scorecardresearch

बुकमार्क : चित्रांपासून चित्रकारापर्यंत..

दृश्यकलेतली अभिव्यक्ती ही वैचारिक आणि नैतिक कृती. तिचा आढावा सुधीर पटवर्धनांसंदर्भात हे पुस्तक घेते..

book review walking through soul city
वॉकिंग थ्रू सोल सिटी

अभिजीत ताम्हणे

दृश्यकलेतली अभिव्यक्ती ही वैचारिक आणि नैतिक कृती. तिचा आढावा सुधीर पटवर्धनांसंदर्भात हे पुस्तक घेते..

ज्येष्ठ चित्रकाराने गेल्या ५० ते ६० वर्षांत केलेल्या कामांपैकी निवडक आणि महत्त्वाच्या कलाकृतींचे सिंहावलोकनी (रिट्रोस्पेक्टिव्ह) प्रदर्शन हा केवळ त्या चित्रकारासाठीच नव्हे, तर लोकांसाठीही महत्त्वाचा टप्पा असतो. आज कार्यरत असलेल्या या चित्रकाराचे महत्त्व आता भावी इतिहासही मान्य करणार, ही निव्वळ कला न राहाता ती आपल्या संस्कृतीचा भाग होणार, याची ती खूण असते. डॉ. सुधीर पटवर्धन यांचे नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात मुंबईच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला दालना’त भरलेले ‘वॉकिंग थ्रू सोल सिटी’ या नावाचे प्रदर्शन हे या प्रकारचे होते. राज्यातील वा राज्याबाहेरील अनेकांनी खास मुंबईत येऊन पाहिलेले हे प्रदर्शन, पटवर्धनांची चित्रे आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाचा भाग असल्याचा प्रत्यय देणारे ठरले होते. त्या प्रदर्शनावर आधारलेले हे पुस्तक वर्षभरापूर्वी निघाले. प्रदर्शनाच्या गुंफणकार नॅन्सी अदजानिया यांच्यासह पटवर्धन व अन्य भारतीय चित्रकारांचे ब्रिटिश चित्रकार-मित्र टिमथी हायमन, शांतिनिकेतनात शिकवणारे शिल्पकार आर. श्रीनिवासन यांचे इंग्रजी लेख, तर माधव इमारते यांचा मराठी लेख, खेरीज अनेक चित्रांवर स्वत: पटवर्धनांनी लिहिलेल्या टिपा आणि एका चित्राविषयी कवी वसंत आबाजी डहाके यांची कविता, असा या पुस्तकातला वाचनीय ऐवज. प्रेक्षणीय तर हे पुस्तक आहेच. एकंदर २५०हून जास्त प्रतिमा या पुस्तकात आहेत. प्रदर्शनात नसलेल्या ३६ छायाचित्रांचाही समावेश पुस्तकात आहे. सुमारे १०० रेखाटने, तर बाकी रंगचित्रे. हे पुस्तक आधी ‘पाहिले’च जाणार, पण ते पाहताना पानोपानी असलेल्या पटवर्धनांच्या टिपा वाचणे, हे या पुस्तकाचे प्रवेशदार ठरेल.

ही चित्रे आणि त्यावरील भाष्यातून पटवर्धनांचे कलेतिहासाशी आणि संस्कृतीशी असणारे नाते कळते. म्हणजे चित्रकार कोणत्या सांस्कृतिकतेला प्रतिसाद देतो, या संस्कृतीची जागतिक व्याप्ती आणि तिचा परिसरातला (शहरातला)-घरातला गंध पटवर्धन यांच्या कलाकृतींमधून लोकांपर्यंत कसा पोहोचतो, हे उमगते. नॅन्सी अदजानिया यांचे लिखाण चौकस आणि पटवर्धनांच्या चित्रांना प्रतिसाद देण्याची ठरावीक मळवाट सोडणारे आहे. प्रदर्शनाच्या नावातील ‘सोल सिटी’ या शब्दयोजनेचे वैचित्र्य मान्य करताना अदजानिया यांनी, हा ‘सोल’ म्हणजे आध्यात्मिक अर्थाने आत्मा नसून ‘रूह’मधून जे केवळ अस्तित्व प्रतीत होईल, ते अभिप्रेत असल्याचा खुलासा केला आहे. तो त्यांना शब्दांत पुरेसा पटवून देता आलेला नसल्याचे गृहीत धरले तरी, पटवर्धनांची चित्रे या केवलास्तित्वाच्या दृष्टीचा, तिच्या अथक चालण्याचा प्रत्यय देतात. पटवर्धनांच्या या चित्र-दृष्टीला रणजित होस्कोटे यांनी ‘द कॉम्प्लिसिट ऑब्झव्‍‌र्हर’- सामील साक्षीदार- असे नाव दिले होते. पण सामिलकीत सहानुभाव येत नाही, समानुभूतीची धारणा करणारी मानवी एकत्वभावना येत नाही. ही भावना पटवर्धनांची चित्रे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व माहीत असलेल्या सामान्यांनाही उमगते. याविषयी गीता कपूर यांनी १९७९ मधल्या पटवर्धनांच्या चित्रांबद्दल, ‘‘या मानवाकृती प्रेक्षकविन्मुख, स्वत:तच व्यग्र असल्याने भावनोद्दीपक अजिबात नाहीत. तरीसुद्धा त्यांच्याबद्दल (प्रेक्षकाला) पूर्णत: सहानुभाव वाटतो’’ असे म्हटले होते. तेव्हाच्या त्या चित्रांमध्ये ‘जनजीवन’ दिसत असले तरी प्रेक्षक ‘मानवी स्थिती’ पाहातो, हे कपूर यांनी योग्यरीत्या हेरले होते. तो धागा ‘रूह’शी जुळतो.

