सिद्धार्थ खांडेकर

समोरून आलेल्या प्रतिस्पर्धी फुटबॉलपटूला, गिरकी घेत चकवून चेंडूवर नियंत्रण मिळवत पुढे सरकण्याचे क्रायुफ यांचे अफाट कौशल्य ‘द क्रायुफ टर्न’ म्हणून आजही ओळखले जाते. त्यांचे खेळणे म्हणजे मैदानावरील ऑपेराच जणू..

MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Trent Boult created history in IPL
MI vs RR : बोल्टने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

योहानेस हेन्ड्रिक तथा योहान क्रायुफ हे आधुनिक फुटबॉलला पडलेले सुंदर स्वप्न होते. ज्या काळात पेले फुटबॉलविश्व गाजवून अस्ताला निघाले, त्याच काळात क्रायुफ यांचा उगम झाला. या आठवडय़ात २५ एप्रिल रोजी क्रायुफ यांचा ७६ वा जन्मदिन होता. २४ मार्च २०१६ रोजी क्रायुफ हे जग सोडून गेले. पण त्याच्या किती तरी आधीच ते फुटबॉलमधील दंतकथा बनले आणि त्यांची छाप त्यांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्षे टिकून राहिली. फुटबॉलमधील महानतम खेळाडूंची चर्चा होते त्या वेळी पेले, मॅराडोना, मेसी, बेकेनबाउर, झिदान अशी नावे सहज पुढे येतात. पण हे सगळे जगज्जेतेही होते. या सगळय़ा यादीमध्ये क्रायुफ हे नाव हमखास घेतले जाते. विश्वचषक जिंकू न शकलेल्या सर्वोत्तम संघांमध्ये ‘नेदरलँड्स विश्वचषक १९७४’ हे नावही प्राधान्याने घेतले जाते. त्या संघाचे कप्तान होते योहान क्रायुफ (डच उच्चार क्रुइफ). त्या स्पर्धेत नेदरलँड्स संघाने ‘टोटल फुटबॉल’ ही क्रांतिकारी संकल्पना जगासमोर पेश केली. या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अवघड संकल्पनेचे जनक होते डच फुटबॉल प्रशिक्षक रिनस मिकेल्स. पण ती प्रत्यक्ष मैदानावर साकारण्याचे श्रेय नि:संशय क्रायुफ यांचेच. त्या स्पर्धेपर्यंत क्रायुफ हे नाव डच आणि युरोपियन फुटबॉलमध्ये नीटच ज्ञात होते. विश्वचषक १९७४नंतर हेच नाव जागतिक पटलावर झळकले. क्रायुफ आणि नेदरलँड्सच्या त्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. तेथे फ्रान्झ बेकेनबाउर यांच्या कणखर पश्चिम जर्मनी संघासमोर आणि फुटबॉलवेडय़ा यजमान जर्मन प्रेक्षकांच्या पुढय़ात त्यांना १-२ अशी हार पत्करावी लागली. परंतु तो विश्वचषक न जिंकताही क्रायुफ व त्यांच्या नेदरलँड्स संघाने, आणि विशेषत: ‘टोटल फुटबॉल’ने जगावर जे गारूड केले, ते आजतागायत टिकून आहे. काय होते हे ‘टोटल फुटबॉल’?

