तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. ‘ईडी’ची छापेमारी, चौकशा यामुळे पक्षाचे नेते हैराण झाले असतानाच लागोपाठ तिसऱ्या नेत्याकडून धर्म आणि प्रादेशिक मुद्दय़ांवर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे द्रमुक चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आला. तीन हिंदूी भाषक राज्यांमधील भाजपच्या विजयानंतर उत्तर विरुद्ध दक्षिण भारत ही दरी अधिक रुंदावलेली दिसते. उत्तर भारतात यश संपादन करणाऱ्या भाजपला दक्षिणेत विस्तार करणे अद्यापही शक्य झालेले नाही हे कर्नाटकपाठोपाठ तेलंगणाच्या निकालावरून स्पष्ट झाले. उत्तर व दक्षिण भारतातील वादाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दखल घ्यावी लागली. उत्तर व दक्षिणेतील या सुप्त दरीचे पडसाद लोकसभेतही उमटले. उत्तर भारतातील भाजपच्या विजयावर टिप्पणी करताना लोकसभेत द्रमुकचे खासदार डी. एन. व्ही. सेंथिलकुमार यांनी उत्तरेकडील राज्यांचा उल्लेख ‘गोमूत्र राज्ये’ असा केल्याने वाद निर्माण झाला. हे वादग्रस्त विधान लोकसभेच्या नोंदीतून वगळण्यात आले तरी भाजपने द्रमुक आणि काँग्रेसची कोंडी करण्याकरिता या विधानाचा विषय तापविला आहे. ‘गोमूत्र राज्ये’ असे म्हणणे हा फक्त उत्तर भारतीयांचाच नव्हे तर अख्ख्या हिंदू संस्कृतीचाच अपमान असल्याचा आरोप करीत भाजपच्या नेतेमंडळींनी नेहमीच्या शैलीत वाद वाढवून, द्रमुकची भूमिका मित्रपक्षांनाही मान्यच आहे का, असा सवाल काँग्रेसला केला.
भाजप नेत्यांनी प्रतिपक्षाचा अवमान करण्यासाठी भूतकाळात केलेल्या विधानांचे कितीही दाखले दिले तरी, अन्य पक्षांच्या नेत्यांनी कधीही जीभ सैल सोडू नये, यासाठीच्या दबावतंत्रात भाजप यशस्वी होत असल्याचेही यातून दिसले. आधीच तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरून केलेल्या विधानावरून उडालेला धुरळा अद्यापही खाली बसलेला नाही. ‘डेंग्यू, हिवताप, करोनाप्रमाणेच सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे’ या स्टॅलिनपुत्राच्या विधानाचा भाजपने राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला. अगदी अलीकडे पार पाडलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणूक प्रचारात भाजपने सनातन धर्माला ‘इंडिया’ आघाडीचा विरोध असल्याचा मुद्दा तापविला होता. द्रमुकचे अन्य एक नेते व टू-जी घोटाळाफेम ए. राजा यांनी ‘हिंदू धर्माचा केवळ भारताला नव्हे तर जगाला धोका’ असे विधान करून वादात आणखी भर घातली होती.
हिंदूी राज्यांचा ‘गोमूत्र राज्ये’ हा उल्लेख हिंदूी भाषक राज्यांमध्ये महागात पडू शकतो याचा अंदाज आल्याने काँग्रेसने आधीच या विधानावर टीका करून या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण द्रमुक नेतृत्वानेही या प्रकरणी ‘ताकही फुंकून पिण्याचा’ प्रयत्न केलेला दिसतो. गोमूत्र राज्ये हा उल्लेख करणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी समज दिली. त्यानंतर खासदाराने दिलगिरी व्यक्त केल्यावरही ‘पक्षाकडून दिलगिरी हवी’ अशी मागणी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केली. मग संबंधित खासदाराने लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली. तरीही हिंदूी भाषक राज्यांमध्ये इंडिया आघाडी व काँग्रेसच्या विरोधात अधिक वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपने या वादाचा फायदा उचलला तो इतका की, ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेला अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष द्रमुकवर तुटून पडला. ‘द्रमुक नेत्यांनी अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार करावा, पण हिंदू धर्मावर टीकाटिप्पणी करण्याचे टाळावे’, असा जाहीर सल्ला ‘समाजवादी पक्षा’ने दिला. कारण उत्तर प्रदेशात हा मुद्दा विरोधात जाऊ शकतो याची याही पक्षाच्या नेत्यांना कल्पना आली असणार. मग, ‘स्टॅलिन यांनी खासदाराला दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिला, पण अशीच समज सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या आपल्या मंत्रिपुत्राला दिली नाही’ याकडे भाजपने लक्ष केंद्रित केले.
एकूणच सनातन धर्म, गोमूत्र राज्ये आदी विषय चघळत राहावेत, असाच भाजपचा प्रयत्न असणार. मतांच्या ध्रुवीकरणाचा निवडणुकीत फायदा होतो याची पक्की खूणगाठ भाजप नेतृत्वाने बांधली आहे. द्रमुक खासदाराने हिंदूी भाषक राज्यांची खिल्ली उडविणे किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ म्हणणे केव्हाही चुकीचेच. भाजपमध्ये वाचाळवीरांची कमतरता नसली तरी विरोधी नेत्यांची विधाने अधिक चुकीची ठरवण्याचे भाजपचे कसब वादातीत ठरते आहे. पण अशा वादांचा दुसरा पैलू म्हणजे, उत्तर व दक्षिण अशी दरी आतापासूनच रुंदावू लागली असताना लोकसंख्येच्या आधारे २०२६ नंतर मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दक्षिणेतील लोकसभा मतदारसंघांची संख्या कमी झाल्यास उत्तरेबद्दल एकही उणा शब्द न काढण्याची खबरदारी दक्षिणेला घ्यावी लागेल, याची चुणूक या वादांतून दिसते.