या पुस्तकाविषयी लिहिताना त्यातील चित्रांबद्दल कमीच लिहिण्याचे ठरवावे लागते आहे. वास्तविक ‘उल्हासनगर’ (२००१), ‘मुंबई प्रोव्हर्बज्’ (२०१४), ‘अनदर डे इन द ओल्ड सिटी’ (२०१७), ‘बििल्डग अ होम, एक्स्प्लोअरिंग द वल्र्ड’ (२०१४) यांसारखी मोठमोठी चित्रे याच पुस्तकात एकत्रित पाहायला मिळतात, रेखाटनांचीही निवड विचारपूर्वक केलेली दिसते आणि सर्वच प्रतिमांतून पटवर्धन यांचा प्रवास समजत राहातो. पण याविषयी विस्ताराने लिहिल्यास ती चित्रसमीक्षाच अधिक होईल. पुस्तकातील लिखित मजकुराने ती केलेली आहे. अदजानिया यांनी या सिंहावलोकनाची वैचारिक बैठक स्पष्ट केली आहे. चित्रकाराचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व यांची सांगड प्रदर्शनात कशी घातली याबद्दल विस्ताराने लिहिताना राजकीय मते, काळाचा आणि भोवतालाचा परिणाम, यांची चर्चा येते. अनेक चित्रांबद्दल सविस्तर लिहिताना अदजानिया यांचा हेतू या चित्रांचे कलेतिहासिक किंवा सांस्कृतिक महत्त्व मांडण्याचा आहे, तसाच तो वाचक/प्रेक्षकाला चित्रापासून चित्रकारार्पयंत घेऊन जाण्याचा आहे असे दिसते. प्रदर्शनाच्या पाच मजली रचनेनुसार पाच निरनिराळे लेख अदजानिया यांनी लिहिले आहेत, त्यापैकी तिसऱ्या लेखात, पटवर्धनांनी दलितांच्या संघर्षांची चित्रे का नाही केली हा प्रश्न स्वत:ला पडत असल्याचा उल्लेख त्या करतात. त्यांचा रोख १९७२, पँथर यांकडे असावा आणि त्या सुमारास पटवर्धन ‘मागोवा गटा’शी संबंधित होते, आदी तपशील पुढल्या लेखांत आहेत- पण हे काही उत्तर नव्हे. वास्तविक पटवर्धन यांची समाज टिपण्याची पद्धत कशी आहे याचा जो ऊहापोह अदजानियांनी केला आहे, त्यामधून त्यांना त्यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर आपसूकच मिळू शकेल! ते उत्तर साध्या शब्दांत असे आहे की, घडामोडींचे वा शहरांचे दस्तावेजीकरण हा पटवर्धनांचा मार्ग नसून पाहताना/जगताना समानुभूतीने व्यक्त होणे हा आहे.

अर्थात कुणालाही अभिव्यक्ती मार्ग ठरवून सापडत नसतो, चित्रकारांना तर नाहीच. त्यामुळे चित्रकारांच्या समकालीनांकडेही पाहावे लागते, त्या वेळच्या चर्चा जाणाव्या लागतात. असे एक समकालीन म्हणजे टिमथी हायमन. ‘निरीक्षण- प्रतिसाद- चित्रण’ या प्रक्रियेत जीव रमत नसून आता ‘स्वत:च्या आत पाहावेसे’ वाटते, असे पटवर्धनांनी या ब्रिटिश मित्राला १९९४ च्या डिसेंबरात पत्राने कळवले होते, हा या पुस्तकातील तपशील खरोखर महत्त्वाचा ठरतो. एक अर्थ असा निघतो की, हे आत पाहणे ही ‘तुझे आहे तुजपाशी’ प्रकारची ठेव पटवर्धनांकडे होतीच, ती त्यांनी उशिरा मान्य केली! मग २००० च्या सुमारास कधी तरी, चित्रांमधला मुलगा ‘बॉय’पेक्षा वेगळा झाला. पुढे तर अव्यक्तही पाहावे असे पटवर्धनांना वाटू लागल्याचे दिसते, पण त्या ‘व्हिजिटेशन’सारख्या चित्रांपर्यंत हायमन जात नाहीत. ते मैत्रीबद्दल, साहचर्याबद्दल आणि बडोद्यातील गुलाममोहम्मद शेख, भूपेन खक्कर व पटवर्धन यांच्या चित्रांतील निरनिराळेपणातही असलेल्या सारखेपणाच्या धाग्यांबद्दल लिहितात.

