इंग्रजी माध्यमातून शिक्षण होऊनही मराठी (आणि हिंदी, इंग्रजीही) रंगभूमी गाजवणाऱ्या कलावंत हे अप्रूप नीना कुळकर्णी यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते. शालेय वयात ‘वयम् मोठम् खोटम् ’मधून अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या नीना कुळकर्णी आज जवळपास साडेपाच दशके रंगभूमीवर वैविध्यपूर्ण भूमिकांतून रसिकांचे रंजन करीत आहेत. जयवंत दळवींच्या ‘महानंदा’ कादंबरीवर आधारित ‘गुंतता हृदय हे’मधून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. तिथून सुरू झालेला अभिनयप्रवास आजच्या ‘असेन मी, नसेन मी’ या नाटकापर्यंत अद्याप सुरूच आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही रंगभूमींवर त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. ‘नागमंडल’,‘अखेरचे पर्व’, , ‘मातीच्या गाड्याचे प्रकरण’सारखी प्रायोगिक नाटके करत असतानाच दुसरीकडे ‘सावित्री’, ‘महासागर’, ‘देहभान’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘ध्यानीमनी’, ‘वटवट सावित्री’, ‘प्रेमपत्र’सारखी नाटकेही त्या व्यावसायिक रंगभूमीवर तितक्याच तडफेने करत होत्या. विजयाबाईंच्या ‘हमिदाबाईची कोठी’मधील शब्बो साकारणाऱ्या नीना कुळकर्णी यांनी पुढे जाऊन याच नाटकातली हमिदाबाईही वठवली. प्रशांत दळवींच्या ‘ध्यानीमनी’तली त्यांची निपुत्रिक शालू रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी होती. काही वर्षांनंतर त्यांनी ‘महासागर’ हे नाटक दिग्दर्शितही केले.
पं. सत्यदेव दुबे आणि विजया मेहता या दोन परस्परभिन्न गुरूंकडे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. त्यातून त्या हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीकडे वळल्या. ‘संभोग से संन्यास तक’, ‘आधेअधुरे’ , ‘अबे बेवकूफ’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’चं हिंदी रूपांतर ‘डॉक्टर आप भी’ आदी हिंदी नाटके करत असतानाच ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘महात्मा व्हर्सेस गांधी’ (मूळ मराठी : ‘गांधी विरुद्ध गांधी’), ‘इट्स ऑल युवर्स जनाब’ (मूळ मराठी : ‘तुझे आहे तुजपाशी’), ‘वेडिंग अल्बम’सारख्या इंग्रजी नाटकांतूनही त्यांनी आपला हुन्नर दाखवला. भूमिकेच्या अंतरंगात शिरून ती आत्मगत करण्यात त्यांचा हात धरणारी दुसरी कलावंत सापडणे मुश्कील. ‘अभिनय करणं हे माझ्या असण्याचाच भाग असल्याने त्यातून निवृत्तीचा प्रश्नच नाही,’ असे त्या म्हणतात. एकीकडे रंगभूमी गाजवत असतानाच त्यांनी मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांतूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘सवत माझी लाडकी’, ‘बायोस्कोप’, ‘मोगरा फुलला’, ‘फोटोफ्रेम’, ‘सरीवर सरी’, ‘आई’सारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि त्यासाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कारही लाभले. ‘शेवरी’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाची निर्मिती करून त्यातली विद्या बर्वे या घटस्फोटित स्त्रीची व्यथा-वेदना त्यांनी मुखर केली.
नव्वदच्या दशकात ‘लोकसत्ता’च्या नवे रूप लाभलेल्या ‘चतुरंग’ पुरवणीची संपादकपदाची धुरा त्यांनी काही काळ सांभाळली आणि त्यातले ‘अंतरंग’ हे आपले सदरही लोकप्रिय केले. नित्य नव्या भूमिकांच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे त्यांचे धैर्य ही त्यांच्या अभिनय कारकीर्दीची यशोरेखा ठरली आहे. व्यक्तिगत आयुष्यात अनेक खाचखळगे आले तरीही त्या डगमगल्या नाहीत. याच्या फलस्वरूप अनेकानेक मानाचे पुरस्कार त्यांच्यापर्यंत चालत आले. सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘असेन मी, नसेन मी’मधील डिमेन्शियाग्रस्त दीपाच्या भूमिकेसाठीही त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झालेला आहे. अशात आता त्यांना विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हा त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचा कळसाध्याय!