फुटबॉल हा इतर कोणत्याही खेळासारखाच वैयक्तिक कौशल्यावर भर देणारा खेळ. चेंडूला लाथ सगळेच मारू शकतात. त्यांतील काही वेगाने पळूही शकतात. त्यांच्यातही चेंडू पायाने तुडवत पळणारे अनेक निघतील. यांतील काही थोडे चेंडूला अचूक दिशा देणारे ठरतील. पण मोठय़ा मैदानावर खेळावे लागत असल्यामुळे वैयक्तिक कौशल्याइतकेच महत्त्व अवकाश तरलतेविषयीच्या (स्पेस डायनॅमिक्स) भानाला असते. त्यामुळे चेंडू निव्वळ पळवत नेण्यापलीकडे फुटबॉलच्या मैदानावर बरेच काही घडत असते. कौशल्य, वेग आणि शारीरिक जडणघडणीनुसार मैदानांवर फुटबॉलपटूंच्या आभासी फळय़ा किंवा स्तर बनवले जातात, ज्या ठरतात संरचना किंवा फॉर्मेशन. प्रत्येक फुटबॉलपटूची भूमिका आणि उद्दिष्ट निश्चित असते. यात लवचीकता असते, तरी रचनेत बदल करण्याचे स्वातंत्र्य फारसे नसते. ‘टोटल फुटबॉल’मध्ये या तत्त्वाला पूर्णत: छेद देणारी मांडणी असते. प्रत्येक खेळाडू कोणत्याही स्थानावर खेळू शकतो, नव्हे तसे खेळले पाहिजे. आणि यासाठी त्याने कौशल्यसुसज्ज असलेच पाहिजे. पुन्हा हा निव्वळ कौशल्याचा मुद्दा नाही. अवकाशभानही असणे तितकेच निकडीचे. क्रायुफ यांनी म्हटले होते, ‘हजार वेळा चेंडूवर कौशल्यच दाखवायचेय तर सर्कशीत जावे. ते फुटबॉल नव्हे. योग्य खेळाडूकडे योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पायाशी पास पुरवणे याला फुटबॉल म्हणतात’! मिकेल्स-क्रायुफ संरचनेत तरल भूमितीय जाणिवेला महत्त्व होते. स्थळ-काळ-वेगाचा तो मनोहारी आविष्कार होता. मिकेल्स यांच्या ‘ऑपेरा’चे क्रायुफ हे मैदानावरील ‘कंडक्टर’ होते. सैद्धांतिक बैठक मिकेल्स यांची होती. पण तिला मूर्तरूप देण्याची अवघड जबाबदारी क्रायुफ यांनाच पार पाडायची होती. कोणत्या खेळाडूकडे अधिक अवकाश आहे? कोणत्या खेळाडूकडे अधिक वेळ आहे? कारण अवकाश (जागा या अर्थी) आणि वेळ हाताशी असेल, तर गोल करण्याची संधी सर्वाधिक असते. हे जागच्या जागी थिजून किंवा बेभान, दिशाहीन धावूनही साधणार नाही. ते परिप्रेक्ष्य निर्माण करावे लागेल. यासाठी चेंडूचा ताबा अधिकाधिक स्वत:कडे ठेवावा लागेल. तो नसेल, तर प्रतिस्पध्र्याचा अवकाश आक्रसून टाकण्यासाठी समोरच्या हाफमध्ये झुंडीने जायचे. त्याच वेळी स्वत:च्या हाफमध्ये प्रतिस्पध्र्याने मुसंडी मारू नये, यासाठी ‘ऑफ-साईड’ सापळा तयार ठेवायचा. गोलरक्षकही एखाद्या बचावपटूसारखा निष्णात असावा. हे सारे काही जुळून येणे ही अत्यंत अवघड बाब असायची. पण नेदरलँड्सच्या संघाला अग्रणी संघांच्या तोडीचे बनवायचे, तर काही तरी मुलखावेगळे करावेच लागेल या विचाराने मिकेल्स आणि क्रायुफ यांना झपाटले होते. ते झपाटलेपण मैदानावर प्रकट व्हायचे.

