‘राज्य सरकारने तयार केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात कडाडून टीका केली, त्याअर्थी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा शहरी नक्षलवाद्यांना असून त्यांनी नक्षलवादी शक्तींची पाठराखण केली आहे… वास्तविक या शक्तींचे स्वरूप ओळखून मनमोहन सिंग सरकारच्या काळात शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली होती; पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत याच शहरी नक्षलवाद्यांचे पाठीराखे सहभागी होते.’ असे आक्षेप नोंदवणारे टिपण…

नाका-तोंडात पाणी गेलेला माणूस हात-पाय हलवून, ओरडण्याचा प्रयत्न करून जीव वाचविण्याची धडपड करत असतो. उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातले भाषण म्हणजे त्याप्रमाणेच बुडणाऱ्या माणसाप्रमाणे आपला जीव वाचविण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीची अखेरची धडपड वाटत होती. ही केविलवाणी धडपड पाहून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित झालेल्या लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत चैतन्याचा हुंकार भरणाऱ्या सभांचे स्मरण वारंवार होते.

काँग्रेसशी कधीही समझोता नव्हता…

वंदनीय बाळासाहेबांनी सत्तेचा हव्यास कधीच धरला नाही. सत्तेचा मोह नसल्यामुळे बाळासाहेबांनी आपल्या हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीच तडजोड केली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांनी राष्ट्रीयत्वाचा, हिंदुत्वाचा वसा जपला. त्यांनी या विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसशी, कम्युनिस्ट, समाजवादी विचारधारांशी कधीच राजकीय समझोता केला नाही. उद्धव ठाकरेंनी मात्र हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा विचार चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडायचे या अटीवरच काँग्रेस नेतृत्वाने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. १९८९ पासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होती.

रामजन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली होती. याखेरीज या युतीला देशात त्यावेळी सुरू असलेल्या खलिस्तानी दशतवाद्यांच्या हिंसाचाराचीही पार्श्वभूमी होती. भारताला अस्थिर, अशांत करण्याच्या पाकिस्तानच्या कारस्थानाचा एक भाग म्हणून त्यावेळी खलिस्तान समर्थकांना बळ देण्यात येत होते. खलिस्तानी अतिरेक्यांकडून त्यावेळी देशभर हिंसाचार घडविला जात होता. या हिंसाचाराला आटोक्यात आणण्यासाठी १९८४ मध्ये त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमृतसर येथील शीख धर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिराला खलिस्तानी अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त केले. याचा सूड म्हणून अतिरेक्यांनी इंदिरा गांधी, लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्या यांची हत्या केली. खलिस्तानी अतिरेक्यांनी देशभर हिंसाचाराचा आगडोंब उसळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रहित लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. हिंदू-शीख धर्मीयांत फूट पाडण्याच्या विरोधात भाजपा ठामपणे उभी होती.

हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी नक्षलवादी शक्तींची पाठराखण केली. देशापुढे शहरी नक्षलवाद्यांचा मोठा धोका आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती ताकद सहन होत नसल्याने अनेक शक्तींनी भारतातील शहरी नक्षलवाद्यांच्या कारवायांना बळ देण्याचे उद्याोग सुरू केले आहेत. त्यासाठी शहरांत सातत्याने अराजक, अशांतता पसरवण्यासाठी नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. खोट्या गोष्टी पसरवून विविध जाती धर्मीयांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा कुटिल डाव आखला गेला.

स्वयंसेवी संस्था काय करतात?

दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंसेवी संस्थांची यातील भूमिका. या देशाचे इतके मोठे दुर्दैव आहे की या स्वयंसेवी संस्थांना कोणीही प्रश्न विचारत नाहीत, सगळ्यांचा समज हाच होता की स्वयंसेवी संस्था विधायक काम करतात. हा समज चुकीचा आहे. अनेक स्वयंसेवी संस्था अशा आहेत की ज्या समाजसेवा तर करत नाहीतच, पण धर्मांतर घडवून आणतात आणि त्याचबरोबर नक्षल्यांची भरती करतात. काही वर्षांपूर्वी भीमा-कोरेगाव येथे घडविलेला हिंसाचार वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष पेटविण्याचे कारस्थान होते. अशा शक्तींना जेरबंद करण्यासाठी राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे. या विधेयकावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात कडाडून टीका केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत याच शहरी नक्षलवाद्यांचे पाठीराखे सहभागी होते.

आपल्या देशाबद्दल, आर्थिक प्रगतीबद्दल परकीय संस्था कौतुक करीत आहेत. मात्र परदेशी मदतीवर पोसल्या जाणाऱ्या स्वयंसेवी संस्था देशात घडलेल्या काही नकारात्मक घटनाच वारंवार सांगत असतात. देशात कितीतरी सकारात्मक गोष्टी घडून आल्या आहेत त्याबद्दल कोणीही बोलत नाही. मार्क्सवादी आणि डाव्यांची रणनीती आहे की ते प्रत्येक गोष्टीची लिखित स्वरूपात नोंद ठेवतात. ते याच लिखित पुराव्यांच्या आधारे कपोलकल्पित कथा तयार करतात. या कथांच्या आधारे समाजातील वेगवेगळे जाती समूह, विविध धर्मीय एकमेकांच्या विरोधात कसे उभे राहतील, त्यातून सामान्य माणसाचा देशाच्या संविधानावरील, न्यायव्यवस्थेवरील विश्वास कसा उडेल यासाठी ही मंडळी प्रयत्न करतात. या शक्तींचे स्वरूप ओळखून मनमोहन सिंग सरकारच्या काळात शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास प्रारंभ केला होता.

प्रतिज्ञापत्रातही ‘शहरी नक्षलवाद’

शहरी नक्षलवाद हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादापेक्षाही जास्त धोकादायक आहे. आपल्या देशात राहून काही लोक देशाविरोधात कट रचणाऱ्या लोकांना मदत करत आहेत. ते कुठेही असू शकतात. या अदृश्य शक्तींशी कसे लढायचे हा खरा प्रश्न आहे. २०११ मध्ये कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना माओवादी असण्याच्या आरोपावरून अटक झाली. आर. आर. पाटील त्यावेळी गृहमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही कारवाई झाली होती. त्यावेळीही कबीर कला मंच आणि त्यांच्या समर्थकांनी हे लोक पुरोगामी आहेत आणि समतेची गाणी गातात म्हणून यांचा आवाज दाबला जातोय, यांचा नक्षलवाद्यांशी संबंध नाही असा प्रतिवाद केला. अशा परिस्थितीत आणि या सर्वांचा दबाव असूनही आर.आर.पाटील यांनी अटक केलेल्यांचा नक्षलवादाशी संबंध आहे आणि पोलीस कारवाई योग्यच आहे अशी ठाम भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयापुढे २०१३ मध्ये त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री पी.चिदम्बरम यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहरी नक्षलवाद्यांच्या देशविरोधी कारवायांची माहिती दिली होती.

जनसुरक्षा कायदा हा ‘हम करे सो कायदा’ असा आहे. तो तोडून-मोडून टाकला पाहिजे, असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले त्यावेळी त्यांच्यामागचा बोलविता धनी कोण आहे हे लक्षात आले. उद्धव ठाकरेंना आता याच शक्तींचे समर्थन करीत बसावे लागणार आहे.