मे महिन्याच्या अखेरपासून अमेरिकी आणि युरोपातील नियतकालिकांची पुस्तक पाने वाचन सोहळा सुरू करतात. पुढले तीन-चार आठवडे यंदा नवे काय वाचाल, त्याची भली मोठी यादी देणारे रविवारचे विशेषांक दिसू लागतील. गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन पोस्टने ‘बुकसेक्शन’ फक्त त्यासाठी बहाल केले होते. लोकांनी सुट्ट्यांमध्ये वाटेल ते करा… पण वाचायचे असेल तर तुमच्या आवडीच्या गटात (कथा/ कादंबऱ्या/ वैचारिक/ पॉप्युलर/ रहस्य/ रोमान्स) नवे पुस्तक कोणते आले, त्याचा तपशील मुक्तहस्ते पुरवणारे आम्हीच, असा एकंदर खाक्या. दिवाळीत आकाशकंदिलांच्या नव्या डिझाइनबद्दल माहिती देणाऱ्या किंवा संक्रांतीआधी ‘अमुक पतंगांना यंदा मागणी’ असे सांगणाऱ्या बातम्या याव्यात तितक्या उत्साहाने दर उन्हाळ्यात ही नियतकालिके वाचनसण असल्यासारखी माहिती देत राहातात, ही यातली खरी गंमत. अटलांटिक मासिकाच्या संकेतस्थळावर यंदा २४ वाचावीत अशी नवी पुस्तके अत्यंत अभिनव पद्धतीने सादर केलीत. गुंगवून ठेवणाऱ्या पुस्तकांची नावे कळण्यासह सर्वोत्तम लेआऊट म्हणून या यादीचे अवलोकन करता येईल.
https://tinyurl.com/3my93j56
वाचक शोधण्याचा प्रवास…
न्यू यॉर्क शहरातील एक प्रसिद्ध ‘बुक व्लॉगर’. नाव हेली फॅम. कधी न ऐकल्या-पाहिलेल्या तीन पुस्तकांबद्दल अनोळखी व्यक्तींकडून जाणून घ्यायचा पण करून न्यू यॉर्कभर फिरण्याचा तिचा उद्याोग एका ‘व्लॉग’ एपिसोडमध्ये चित्रित झालाय. कट्टर किंवा अट्टल वाचकांमध्ये एक नवा गट नव्या काही वर्षांत दाखल झाला. तो सतत खूप पुस्तके वाचतो पण त्याबद्दल लिहिण्याच्या फंदात पडण्याऐवजी, पुस्तक मिळविण्यापासून ते वाचनाबद्दल तो व्हिडीओच बनवतो. हेली फॅम याच पंथातल्या. त्या इतर पुस्तक-मैत्रिणींच्या साथीने भटकंती करतात. समुद्रकिनाऱ्यांवर उन्हाळ्यात पुस्तकवाचनाच्या हेतूने पर्यटनही करतात. घरात फुगत चाललेल्या ग्रंथसंग्रहाभोवती बसून व्हिडीओ पाहणाऱ्यांशी पुस्तकगप्पा करतात. या एपिसोडमध्ये ‘बुक ऑफ द मन्थ’ या संस्थेच्या (ही १९२६ पासून कार्यरत आहे) संपादकीय विभागाच्या संचालिकेकडून (जी वर्षाला २६० पुस्तके वाचते) हेली फॅम ग्रंथ शिफारस घेते. वाचक शोधण्याचा शहरभर प्रवास आणि नवी पुस्तके असा रंजक वळणांचा प्रवास या व्हिडीओतून दिसतो.
https://tinyurl.com/9hb59kv2
‘सेल्फ-हेल्प गुरू’ची विद्या…
जन्माने आणि कर्मानेदेखील कॅनडावासी असलेल्या रॉबिन शर्मा यांच्या सेल्फ हेल्प पुस्तकांची गेल्या तीस वर्षांतील विक्री अडीच कोटींहून अधिक इतकी. (भारतात आणि इतरत्र पायरसीने विकल्या गेलेल्या कोट्यवधी पुस्तक विक्रीची यात नोंद नाही.) १९९४ साली त्यांनी ‘मेगालिव्हिंग’ हे पुस्तक लिहिले. ‘द मंक हू सोल्ड हिज फेरारी’ (१९९७) या एकट्या पुस्तकाने मात्र खपाचे विक्रम केले. आता त्यावर एका बड्या स्टुडिओकडून चित्रपटही येऊ घातला आहे. पण मुद्दा तो नाही. या लेखकाची पुस्तके वाचत असला-नसलात किंवा सेल्फ हेल्प पुस्तकांना साहित्य मानत नसलात तरी काही दिवसांपूर्वी जीक्यू मासिकाने घेतलेली वाचनीय मुलाखत. त्यासह ‘टेड’ नसलेला तासाभराचा ‘टॉक’.
https://tinyurl.com/54wwmce4
https://tinyurl.com/2sz7apyj
कर्नाटकात वाचकांचा पूर…
बानू मुश्ताक यांना गेल्या आठवड्यात ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी ‘इंटरनॅशनल बुकर’ मिळाल्यानंतर मूळ कन्नड भाषेतील त्यांच्या समग्र कथांच्या ‘हसीना’ या पुस्तकाने कर्नाटकात गेल्या आठवड्यात हजारांहून अधिक प्रतींची विक्री केली. मात्र वाचकांची नोंदणी तीन हजारांवर गेल्यामुळे प्रकाशक युद्धपातळीवर ताज्या आवृत्तीची कसरत करीत आहेत. त्याचे डेक्कन हेराल्डने दिलेले वृत्त.