या पुस्तकात अभ्यासपूर्ण दीर्घ लेख आहेत ते आर. शिवकुमार आणि माधव इमारते यांचे. यापैकी इमारते यांनी रेखाटनांवर मूलभूत विचार मांडले आहेत. ‘पटवर्धन हे आधुनिकतावादी कलावंत की उत्तर-आधुनिक?’ असा प्रश्न उपस्थित करून इमारते म्हणतात, ‘विविध काळांतील, शैलींमधील घटकांचा सहभाग व सर्वसमावेशक अशी त्यांच्या चित्रकृतींची रूपे पाहता ते उत्तर-आधुनिकतावादी शैलीचे म्हणण्यास हरकत नाही’.

शिवकुमार हे पटवर्धनांच्या कलावर्तुळाबाहेरचे. शांतिनिकेतनाबद्दल त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रमाण मानले जाते. ‘कॉन्टेक्च्युअल मॉडर्निझम’ (संदर्भीय आधुनिकतावाद – संदर्भ स्वत:मधून आलेले) ही शिवकुमार यांनी मांडलेली संकल्पना म्हणून जगन्मान्य आहे. हौसेने चित्रकला शिकणाऱ्या पटवर्धनांची १९६९ ते ७१ दरम्यानची चित्रे स्थिरचित्र (स्टिललाइफ), निसर्गचित्र (लॅण्डस्केप), व्यक्तिचित्र (पोट्र्रेट) या प्रकारांतलीच दिसतात, पण पुढे अभिव्यक्तिवादाकडे (एक्स्प्रेशनिझम) पटवर्धन आकृष्ट झाले, त्यातही फर्नाद लेजर या चित्रकाराच्या गोलसर/भौमितिक आकारसौष्ठवाकडे त्यांची चित्रे झुकू लागली याची साक्ष १९७५ चे ‘थिंकिंग ऑफ लेजर’ ते १९७८ चे ‘रिनग वूमन’ या चित्रांत थोडय़ाफार फरकाने मिळत राहाते. यानंतर मात्र पटवर्धनांचा आवाका वाढला आणि रेने मॅग्रिटसारख्या चित्रकारांच्या कलेचे विस्मय-कारी सत्त्वही पुढल्या (२०१८ नंतरच्या) काळात दिसू शकले, असा शैलीविचार शिवकुमार मांडतात. इमारते यांच्या निरीक्षणाला इथे दुजोराच मिळतो, पण आधुनिकतावाद की अन्य काही हा शिवकुमार यांच्यापुढला प्रश्न नसून व्यक्तिगत/ सामाजिक संदर्भाना चित्रकाराने दिलेला वैचारिक आणि (चित्रात केवळ मांडणीपेक्षाही वरची अभिव्यक्ती अपेक्षित असल्यामुळे) नैतिक प्रतिसाद हा असल्याचे दिसते. चित्रकार पटवर्धनांची ‘सामील सहानुभूतीदार’ ही भूमिका कालपरत्वे बदलून, निवळून ती आता ‘समदृष्टीचा मध्यस्थ’ अशी झाल्याचे निरीक्षण शिवकुमार स्वागताच्या सुरात मांडतात. प्रदर्शनाच्या- आणि पुस्तकाच्याही- नावात चालण्याचा (वॉकिंग) उल्लेख आहे. हे चालणे वैचारिकही असलेच पाहिजे, ते झालेले आहे असे शिवकुमार यांचे प्रतिपादन आहे.

दृश्यकलावंतांबद्दलची पुस्तके अनेक आहेत, खुद्द पटवर्धनांच्याही आजवरच्या प्रवासात किमान चार इंग्रजी-मराठी पुस्तके निघाली आहेत. पण चित्रकाराचा जीवनपट, चित्रांविषयी झालेल्या लिखाणाची सूची, पटवर्धनांनी चित्रांविषयी (स्वत:च्या वा इतरांच्या) यापूर्वी लिहिलेल्या ३३ लेखांची सूची, अशी शिस्त पाळल्याने हे पुस्तक दृश्यकलेच्या शिक्षणसंस्थांसाठी आणि अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे ठरते.

वॉकिंग थ्रू सोल सिटी

संपादक – नॅन्सी अदजानिया

प्रकाशक- द गिल्ड आर्ट गॅलरी

पृष्ठे – ४९८, किंमत- ६००० रुपये

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 03:53 IST

संबंधित बातम्या