मुंबईत बसून बिहारचे महत्त्व कळत नाही. बिहारी महाराष्ट्रात येतात आणि घाण करतात, एवढी एकच भावना मराठी मुंबईकरांच्या मनात असते. पण मुंबईतून बिहार पाहणे आणि दिल्लीतून बिहार समजून घेणे यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर तर दिल्लीतून बिहार पाहण्यातील उत्सुकता वाढत गेली आहे! बिहार हे उत्तरेतील एकमेव राज्य आहे, जिथे भाजपला अजूनही भक्कमपणे पाय रोवता आलेले नाहीत. भाजपचे पाय रोवणे काय असते हेही दिल्लीतूनच घटनांकडे पाहताना समजते. त्या अर्थाने यंदाची बिहारची विधानसभा निवडणूक भाजप अत्यंत बारकाईने पाहत आहे. त्यातील एक मुद्दा आहे तो म्हणजे २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार यांचा भाजप ‘एकनाथ शिंदे’ करणार का? अर्थात, नितीशकुमार यांच्या कर्तृत्वाची तुलना एकनाथ शिंदेंशी करणे हा नितीशकुमार यांच्यावर अन्याय ठरेल.

कधी काळी नितीशकुमार मोदींना आव्हान देत होते. या स्पर्धेत मोदींनी त्यांच्यावर मात केली हे खरे, पण म्हणून नितीश यांची तुलना शिंदेंशी होऊ शकत नाही. नितीशकुमारांनी कधीही मोदींसमोर हात जोडले नाहीत. उलट शिंदे नेहमीच मोदींसमोर हात जोडून उभे असतात. बिहारमध्ये चिराग पासवान मोदी-शहांचे हनुमान बनले आहेत. शिंदे महाराष्ट्रातील हनुमान बनू पाहात आहेत, त्यातही ते पूर्णपणे यशस्वी झालेले नाहीत. महाराष्ट्रातील हनुमानाला देवेंद्र फडणवीस शांत बसू देत नाहीत. म्हणून तर शिंदेंना महिन्यातून एकदा तरी दिल्लीवारी करावीच लागते. नितीशकुमार गेल्या दोन दशकांत कोणाचेही हनुमान झालेले नाहीत. ते ज्या महाआघाडीत जातात, तीच बिहारमध्ये सत्तेत येते. या वेळीही बिहारमधील सत्तेच्या दोऱ्या नितीशकुमार यांच्याच हातात आहेत.

तरीही नितीशकुमार यांचा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होणार का, याची चर्चा रंगली, याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिंदेंचा चेहरा पुढे केला गेला. शिंदेच मुख्यमंत्री होणार असे वातावरण तयार केले गेले. खरेतर हेदेखील अर्धसत्य म्हणता येईल. कारण शिंदेंच्या वर्तुळातील लोकांना किंवा समर्थकांनाच फक्त तसे वाटत होते. संघाचे नेतृत्व काय करत होते याची माहिती असणाऱ्यांना शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते.

कदाचित भाजपच्या नेतृत्वातील एखाद-दोघांना फडणवीस नव्हे, तर शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असावे. भाजपला इतके प्रचंड यश मिळेल असे त्यांना वाटले नव्हते, भाजपला महायुतीतील दोन्ही घटक पक्षांची गरज उरली नाही इतके यश भाजपने मिळवल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे उघडच होते. भाजपचे यश तितके नसते तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते. प्रत्यक्षात फडणवीसांना शिंदेंची गरज उरली नाही. भाजप स्वबळावर सरकार बनवत असेल तर शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची संधी नव्हतीच. शिंदेंच्या बाबतीत ‘हात दाखवून अवलक्षण’ असे झालेले नाही. त्यामुळे शिंदेंना शब्द दिला आणि तो भाजपने पाळला नाही, असे नव्हे. भाजपमधील एखाद-दोन बड्या नेत्यांनी शिंदेंना तसा शब्द दिला असू शकतो. संघाला फडणवीस हेच मुख्यमंत्री होणे अपेक्षित होते, तसे ते झालेही.

