ती खरीच असते काय, तुम्ही जर बातमीदार असाल, तर त्यांतील तथ्य तपासण्यासाठी काय कराल, हे प्रश्न विचारून त्याची उत्तरे लिहिली गेलीत. मग उत्तरसत्य (पोस्टट्रूथ) याबाबत तुमचे मत सोदाहरण विचारले जाते. ही संपूर्ण कादंबरी म्हणजे पुढचे धडे आधीच्या पाचही बातम्यांमधील उत्तरसत्यांचा पाठपुरावा करताना दिसते. एकाच वेळी देशातील पत्रकारिता, शिक्षण, राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर बेदम मारा करत खिल्ली उडविण्याचा लेखकाचा होरा या ‘लेट्स लर्न न्यू थिंग्ज’ प्रकरणातून समोर येतो आणि सत्त्योत्तरी उत्तरसत्याच्या संशोधनाचे कार्य वाचकाला करण्यास भाग पाडतो.
पुढच्या पाठ्यपुस्तकसदृश प्रकरणांचे निनावी निवेदक आधीच्या बातम्यांत मृत्यू झालेल्या, मारल्या गेलेल्या अथवा आत्महत्या केलेल्या मृत व्यक्ती आहेत. बातम्यांत सांगितल्या गेलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष घडलेली तथ्ये पडताळण्याची संधी त्यांच्या निवेदनांकडून पुरेपूर मिळते.
केरळमधून हाँगकाँगमध्ये व्यवसायासाठी गेलेला तरुण दोन वर्षांत तेथे स्थिरावतो. आपल्या लहानपणच्या मित्राशी त्याचा अचानक पत्रसंवाद होतो. ख्याली-खुशालीनंतर हा मित्र एक दिवस अचानक पत्रातून ‘सेक्सडॉल’ पाठवण्याची विनंती करतो. भारतात लैंगिक खेळण्यांचा वापर, विक्री अधिकृत नसण्याच्या काळात हाँगकाँगवरून सेक्सडॉल पाठवली जाते. विमानतळावर ती जप्त केली जाते. दुसऱ्यांदा वेगळ्या पत्त्यावर पाठवूनदेखील ती कस्टमच्या तावडीतून सुटत नाही. पुढे हाँगकाँगहून ही व्यक्ती स्वत: घरी परतते, तेव्हा आपल्या या मित्राच्या शोधार्थ गावात पोहोचते. तिथे पोलिसाच्या हातून त्याचा मृत्यू लिहिलेला असतो. आपल्याला नाहक का मारले गेले, याचे उत्तर त्याला मृत्योत्तर काळातही कळत नाही. वाचकाला घनघोर नक्षलवादी म्हणून मारली गेलेली पहिल्या बातमीतील व्यक्ती आणि हाँगकाँगवरून परतलेला हा भाकरमानी एकच असल्याचे कळते. पण नंतर प्रश्नोत्तरांमधून भारतभर पोलिसांकडून झालेल्या खोट्या चकमकींवर टिपण वाचायला मिळते. इशरत जहाँ, सोहराबुद्दीन शेख, कौसर बी, तुलसीराम प्रजापती आदींबद्दलचे वाचकाचे ज्ञान अधिक अद्यायावत केले जाते. त्यानंतर नक्षलवादी चळवळीचा इतिहास आणि सरकारची मोहीम यांच्याबद्दल सव्वा पानांचा निबंध वाचायला मिळतो.
‘मर्चंट ऑफ पालिका बाझार’ या दुसऱ्या प्रकरणात २००८ सालातील सर्वच अनधिकृत धंद्यांची गंगोत्री असलेल्या दिल्लीतील पालिका बझारमधील व्यापाऱ्याचे निवेदन सुरू होते. त्याच्या गोदामात पायरेटेड सीडी-डीव्हीडींचा कमी उपद्रवी आणि सर्वांना ज्ञात असलेला साठा असतोच. पण त्याची विक्रीखासियत ही ‘लैंगिक खेळण्यां’ची. स्त्रिया आणि पुरुषांना लागणारे त्यांतील नाना प्रकार त्याच्याकडे उपलब्ध. हे पालिका बझाराचे जग दिवसभरात ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’मधील चमत्कृतीपूर्ण गोष्टींनी भरून कसे जाते, याचा तपशील हा निवेदक देतो. दिवसभर येणाऱ्या गिऱ्हाइकांत समलिंगी पुरुष आणि महिला, आत्मप्रेमी एकटी-एकटे यांचा वाढता भरणा याबाबत त्याचे चिंतन सुरू राहते. अधिकृत विकता न येणारा इतका साठा त्याच्याकडे येतो कुठून, तर चीन, सिंगापूर, मलेशिया येथून आडमार्गाने त्याची रवानगी दिल्लीतील पालिका बझार आणि मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये होते. त्यानंतर त्यांचे देशभर लपून-छपून वितरण कसे होते याचा शब्दप्रवास मोठाच रंजक. पुढल्या प्रश्नोत्तरांत ‘फ्लटरिंग बटरफ्लाय’, ‘डिल्डो’, ‘रॅबिट व्हायब्रेटर’, ‘सक्शन टॉय’, ‘फेटिश डाय’, ‘बेन वा बॉल्स’ आदी लैंगिक खेळण्यांची नावे, त्यांचा वापर यांचा तपशील अतिसभ्य भाषेत पुरवला जातो. ‘अलोन इन वंडरलॅण्ड’ हे ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’ शीर्षकातून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या प्रकरणात अनाथालयात वाढणारी १७ वर्षीय मुलगी या पालिका बझारमधील व्यापाराशी व्यवहार कसा करते आणि शाळेतील श्रीमंत मुलींमध्ये लोकप्रिय कशी होते याची कथा घडते. पुढे कस्टम अधिकाऱ्याची या सर्व मृतक निवेदनांशी असलेले जाळ्यासारखे संबंध उलगडायला सुरुवात होते आणि २००९च्या आधीची ‘लैंगिक खेळणी उद्याोगा’ची परिस्थिती, तिचा पसारा किती अफाट याची जाणीव होऊ लागते.
