scorecardresearch

चिंतनधारा : धर्मभोळय़ांची आंधळी भक्ती

महाराज म्हणतात : पण जेव्हा पक्षोपपक्षांच्या भयाण भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने लाटेसरशा नेताना अधिकच दिसू लागल्या

rashtrasant tukdoji maharaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

‘‘मला माझ्या प्रवासात असे दिसून आले की, धर्मभोळे लोक वाटेल तसे वागूनसुद्धा त्याला ‘भक्ती’च समजतात आणि आचारविचारांचा प्रश्न आला की, ‘‘आम्ही संसारी आहोत, तेव्हा आमचं खोटं बोलल्याशिवाय कसं चालायचं ? महाराज! हा संसार आहे. आपल्या परमार्थात मात्र आपण सांगता ते सर्व चालते.’’ अशी धर्माला संमत नसलेली वाणी मोठय़ा उत्साहाने मुखातून काढतात. ती ऐकून मला अत्यंत दु:ख होते ‘आपण आपल्या परीने समाजाची सेवा करू पण त्यांच्यात जर प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न असल्याची भावना असेल, तर त्या परमार्थाचा आपल्या लोकांना फायदा तरी काय?’ असे मला वाटू लागते.’’-  अशी भावना धर्मभोळयांच्या आंधळय़ा भक्तीविषयी आलेल्या अनुभवाबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्त करतात.

पुढे महाराज म्हणतात : पण जेव्हा पक्षोपपक्षांच्या भयाण भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने लाटेसरशा नेताना अधिकच दिसू लागल्या; तत्त्वांपेक्षा जेव्हा संप्रदायालाच महत्त्व येऊ लागले; आणि ‘‘आमचा धंदा म्हणून ही परंपरा वेडगळ जरी असली तरी – आहे तसेच कायम ठेवावयाचे; सर्व लोक एका भावनेत आणणे म्हणजे आमच्या संतांच्या-आमच्या वाडवडिलांच्या-आमच्या जातिपक्षांच्या परंपरेचा कितीतरी नाश होईल.’’ म्हणून ‘हात तुटो पण पारंबी न सुटो’ या म्हणण्याप्रमाणे लोकांचा सारखा ओघ चाललेला जेव्हा जेव्हा दिसला, तेव्हा तेव्हा मनाला अत्यंत दु:ख वाटले.. एकाच्या रूढीकरिता, ध्येयाकरिता व परंपरेकरिता होत असलेला समाजाचा नाश डोळय़ाने पाहणे हे जर माझ्यासारख्या कमी शिक्षण घेतलेल्या माणसाला आवडत नसेल; तर समाजातील मोठमोठे विद्वान कसे पाहू शकतात याचेच मला आश्चर्य वाटते.

महाराज प्रश्न उपस्थित करतात : धर्म का कुणाचा धंदा असतो? भक्ती का कोणाची आमदानी असते? वा जाती का कोणाला मोक्षपदाला नेते? मुळीच नाही. अशी भोळसट समज करून घेऊन समाजाची हानी करणे वा करविणे हे आमच्यासारख्याकडून पाहवत नाही. म्हणूनच संतांनी घालून दिलेल्या मार्गाचे व ऋषींनी सांगितलेल्या तत्त्वांचे पुनरुज्जीवन करणे आज आवश्यक वाटते. वास्तविक धर्म खरा किंवा खोटा नसतोच. धर्माची तत्त्वे अमर असतात. ती कोणत्याही काळात बदलत नसतात. पण प्रसंगांनी मनुष्याचे मन भांबावून किंवा लोभास्तव वाटेल त्या मार्गाने जाते आणि त्यांचे चालक लोक त्यांच्याकडे कानाडोळा करीत राहतात. त्यामुळे शेवटी अशी पाळी येते की, भक्ती म्हणजे फक्त फुले वाहणे, घंटा वाजविणे, आणि व्यवहारात जराही दुरुस्ती न करता खुशाल पापे करणे, तसेच प्रसंगी जर कोणी बोलला तर ‘‘हा संसार आहे महाराज..’’ म्हणून बाजूला होणे.

 एवढी वेळ जेव्हा येत असते, तेव्हा लोकांना संतमहंतांनी निर्लोभपणाने सत्य मार्ग दाखविणे म्हणजेच धर्माची ग्लानी काढणे होय. महाराज भजनात म्हणतात

भक्ती भक्ती क्या करते हो,

भक्तीमें भी धोखा है।

बिना चरित्र आचरनके,

सारी भक्ती ही धोका है ।।

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 03:29 IST