बिहारमध्ये नितीशकुमार शिंदेंइतके कमकुवत नाहीत. त्यांनी आत्ताच भाजपला इतके नाचवले आहे की, कुणी सम्राट चौधरी या दुसऱ्या फळीतील नेत्याच्या तोंडी का होईना, ‘नितीश हेच मुख्यमंत्री राहतील’, असे वदवावे लागले. नितीशकुमारांकडे भाजपचे हात पिरगळण्याची क्षमता आहे. शिंदेंकडे भाजपच्या कोणत्या नेत्याचे हात पिरगळता येतील, एवढी ताकद आहे, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर एकाचेही नाही असेच असेल!

नितीशकुमारांना ‘पलटूराम’ म्हणून हिणवले जात असले, त्यांनी वेळोवेळी आघाड्या बदलल्या असल्या तरी तेच कसे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले? ‘एनडीए’च्या आघाडीत भाजपने नितीशकुमारांचे नेतृत्व स्वीकारले तसेच, महागठबंधनमध्ये लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या बिहारच्या ‘चाणक्या’नेही नितीशकुमार यांनाच नेतृत्व करायला सांगितले, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. ‘इंडिया’ आघाडीत वितुष्ट आले आणि नितीशकुमार यांनी विरोधकांना किंमत चुकवायला भाग पाडले.

लोकसभा निवडणुकीआधी ते ‘एनडीए’मध्ये जाऊन बसले. या सगळ्या राजकीय उड्या नितीशकुमार यांनी मारल्या, ते मुख्यमंत्रीपद राखून. बिहारमध्ये त्यांनी हुकूमत गाजवली आणि इतरांना आपल्या मर्जीप्रमाणे वाकवले. त्यामुळेच कदाचित आत्ताही लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यात मागच्या दाराने बोलणी होत असावीत अशी चर्चा केली जात आहे. अशा बातम्यांत तथ्य नसले तरी, त्या पेरण्यातून गोंधळ निर्माण होत असतो, तो नितीशकुमार यांच्यासाठी फायद्याचा ठरतो. नितीशकुमार मोदी-शहांच्या हनुमानावर संतापले होते असे म्हणतात. त्याची चर्चा सुरू होताच अमित शहा पाटण्याला जाऊन नितीशकुमारांना भेटले.

या भेटीनंतर चिराग पासवान यांची नितीशकुमार यांच्याबद्दलची सार्वजनिक पातळीवरची भाषा बदलली. ते आता नितीशकुमार यांची महती सांगत आहेत. मोदी-शहा यांनी बिहारचा दौरा केला; पण नितीशकुमार हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील याबाबत ते बोलायला तयार नव्हते. ते म्हणाले की, निवडणूक नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवू. ‘एनडीए’चे विधिमंडळ सदस्य नवा मुख्यमंत्री ठरवतील. ‘एनडीए’ सत्तेत कायम राहिली आणि नितीशकुमार मुख्यमंत्री नसतील आणि यादवेतर ओबीसी, अतिमागास, काही दलित-मुस्लीम मतांचा टक्का ‘एनडीए’विरोधात फिरला तर मुख्यमंत्री ठरवण्याची वेळही येणार नाही हे भाजपला कळत असल्यानेच नितीशकुमार जिथे आहेत तिथे कायम राहिले आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे जिथे होते तिथून त्यांना खाली का उतरावे लागले हेही नितीशकुमार यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते.

बिहारमध्ये या वेळीही जातीची गणिते बदललेली नाहीत. भाजपकडे उच्चवर्णीय आहेत, नितीशकुमारांकडे मागास-अतिमागास आहेत. मुस्लीम कदाचित काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाकडे अधिक प्रमाणात वळू शकतील. जितनराम मांझी, चिराग पासवान यांच्यामुळे त्यांच्या पक्षांच्या दलित जातींचा आधार, उपेंद्र कुशवाह यांच्यामुळे कुशवाह हा ओबीसी मतदार ‘एनडीए’कडे आहे. हे पाहता ‘एनडीए’ तुलनेत बळकट आघाडी भासते. विरोधकांच्या ‘महागठबंधन’मध्ये राष्ट्रीय जनता दलाकडे यादव-मुस्लीम भक्कमपणे असतील. काँग्रेसकडे मुस्लीम पुन्हा वळू लागले आहेत.