अगदी पूर्वीच्या अमिताभ बच्चनकालीन सिनेमांतील कथानकासारखे यातील निवेदकांशी एकमेकांशी धागे-दोरे आहेत. तद्दन फिल्मी वळणाचे. पण ते इतक्या बेमालूमपणे रचले आहेत की, लेखकाच्या या तिरकस कल्पनाशैलीला दाद द्यावी. कादंबरीला त्यामुळे कुठल्याही एकाच गटात विभागता येणार नाही. किमान दहा-पंधरा प्रकार त्यात सामावलेले आहेत. कधी ती थरार वळणावर असते, कधी तिला सांगीतिक वळण प्राप्त होते. कधी ती भयकथेचा तोंडवळा धारण करते, तर कधी ती ओटामालची या एकच स्तनधारी देवीबद्दल माहिती देऊन लोकांच्या धारणातत्त्वांवर चर्चा करू लागते. ‘सेक्स डॉल’ या विषयावर यात एक छोटे टिपण वाचायला मिळते. मध्येच बीटल्स या ब्रिटिश गीत-वाद्या वृंदाच्या ‘ल्यूसी इन द स्काय विथ डायमंड’ या गाण्याची निर्माणकथा उमजते. कथावळणावरच विशिष्ट दुर्मीळ असलेल्या रक्तगटाबद्दल आपल्याला काहीच पत्ता नसलेली माहिती पुरवली जाते. आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या डायरीतील निवेदनात टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्कीच्या सुुविचारांचा उल्लेख आणि शीर्षकात आपल्या खास चित्र प्रिंट केलेला टीशर्ट, फ्रॉक, कांचीपुरम सिल्क मॅरेज साडी, गुलाबी स्कर्ट, रंगीत फ्रॉक, रुग्णालयातील पोशाख यांची आवश्यक वाटणारी नोंद, असा इथला सगळा शैलीखेळ हसवता हसवता वैयक्तिक अध:पतनाबाबत चिंता करायला लावतो.
भ्रष्टाचार हा पुरातन चालणारा उद्याोग, हत्या, व्यसन, कामलालसा आणि त्यांतील अतृप्ती आदी फार फार वेळा वापरून झालेल्या विषयांचे वावडे या कादंबरीला नाही. उदारीकरणानंतर अवैध उद्याोगांनी भारतात राजरोस पाय पसरले. पण तेव्हापासून मानवी मेंदू कोणत्या आणि किती प्रकारच्या अध:पतनाकडे वाटचाल करीत आहे, त्याचे ही कादंबरी ‘पाठ्यपुस्तकी’ उदाहरण मानावे. ‘लगदा साहित्य’ म्हणजे वेगवान-देमार पल्प फिक्शनची सारी वैशिष्ट्ये या लेखनात आणूनसुद्धा मुद्दामहून वापरलेल्या पराकोटीच्या श्लील-संयत भाषेत लेखकाने या कहाण्यांचा खेळ रचला आहे.
व्ही. एम. देवदास हे केरळ साहित्य अकादमीने गौरविलेले आणि आधुनिक जगण्याचे विषय कथा-कादंबऱ्यांतून मांडणारे तरुण लेखक. तिथे बऱ्यापैकी लोकप्रियता लाभलेले. या पुस्तकानंतर त्यांचे आणखी साहित्य लवकर इंग्रजीत येईल, याची खात्री बाळगता येते.
पण मुद्दा हा की लैंगिक खेळण्यांचा हा व्यवहारदेखील मल्याळी वाचकांनी साहित्यातून दीड दशकापूर्वी स्वीकारला. तो मराठीला (किंवा हिंदी किंवा मध्य भारताच्या वरील कुठल्या राज्याला) आज तरी पचवता किंवा पटवता येईल काय? धार्मिक, पौराणिक, चरित्रगौरवपर किंवा ऐतिहासिक साहित्य आणि चित्रपटांच्या बहुप्रसवा लाटेत याचे उत्तर मिळवता येणे अवघड.
pankajbhosale@expressindia.com
‘अ पल्प फिक्शन टेक्स्टबुक’
●लेखक व अनुवादक : व्ही. एम. देवदास
●प्रकाशक : हॅचेट इंडिया
●पृष्ठे : १६४
●किंमत : ३९९ रु.