क्रायुफ स्वत: उत्तम फुटबॉलपटू होतेच. देखणे, उंच-काटकुळे, काहीसे उद्धट.. पण खेळू लागले की मैदानावरील ऑपेराच जणू. समोरून आलेल्या प्रतिस्पर्धी फुटबॉलपटूला, गिरकी घेऊन चकवून चेंडूवर नियंत्रण मिळवत पुढे सरकण्याचे त्यांचे अफाट कौशल्य फुटबॉलविश्वात आजही ‘द क्रायुफ टर्न’ म्हणून ओळखले जाते. त्या स्पर्धेच्या चित्रफिती पाहताना क्रायुफ यांचा वैयक्तिक खेळ पाहून थक्क व्हायला होतेच. परंतु केवळ वैयक्तिक कौशल्यामध्ये रमून न जाता, सांघिक कामगिरी त्या स्तरावर कशी जमून येईल याविषयीची त्यांची दक्षताही वाखाणण्याजोगी होती. हल्लीच्या फुटबॉलमध्ये सारे काही ट्रॉफींच्या भाषेत मोजले जाते. क्रायुफ यांनी मुबलक ट्रॉफी जिंकल्या. १९७४ विश्वचषक स्पर्धेत ते सर्वोत्कृष्ट (गोल्डन बॉल पुरस्कार) फुटबॉलपटू ठरले होते. आयॅक्स या डच संघाने युरोपिय क्लब फुटबॉलमध्ये दबदबा क्रायुफ यांच्या काळात निर्माण केला. आयॅक्सपाठोपाठ स्पेनच्या बार्सिलोना संघासाठीही क्रायुफ यांनी भरीव योगदान दिले. आयॅक्स आणि बार्सिलोना या दोन्ही संघांची कामगिरी अनुक्रमे नेदरलँड्स आणि स्पेनमध्ये, तसेच युरोपमध्ये उजळली, ती क्रायुफ यांच्या कारकीर्दीत. आपापल्या देशांतील लीग, तसेच युरोपिय अजिंक्यपदे या क्लबांनी क्रायुफ यांच्या खेळामुळेच पटकावली होती. निव्वळ एक खेळाडू म्हणून क्रायुफ यांचे मूल्यमापनही काही प्रकरणांचा ऐवज ठरेल. पण खेळाडू म्हणून दिले त्यापेक्षाही अधिक योगदान क्रायुफ यांनी फुटबॉल मार्गदर्शक, व्यवस्थापक म्हणून दिले. रूढार्थाने ‘टोटल फुटबॉल’ ही संकल्पना नेदरलँड्स संघाला एका मर्यादेपलीकडे फळली नाही. पण क्रायुफ यांनी हा सिद्धान्त जिवंत ठेवला. त्यातील अनेक उपसंकल्पना त्यांनी आयॅक्स आणि बार्सिलोना संघाचे प्रशिक्षकपद सांभाळताना वापरल्या. लुइस व्हान हाल, होजे मोरिन्यो, लुइस एन्रिके, पेप गार्डियोला हे क्रायुफ यांचेच चेले. या प्रत्येकाने फुटबॉल प्रशिक्षणात स्वतंत्र मानदंड निर्माण केले. १९७४ विश्वचषकात इतके सारे ओतल्यानंतर, अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने क्रायुफ खरे तर खचले असते.

कोणीही खचले असते. पण विजयापेक्षा किंवा ट्रॉफीपेक्षा स्वत:चा अमीट ठसा, वारसा निर्माण करण्याला क्रायुफ यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच नेदरलँड्सबरोबर नाही, तरी बार्सिलोनाबरोबर त्यांनी त्यांना भावलेले तत्त्वज्ञान फुटबॉलमध्ये रुजवणे थांबवले नाही. फुटबॉल या खेळाला सौंदर्यमानकेही जोडली पाहिजेत, या विचारांचे ते होते. त्यामुळे त्यांचा खेळ, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार एका वेगळय़ाच उंचीचे आणि दर्जाचे होते; अस्सल होते. म्हणूनच कालजयी होते. केवळ जिंकणे महत्त्वाचे नाही. योग्य शैलीने आणि योग्य प्रकारे जिंकता आले पाहिजे हे त्यांचे विचार सध्याच्या उघडय़ावागडय़ा यशोकेंद्री युगात कदाचित भाबडे ठरतीलही. खुद्द क्रायुफ यांना ते जिवंत असताना याची चिंता कधी वाटली नाही. त्यांच्या शैलीच्या प्रभावाखाली खेळणाऱ्या स्पेनने आणि बार्सिलोनाने नवीन सहस्रकाच्या पहिल्या दीड दशकात दिग्विजयी कामगिरी केली. क्रायुफ यांचा महिमा अर्थातच या दोन संघांच्या पलीकडे जाणारा ठरतो. आधुनिक फुटबॉल किंवा आज जे फुटबॉल आपण सतत टीव्हीवर पाहतो, आस्वादतो, त्या रेसिपीचे एक पान क्रायुफ यांच्या नावावर आहे.