यापलीकडे काँग्रेसकडे जातींचा सक्षम आधार नाही. डाव्या पक्षांचे काही जिल्ह्यांमध्ये प्रभुत्व आहे, तिथे मागास-अतिमागास, दलित, मुस्लीम मते मिळतात. मुकेश सहनी यांच्यामुळे दोन-तीन टक्के दलितांची उपजात ‘महागठबंधन’कडे जाऊ शकते. हे सहनी २०२० मध्ये ‘एनडीए’सह होते. चिराग पासवान यांनी नितीशकुमारांचे उमेदवार पाडण्याचे काम केले होते. कुशवाह कुठल्याच महाआघाडीत नव्हते, त्यांची असदुद्दीन ओवैसींच्या ‘एमआयएम’ला साथ होती. या वेळी कुशवाह, पासवान ‘एनडीए’त आणि सहनी ‘महागठबंधन’मध्ये आहेत.

मुस्लिमांच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता गृहीत धरून नितीशकुमारांनी या वेळी फक्त ४ मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यांचा सगळा भर मागास-अतिमागास मतदारांवर आहे. भाजपचे १०१ पैकी ४९ उमेदवार उच्चवर्णीय आहेत. नितीशकुमारांकडे मागास, भाजपकडे उच्चवर्णीय, तसेच दोन दलित नेत्यांच्या आधारे बहुतांश दलित मतदार खेचण्याची रणनीती ‘एनडीए’ने आखल्याचे दिसते. भाजपचे निम्मे उमेदवार उच्चवर्णीय असल्याने प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष उच्चवर्णीय मतांत फूट पाडेल ही शक्यता भाजपने गृहीत धरली असावी असे दिसते. तसे झाल्यास किशोर ‘महागठबंधन’पेक्षा ‘एनडीए’चे जास्त नुकसान करू शकतील, असा कयास आता बांधला जात आहे.

प्रशांत किशोर यांच्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या तर ‘एनडीए’मध्ये नितीशकुमार हेच मोठे भाऊ ठरतील. जागावाटपामध्ये नितीशकुमारांचे थोरलेपण नाकारले गेले होते. निवडणुकीनंतर नितीशकुमार जागा जिंकण्यामध्ये ‘मोठा भाऊ’ ठरले तर आणि ‘एनडीए’कडे सत्ता कायम राहिली तर, नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री करावे लागू शकते. तसे झाले नाही तर आत्ताच्या वावड्या खऱ्या ठरणारच नाहीत असे नव्हे. ‘पलटूराम’ ही कुत्सित टीका स्वीकारून नितीशकुमार निर्णय घेऊ शकतील. मग, भाजपच्या हातून सत्ता निसटू शकते. निकालानंतर लगेचच जनता दलामध्ये फूट पाडून भाजपला स्वत:चा मुख्यमंत्री करता येणार नाही, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

महाराष्ट्रामध्ये भाजपने अडीच वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री झाले. बिहारमध्येही फोडाफोडी करून भाजपचा मुख्यमंत्री होण्यास अडीच वर्षे नसली तरी एखादे वर्ष तरी द्यावे लागू शकते. तोपर्यंत भाजपसाठी नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे हाच अधिक सोईचा मार्ग ठरू शकतो. त्यामुळे नितीशकुमारांचा ‘एकनाथ शिंदे’ करण्याची प्रक्रिया जितकी सोपी वाटते, तितकी प्रत्यक्षात नसेल. बाकी राहिला मुंबईतून बिहार पाहण्याचा भाग, महाराष्ट्राने जशी भाजपसमोर नांगी टाकली तशी बिहारने टाकलेली नाही, शिवाय तिथे लालू आहे, महाराष्ट्रात लालूंच्या कुवतीचा एकही विरोधी पक्षनेता अस्तित्वात नाही. एवढा फरक कळला तरी बिहारचे महत्त्व महाराष्ट्राला कळेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com